मी सरावादरम्यान षट्कार मारण्यासाठी खूप वेळ प्रयत्न करतो- टिम डेव्हिड

टिम डेव्हिडने आमच्या १७ मे रोजी असलेल्या सनरायझर्स हैदराबादसोबतच्या सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत प्रश्नांची उत्तरे दिली.

आमच्या या तडाखेबाज फलंदाजाने त्याच्या सरावाच्या प्रक्रिया, फिनिशरचा दृष्टीकोन आणि त्याने टीममध्ये नसतानाच्या काळात स्वतःवर कशा प्रकारे काम केले याबाबत चर्चा केली.

तो या पॉवर हिटिंग रोलसाठी कशा प्रकारे तयारी करतो आणि खेळातील त्याची सर्वांत कठीण भूमिका कोणती हा प्रश्न विचारला असता त्याने आपण नेटमधील सरावादरम्यान या हिट्सची प्रॅक्टिस करतो असे सांगितले.

“मी षटकार मारण्यासाठी नेट्समध्ये खूप सराव करतो आणि गोलंदाजांवर दबाव ठेवण्याचा प्रयत्न करतो. पॉवर हिटिंगसाठी तुम्हाला योग्य ते क्षण निवडावे लागतात. हे धोकादायक असते आणि प्रत्येक वेळी जमतेच असे नाही. तुम्हाला खूप सराव करण्याची आणि सामन्यात हा आत्मविश्वास ठेवण्याची गरज असते,” डेव्हिड म्हणाला.

“पिचेसही थोडे स्लो होत चालले आहेत. मला हे आव्हान खूप आवडते. तुम्ही एकदा का सामन्यात आलात की पॉवर हिटिंग हा मानसिकतेचा भाग होतो. तुम्ही शक्य तितके सातत्यपूर्ण होण्याचा आणि तुमच्या प्रक्रियेनुसार खेळण्याचा प्रयत्न करता. त्यामुळे चांगला परिणाम साध्य होतो. ”

टिम डेव्हिड खेळणाऱ्या ११ च्या संघात नसल्याच्या कालावधीचाही सामना केला आहे. परंतु त्याने त्यातही स्वतःवर काम केले आणि स्वतःला भारतीय परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला.

“मी टीमबाहेर असतानाच्या काळात मला जिममध्ये खूप मेहनत करण्याची आणि इथल्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची संधी मिळाली. त्यामुळे संधी आली तेव्हा मला तिच्यावर स्वार होता आले,” तो म्हणाला.

आता त्याला या मेहनतीचे फळ मिळते आहे. उर्वरित सामन्यांमध्ये आणि पुढेही हीच कामगिरी करण्याची आशा तो करतो आहे.

“अनेक तरूण खेळाडू अजूनही पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहेत. टाटा आयपीएलमध्ये कशा प्रकारे यशस्वी व्हायचे हे आम्हाला कळले आणि आम्ही या अनुभवाचा वापर पुढील वर्षी आणखी शक्तिशाली होण्यासाठी करू,” तो म्हणाला.

टिम डेव्हिडची ही आत्मविश्वासपूर्ण उत्तरे मॅचडेच्या आदल्या दिवशी त्याचा दृढनिश्चय दाखवतात. तो आणि टीम एसआरएचविरूद्ध कशा प्रकारे कामगिरी करतील हे पाहणे स्वारस्याचे असेल.