एकच नाव, एकच हिटमॅन: रोहितच्या ऐतिहासिक २६४ धावांच्या खेळीच्या आठवणींना उजाळा!

उद्या, १३ नोव्हेंबरला, रोहित शर्माने आपल्या अविश्वसनीय फलंदाजीने संपूर्ण क्रिकेटविश्वाला थक्क करून सोडलेल्या त्या ऐतिहासिक दिवसाला बारा वर्षं पूर्ण होतील. पलटन, २०१४ मध्ये तुम्ही तो सामना थेट पाहिला असेल, तर आम्ही नेमकं कशाबद्दल बोलतोय, हे तुम्हाला चांगलंच ठाऊक असेल. आणि जर तो सामना पाहिला नसेल, तर पाहिलेल्या कोणालाही विचारा. त्या दिवशी सामना पाहताना आपण नेमकं कुठे बसलो होतो, हेही ते तुम्हाला सांगतील!

खरं तर त्या दिवसाची सुरुवात पाहता पुढे असं काही ऐतिहासिक घडेल, याची कल्पनाही कुणाला नव्हती. बोटाच्या दुखापतीमुळे जवळपास तीन महिने क्रिकेटपासून दूर राहिल्यानंतर रोहित शर्मा ईडन गार्डन्सच्या मैदानावर फलंदाजीसाठी उतरला होता. भारताने आधीच मालिका खिशात घातली होती आणि रोहितही संघात पुनरागमन करत होता. त्यामुळे त्याच्यावर विशेष दबाव नव्हता. सुरुवातीच्या काही षटकांतही मोठ्या खेळीची कोणतीच चाहूल लागली नाही. रोहितने सावध सुरुवात केली. बराच वेळ त्याच्या बॅटमधून एकही चौकार आला नाही. त्यातच सुरुवातीला सीमारेषेजवळ त्याचा एक झेलही सुटला. इतर कोणत्याही दिवशी अशी सुरुवात एकदिवसीय सामन्यात फारशी लक्षात राहिली नसती. पण तो दिवस काही साधासुधा नव्हता!

त्यानंतर रोहितने जे काही केलं, ते क्रिकेटविश्वातील मोजक्याच फलंदाजांना जमू शकतं. आपल्या फलंदाजीचा वेग त्याने टप्प्याटप्प्याने असा वाढवला की, त्याच्याकडे इतकी आक्रमक रूपं आहेत, याची कुणालाच कल्पना नव्हती. सुरुवातीचं अर्धशतक सावधपणे पूर्ण झालं. शतक गाठताना त्याच्या फलंदाजीत आक्रमकता स्पष्ट दिसू लागली आणि त्यानंतर तर धावांचा वेग वाढतच गेला. प्रत्येक पुढचं अर्धशतक आधीच्या अर्धशतकापेक्षा कमी चेंडूंत पूर्ण होत होतं. डाव संपेपर्यंत मैदानाचा एकही कोपरा त्याने सोडला नव्हता. आखूड टप्प्याच्या चेंडूंवर त्याचे अप्रतिम पुल आणि कट फटके, एक्स्ट्रा कव्हरवरून मारलेले इनसाइड-आऊट ड्राइव्ह, फिरकीपटूंविरुद्धचे स्वीप आणि क्षेत्ररक्षणाची मांडणीच नसल्यासारखे गोलंदाजांच्या डोक्यावरून थेट सीमापार पाठवलेले फटके... सगळंच पाहण्यासारखं होतं. वेगवान गोलंदाजी असो किंवा फिरकी, चेंडूची दिशा असो किंवा टप्पा, रोहितसमोर कशाचाच निभाव लागत नव्हता. त्या एका खेळीत रोहित शर्माच्या फलंदाजीत एकही कमकुवत बाजू दिसली नाही.

काही खेळींची महानता समजून घेण्यासाठी संपूर्ण धावफलक वाचण्याची गरज नसते. रोहितची ती खेळी त्यापैकीच एक! तरीही तिची आकडेवारी आजही थक्क करून सोडते. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या, वीरेंद्र सेहवागचा २१९ धावांचा विक्रम मोडीत काढणारी खेळी आणि रोहितच्या नावावर असलेल्या तीन एकदिवसीय द्विशतकांपैकी एक! एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन द्विशतकं झळकावण्याच्या त्याच्या पराक्रमाच्या जवळपासही आजवर दुसरा कोणताच फलंदाज पोहोचू शकलेला नाही. बारा वर्षांनंतरही एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळी कशी असावी, याचं उदाहरण म्हणून त्या डावाकडे पाहिलं जातं. केवळ २६४ या आकड्यामुळे नाही, तर एकदा लय सापडल्यानंतर रोहितने श्रीलंकेच्या हातून सामना ज्या पद्धतीने पूर्णपणे हिसकावून घेतला, त्यामुळे ती खेळी आजही खास ठरते.

उद्या रोहित पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. यावेळी न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यासाठी बे ओव्हलवर तो फलंदाजी करताना दिसेल. त्या वेळेप्रमाणेच यंदाही मालिकेवर भारताचं पूर्ण वर्चस्व आहे. मात्र, या दौऱ्यात रोहितच्या बॅटमधून अद्याप फारशी मोठी खेळी आलेली नाही. पलटनला जल्लोष करण्याची मोठी संधीही अजून मिळालेली नाही. पण रोहितच्या बाबतीत इतिहासाची पुनरावृत्ती कधी होईल, हे सांगता येत नाही. गेल्या बारा वर्षांत क्रिकेटविश्वाने एक गोष्ट नक्कीच शिकली असेल, ती म्हणजे रोहित शर्मा शांत असला, तरी त्याला कमी लेखण्याची चूक गोलंदाजांना नेहमीच महागात पडली आहे.

आणि म्हणूनच त्याच्याकडून पुन्हा एकदा अशा ऐतिहासिक खेळीची अपेक्षा ठेवायला काय हरकत आहे? कारण हा पराक्रम पुन्हा करण्याची क्षमता कोणामध्ये असेल, तर ती आपल्या हिटमॅनमध्येच!