भारताकडून श्रीलंकेचा १० विकेटनी दणदणीत पराभव, आठव्यांदा आशिया कप भारताकडे

भारत आणि श्रीलंका यांच्यादरम्यान आशिया कप २०२३ चा शेवटचा सामना कोलंबो इथल्या के. आर. प्रेमदासा स्टेडियवर खेळवण्यात आला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय टीमने अप्रतिम खेळ करून श्रीलंकेचा १० विकेट्सनी पराभव केला आणि आठव्यांदा हा चषक पटकावला आहे.

श्रीलंकन कर्णधार दासुन सनाकाने नाणेफेक जिंकून आधी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा पूर्ण संघ १५.२ ओव्हर्समध्ये जेमतेम ५० धावा करून गारद झाला.

भारताकडून जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराजने फक्त २१ धावा देऊन श्रीलंकेच्या सहा खेळाडूंना पॅव्हिलियनला परत पाठवले. हार्दिक पंड्याने ३ तर जसप्रीत बुमराने १ विकेट घेतली.

श्रीलंकन विकेटकीपर फलंदाज कुशल मेंडिसने सर्वाधिक म्हणजे १७ धावा केल्या आणि दुशान हेमंता १३ धावांवर नाबाद राहिला. भारतीय जलदगती गोलंदाजांच्या माऱ्यापुढे श्रीलंकन फलंदाज जराही टिकू शकले नाहीत. या दोन खेळाडूंखेरीज इतर कोणत्याही फलंदाजाला दहा धावासुद्धा करता आल्या नाहीत.

भारतीय संघासमोर फक्त ५१ धावांचे अत्यंत सोपे लक्ष्य होते. भारतीय संघाने एकही विकेट न देता फक्त ६.१ ओव्हर्समध्ये विजय प्राप्त केला. सलामी फलंदाज ईशान किशनने २३ तर शुभमन गिलने २७ धावा करून हे लक्ष्य पूर्ण केले.

भारताने आशिया कप २०२३ च्या अंतिम सामन्यात श्रीलंकेला १० विकेट्सनी पराभूत करून आशिया कप आठव्यांदा घरी आणला आहे.

भारतात होणाऱ्या क्रिकेट विश्वचषक मालिकेच्या दृष्टीकोनातून भारतीय संघासाठी हा विजय मनोबल उंचावणारा ठरेल. येत्या ८ ऑक्टोबरला भारतीय संघ विश्व चषक मालिकेत आपला पहिला सामना खेळणार आहे. अर्थात त्यापूर्वी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरूद्ध ३ एकदिवसीय सामन्यांची एक मालिकादेखील खेळणार आहे.