ENGvIND दुसरा कसोटी सामना: भारताने एजबेस्टनमध्ये इंग्लंडला हरवून रचला इतिहास
दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा ३३६ धावांनी पराभव करून भारतीय संघाने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे.
पहिला दिवस| यशस्वी शुभमनची जादू परत चालली
यशस्वी जयस्वालने पुन्हा एकदा आपला आवडता संघ असलेल्या इंग्लंडविरुद्ध धमाकेदार सुरुवात केली आणि सलग सातव्यांदा ५०+ धावा केल्या.
त्याने एजबेस्टन येथे भारतीय सलामीवीराचा सर्वाधिक धावांचा विक्रम (माजी सलामीवीर सुधीर नाईक यांच्या १९७४ मध्ये ७७ धावा) मोडला.
यानंतर कर्णधार शुभमन गिल दुसऱ्या बाजूने टिकून राहिला आणि त्याने अप्रतिम नाबाद शतक केले. दुसऱ्या बाजूने विकेट्स पडत राहिल्या.
दुसरा दिवस| कर्णधार गिलचे विक्रमी प्रदर्शन
दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात शुभमन गिल आणि रवींद्र जडेजा यांनी उत्तम भागीदारी केली. दोघांनी मिळून २०३ धावा जोडल्या आणि उपाहारापर्यंत भारताला मजबूत स्थितीत आणले.
दुसऱ्या सत्रात संपूर्ण शो कर्णधार गिलच्या नावावर होता. इंग्लंडमध्ये कसोटी द्विशतक झळकावणारा तो पहिला भारतीय कर्णधार ठरला.
गिलने आपली अप्रतिम फलंदाजी सुरू ठेवली आणि २६९ धावा केल्या. ही कोणत्याही भारतीय कसोटी कर्णधाराने केलेली सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी हा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता.
भारताने पहिल्या डावात ५८७ धावा केल्या. त्यानंतर गोलंदाजीतही धमाका झाला. आकाश दीपने तिसऱ्या षटकात डबल विकेट मेडन टाकली.
तिसरा दिवस| सिराजची जबरदस्त गोलंदाजी
तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला मोहम्मद सिराजने चमत्कार केला. त्याने जो रूट आणि बेन स्टोक्स यांना सलग चेंडूंवर बाद करून इंग्लंडची धावसंख्या ८४/५ अशी केली.
पण हॅरी ब्रुक आणि जेमी स्मिथ यांनी जबाबदारी सांभाळली. दोन्ही खेळाडूंनी ३६८ चेंडूत ३०३ धावांची शानदार भागीदारी केली.
दुसरा नवीन चेंडू घेताच सामना पुन्हा भारताच्या बाजूने फिरला. इंग्लंडने त्यांचे शेवटचे ५ बळी फक्त २० धावांत गमावले. सिराजने इंग्लंडमध्ये कसोटीत पहिल्यांदाच पाच बळी घेतले.
चौथा दिवस| कर्णधार गिल आणि जलदगती गोलंदाजांनी भारताला विजयाजवळ पोहोचवले
पहिल्या सत्रातच भारतीय फलंदाजांनी सामन्यावर ताबा मिळवला. सलामीवीर के एल राहुलने शानदार अर्धशतक झळकावले. करुण नायर बाद झाल्यानंतर कर्णधार शुभमन गिलने संयमाने फलंदाजी करत शानदार शतक झळकावले.
त्याने सुनील गावस्करचा ५४ वर्षांचा जुना विक्रम मोडला आणि कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज होण्याचा मान मिळवला. गिलने १६१ धावांची दमदार खेळी केली.
याशिवाय ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजाच्या जलद अर्धशतकांमुळे भारताची आघाडी ६०० च्या पुढे गेली. त्यानंतर टीम इंडियाने ४२७/६ वर डाव घोषित केला.
६०८ धावांचे लक्ष्य असलेल्या इंग्लंडला सुरुवातीलाच धक्का बसला. आकाशदीप आणि मोहम्मद सिराज यांनी पहिल्या दोन विकेट घेतल्या. दिवसाच्या शेवटी आकाशदीपच्या एका शानदार चेंडूने जो रूट बाद झाला. आता भारताला विजयासाठी फक्त सात विकेटची आवश्यकता होती.
पाचवा दिवस| गोलंदाजांनी भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला
दिवसाची सुरुवात पावसामुळे उशिरा झाली. पण आकाश दीपने येताच इंग्लंडला धक्का दिला. त्याने पोप आणि ब्रूकला बाद करून यजमानांना बॅकफूटवर ढकलले. लंचच्या अगदी आधी वॉशिंग्टन सुंदरने बेन स्टोक्सला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
दुसऱ्या सत्रात इंग्लंडकडून जेमी स्मिथने ८८ धावांची चांगली खेळी केली. पण तो आकाश दीपचा पाचवा बळी ठरला. तो बाद होताच भारतीय गोलंदाजांनी उर्वरित विकेट पटकन घेतल्या.
अशा रितीने भारताने एजबेस्टनमध्ये ३३६ धावांनी मोठा विजय नोंदवला. मागच्या सात सामन्यांमध्ये भारताला येथे पराभव पत्करावा लागला होता.