News

“स्कायचा खेळ तडाखेबाज, त्याने या परिस्थितीत परफेक्ट कामगिरी केली”: कायरन पोलार्ड

By Mumbai Indians

मुंबई इंडियन्सने हा सामना आमची पलटन, आमचा अभिमान आणि प्रतिष्ठेसाठी खेळला आणि वानखेडे स्टेडियमवर सोमवारी (६ मे) ब्लू अँड गोल्डच्या भल्यामोठ्या समुद्राला अजिबात निराश केले नाही. 

मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी १७४ धावांचे लक्ष्य पूर्ण करताना आपला जीव आणि काळीज ओतले. त्याबद्दल बोलताना आपला फलंदाजी प्रशिक्षक कायरन पोलार्ड याने सूर्यकुमार यादवने (स्काय) आपला संयम ढळू न देता शब्दशः शिस्तीत देखणी इनिंग खेळली हे सांगतच सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेची सुरूवात केली.

“त्याचा खेळ जबरदस्त होता,” स्कायच्या शतकाबद्दल पोलार्डचे सुरूवातीचे हे शब्द होते.

“तो खेळायला गेला तेव्हा त्याने या परिस्थितीचा अंदाज घेतला आणि परफेक्ट कार्यक्रम केला. हा सामना अत्यंत कठीण होता कारण चेंडू सगळीकडे फिरत होता आणि थोडा स्विंग होत होता. त्याला थोडा मार बसला पण त्याने आपला संयम सोडला नाही. शिस्तीचा एक चांगला धडा त्याने सर्वांसमोर ठेवला.

“त्यानंतर त्याने मैदानात अक्षरशः दांडपट्टा फिरवावा तसा खेळ केला. त्याने गॅप्स शोधले आणि प्रतिहल्ला केला. आमच्यासाठी ही आश्चर्याची गोष्ट नाहीये. तो असाच सराव करतो आणि असेच खेळतो. तो धावा करतो तेव्हा मोठ्या धावा करतो आणि विजय आपल्या हातात येतो,” लॉर्ड म्हणाला.

आपला दादा सूर्याच्या अप्रतिम खेळाबरोबरच पलटनला या वेळी तिलक वर्मादेखील सातत्यपूर्ण फलंदाजी करताना दिसला. एमआयला १७४ धावांचा पाठलाग करण्यासाठी आशा आणि इच्छाशक्तीचा डोस हवा होता तेव्हा त्याने तो दिला.

“तो अत्यंत टॅलेंटेड तरूण खेळाडू आहे. मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये आल्यापासून त्याने मागच्या तीन सीझन्समध्ये आपल्यासाठी उत्तम कामगिरी केली आहे,” असे त्याने ब्लू अँड गोल्डमध्ये उगवलेल्या या ताऱ्याबद्दल मत व्यक्त केले.

“तो क्रीझवर जातो तेव्हा त्याचा आत्मविश्वास पाहून आम्हाला खूप आनंद झाला आहे. आम्ही अशा तरूण खेळाडूंना मैदानात जाऊन त्यांची कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन देत राहणार आहोत.”

आजच्या घरच्या खेळपट्टीवरच्या अत्यावश्यक असलेल्या विजयामध्ये त्याच्या संयमामुळे त्याचे हे कौतुक झाले.

“आमच्यावर खूप तणाव होता. तिलक पाचव्या ओव्हरमध्ये पॅट कमिन्सविरूद्ध फलंदाजी करायला आला आणि त्याने दोन वेळा चेंडू सीमापार पाठवला. आम्ही ड्रेसिंग रूममध्ये त्याच्या या इराद्याचे आणि शौर्याचे कौतुक केले. आम्ही प्रयत्न करत राहतोय. तिलक अत्यंत टॅलेंटेड आहे. आता इथून पुढच्या काळात तो ज्या कोणत्या प्रकारचे क्रिकेट खेळेल त्यात तो यशस्वी आणि सातत्यपूर्ण राहील अशी आशा आहे,” पोलार्ड म्हणाला.

MIvSRH सामना पलटन आणि क्रिकेट चाहत्यांच्या आवडत्या मनोरंजक आणि रोमांचक सामन्यांपैकी एक आहे. हा सामना सीझनच्या शेवटीशेवटी आला असला तरी पॉलीने टीम सातत्याने बदलतेय आणि प्रगती करतेय असे मत व्यक्त केले.

“कधीकधी आपण काय बदलले आहे हे सांगू शकत नाही. अर्थात सीझन संपल्यावर आपण शांतपणे बसून त्याचा विचार करू शकतो.

“आमच्या मते आपल्या भविष्याकडे नजर ठेवणे महत्त्वाचे आहे. तीन सामने शिल्लक होते. आम्ही एक खेळलो आणि आता दोन बाकी आहेत. त्यानंतर हेही संपल्यानंतर आम्ही शांतपणे बसून विचार करू की आमच्यासह प्रत्येकाला आशा असलेला विजय मिळण्यात विलंब होण्यास कुठे किंवा काय चुकले असावे.”

“त्यामुळे सध्या तरी विचार करण्यासाठी वेळ नाहीये. सामने विजयी संपवायचे आहेत आणि त्यानंतर काय होईल ते पाहता येईल.”

हा विजय आमच्या प्रिय पलटनच्या अभेद्य पाठिंब्याचे प्रतीक आहे. वेळ चांगली असो वा वाईट पण तुमची निष्ठा आमच्यासाठी प्रेरणा आहे. तुमच्या पाठिंब्यासाठी आम्ही खूप कृतज्ञ आहोत. सीझनच्या चढउतारांमधून पुढे जात असताना आयपीएल २०२४ कॅम्पेन उत्साहात संपवण्यावर लक्ष केंद्रित असेल.

येत्या शनिवारी (११ मे) रोजी कोलकाता नाइट रायडर्सविरूद्ध ईडन गार्डन्सवर असलेल्या सामन्यात तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहाल अशी आतुरता आम्हाला आहे. आम्ही तयारीसाठी पूर्णपणे प्रयत्नशील आहोत आणि आणखी एक रोमांचक खेळ तुम्हाला पाहायला मिळेल याचा विश्वास बाळगून आहोत.