News

INDvNZ दुसरा एकदिवसीय सामना- भारताची विजयी घोडदौड सुरूच

By Mumbai Indians

हैदराबादमध्ये गोलंदाजांनी फार काही छान खेळ केला नाही. त्यामुळे न्यूझीलंडचा संघ जिंकतो की काय असा एक क्षण आला होता. मात्र रायपूरमध्ये भारतीय संघाने त्याचा पुरेपूर वचपा काढून एकहाती मालिका जिंकली.

सिराज-शामी यांनी फलंदाजांचे टांगे पलटी घोडे फरार केले आणि तेही पहिल्या १० ओव्हर्समध्येच. एक-दोन बऱ्या भागीदारींमध्ये न्यूझीलंडला १०० धावांचा टप्पा पार करता आला. पण आपल्या कर्णधाराने मुत्सद्दीपणा वापरून त्यांना रोखून धरले.

धावांचा पाठलाग करायला उतरल्यानंतर रोहित शर्माने जोरदार अर्धशतक पूर्ण करून धमाल उडवून दिली. त्यामुळे भारताला आठ विकेट्सनी विजय मिळवून मर्यादित ओव्हर्समधली आणखी एक मालिका घरच्या मैदानावर खिशात टाकणे शक्य झाले.

शामी, सिराजचा निस्ता धुरळा!

मोहम्मद सिराजला गोलंदाजी करताना पाहिले की वाटते- अरे हे किती सोपे काम आहे. पण आज मात्र मोहम्मद शामीने पहिली विकेट पाडली. त्याने अगदी सहजपणे फिन एलेनचा स्टंप उडवला आणि नंतर किवी फलंदाजांनी त्यांचा वेग आणि स्विंगपुढे हात टेकले. एकामागून एक विकेट्स पडत राहिल्या आणि पाहुण्या संघावर १०.३ ओव्हर्समध्ये फक्त १५/५ धावांची नामुष्की ओढवली.

खालच्या फळीने लज्जारक्षण केले!

हैदराबादमध्ये याच खालच्या फळीने किवीजच्या हातातून निसटलेला खेळ पिक्चर अभी खत्म नहीं हुई असे म्हणत जिंकायचा प्रयत्न केला होता. रायपूरमध्ये त्यांनी आपल्या संघाला नामुष्कीपासून वाचवले. ग्लेन फिलिप्सने ब्रेसवेलसोबत ४१ धावांची भागीदारी केली आणि त्यानंतर त्याने मिशेल सेंटनरसोबत ४७ धावांची भागीदारी केली. या भागीदारींमुळे न्यूझीलंडला १०० च्या वर धावसंख्या नेता आली.

आणि हो, पंड्याने डेवॉन कॉनवेला बाद करताना कुंग फूचासुद्धा वापर केला हे विसरून कसे चालेल? तो तर ऐतिहासिक क्षण म्हणायला पाहिजे.

स्पिनर्सनी शेपूट गुंडाळले

पंड्याने संतनेर फिलिप्सची भागीदारी तोडली. त्यानंतर पुढच्याच ओव्हरमध्ये स्पिनर्सनी आपले काम चोख बजावले. वॉशिंग्टन सुंदरने फिलिप्स आणि लोकी फर्ग्युसनला आटोपले तर कुलदीप यादवने न्यूझीलंडचा खेळ समाप्त केला. शामीची गोलंदाजी आज बघण्यासारखी होती. त्याने ३/१८ अशा विकेट्स घेतल्या तर पंड्या आणणि सुंदर यांनी प्रत्येकी एकेक विकेट घेतली.

रोहितच्या आतषबाजीने रायपूरचे डोळे दिपले

रोहित शर्मा दुसऱ्या इनिंगला खेळायला उतरला तेव्हा किवीजना प्रश्नच पडला होता, “याच पिचवर आपण खेळलो का?” आपल्या कर्णधाराने प्रेक्षकांना वेगवेगळ्या फटक्यांची मेजवानीच दिली. त्यांना हे बघू की त्याचे कौतुक करू, असे वाटत होते. त्याने सात चौकार आणि दोन षटकार- एक फाइन लेगवर आणि दुसरा कव्हर्सवरून फटकावले.

तो एकदिवसीय सामन्यात आपले ७७ वे अर्धशतक पूर्ण करून बाद झाला. आता या स्वरूपातल्या सामन्यांमध्ये १०,००० धावांपासून खूपच जवळ आहे. तिथवर पोहोचण्यासाठी त्याला आणि आपल्याला फक्त एका द्विशतकाची प्रतीक्षा आहे.

गिल आणि किशन यांनी सोपस्कार पूर्ण केले

नुकतेच द्विशतकी खेळाडूंच्या पंगतीत आलेल्या शुभमन गिल आणि ईशान किशन हे सामना संपवायच्या तयारीनेच आले होते. नुकत्याच २०० धावांचा पाऊस पाडून आलेल्या गिलने विजयी धावा पूर्ण करत ५३ चेंडूंमध्ये ४० धावा नोंदवल्या. भारताने २१ व्या ओव्हरमध्ये सामना आणि मालिकादेखील जिंकली.

यजमान संघाने या वेळी जराही ढिलाई दाखवली नाही आणि एकदिवसीय मालिकेत दिमाखदार २-० आघाडी घेतली. “वर्ल्डकप २०२३ मिशनला” चार चाँद लागले.

थोडक्यात धावसंख्या

न्यूझीलंड ३४.३ ओव्हर्समध्ये १०८ धावांवर सर्वबाद (ग्लेन फिलिप्स ३६, मोहम्मद शामी ३/१८) चा भारताकडून पराभव (रोहित शर्मा ५१, शुभमन गिल ४०*)