News

सूर्याच्या शतकी खेळीमुळे मुंबई इंडियन्स विजयी मार्गावर परतली

By Mumbai Indians

आपला सूर्यादादाच्या शतकामुळे मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२४ मध्ये आपल्या चौथ्या विजयाची नोंद केली आहे. विजयासाठी १७४ धावांचा पाठलाग करताना आपल्या टीमने ३ विकेट्स देऊन १७.३ ओव्हर्समध्येच हा विजय मिळवला.

टीमचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादवने ५१ चेंडूंमध्ये नाबाद १०२ धावांचा स्फोटक खेळ केला आणि टीमचा विजय निश्चित केला. याशिवाय तिलक वर्मानेही ३२ चेंडूंमध्ये ३७ धावा करून टीमच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले.

सुरूवातीला डळमळीत खेळ झाल्यानंतरही दोन्ही फलंदाजांनी चौथ्या विकेटसाठी ७९ चेंडूंमध्ये १४३ धावांची भागीदारी करून टीमच्या विजयाचा पाया रचला.

त्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने टॉस जिंकून सनरायझर्स हैदराबादला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. हैदराबादच्या टीमसाठी त्यांचा सलामी फलंदाज ट्रेव्हिस हेडने सर्वाधिक ४८ धावा केल्या.

याशिवाय नीतिश रेड्डीने १५ चेंडूंमध्ये २२ धावा केल्या आणि शेवटी हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने १७ चेंडूंमध्ये धडाकेबाज ३५ धावा करून टीमला एक चांगली धावसंख्या उभारून दिली.

या सामन्यात आपला कर्णधार हार्दिक पांड्याने उत्तम गोलंदाजी करून हैदराबादच्या फलंदाजांना गप्प केले. हार्दिकने नीतिश, शहबाज अहमद आणि मार्को यान्सन यांना बाद करून पाहुण्या संघाच्या मधल्या फळीला जोरदार झटका दिला.

याशिवाय अनुभवी स्पिनर पियूष चावलानेही हैदराबादच्या फलंदाजांना फिरकीमध्ये अडकवले. त्याने तीन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. मुंबईकडून जसप्रीत बुमरा आणि अंशुल कंबोज यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

विजयासाठी १७४ धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या मुंबईच्या टीमची सुरूवात फारशी चांगली झाली नाही. मार्को यान्सनने ईशान किशनला ९ धावांवर बाद करून टीमला पहिला झटका दिला.

यानंतर रोहित शर्मा पॅट कमिन्सकडे विकेट देऊन बाद झाला. या टप्प्यावर हैदराबादच्या गोलंदाजांनी मुंबईच्या टीमवर दबाव आणला. स्विंग गोलंदाज भुवनेश्वर कुमारने नमन धीरला बाद करून मुंबईची तिसरी विकेट घेतली.

पॉवर-प्लेमध्येच मुंबईच्या तीन विकेट्स पडल्या होत्या. परंतु खेळाचा खरा रोमांच सुरू झाला नव्हता. यानंतर सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी टीमचा खेळ पुढे नेला आणि हैदराबादच्या गोलंदाजांवर जोरदार हल्ला केला.

या दोन्ही फलंदाजांनी अप्रतिम फलंदाजीचे दर्शन घडवून चौथ्या विकेटसाठी ७९ चेंडूंमध्ये नाबाद १४३ धावांची खेळी केली आणि सामना जिंकून दिला.

सूर्याने सुंदर खेळ करताना सहा षटकार आणि १२ चौकारांच्या मदतीने फक्त ५१ चेंडूंमध्ये २०० चा स्ट्राइक रेट ठेवून नाबाद १०२ धावा केल्या. त्याचा जोडीदार तिलक वर्मानेदेखील त्याला चांगली मदत केली आणि ३२ चेंडूंमध्ये ६ चौकारांसह टीमसाठी नाबाद ३७ धावा केल्या.

या दोघांच्या अप्रतिम खेळामुळे आपल्या टीमने १७.२ ओव्हर्समध्ये १७४/३ धावा करून हा सामना ७ विकेट्सनी आपल्या खिशात टाकला.

मुंबई इंडियंसच्या टीमचा पुढचा सामना ११ मे रोजी ईडन गार्डन्सवर कोलकाता नाइट रायडर्सविरूद्ध असेल.

थोडक्यात धावसंख्या:

मुंबई इंडियन्सकडून सनराइझर्स हैदराबादचा ७ विकेट्सनी पराभव.

एसआरएच: (20 ओवर में 173/8) - ट्रेविस हेड 48 (30), हार्दिक पांड्या 3/31

एमआई: (17.2 ओवर में 174/3) - सूर्यकुमार यादव 102*(51), भुवनेश्वर कुमार 1/21