INDvWI टी२० मालिका: नमनला पहिल्यांदाच टी२० आंतरराष्ट्रीय संघात संधी, तिलक आणखी एका बिग शोसाठी सज्ज!
ब्लू अँड गोल्डच्या तालमीत तयार झालेले दोन खेळाडू आता टीम इंडियात एकत्र दिसणार आहेत. समोर वेस्ट इंडिजचं आव्हान आणि पाच सामन्यांची टी२० मालिका. आपले नमन धीर आणि तिलक वर्मा मैदानावर आपलं शंभर टक्क्यांहून अधिक योगदान देण्यासाठी सज्ज असतील. निर्भीड फिनिशर आणि मोठ्या क्षणांचा स्पेशालिस्ट एकत्र मैदानात उतरले, तर फटकेबाजीची आतषबाजी पाहायला मिळणारच!
वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी नमनला नुकतंच पहिल्यांदाच भारतीय टी२० आंतरराष्ट्रीय संघात स्थान मिळालं आहे. आपल्या स्टायलिश आणि दमदार फटकेबाजीने तो सातत्याने चर्चेत राहिला आहे. वानखेडे स्टेडियमच्या झगमगाटापासून नुकत्याच पार पडलेल्या शेर-ए-पंजाब टी२० स्पर्धेतील धडाकेबाज कामगिरीपर्यंत नमनने क्रिकेटविश्वाचं लक्ष वेधून घेतलं. या स्पर्धेत त्याने ६५५ धावा केल्या, ज्यामध्ये १७३ धावांच्या सर्वोच्च खेळीचाही समावेश होता. नमनच्या या भरारीसोबत अनेक विक्रमही जोडले गेले. त्याची १७३ धावांची खेळी भारतीय फलंदाजाची टी२० क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या ठरली. त्यासोबतच शेर-ए-पंजाब स्पर्धेतील सर्वात वेगवान शतक, स्पर्धेतील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारतातील राज्यस्तरीय टी२० लीगमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रमही त्याच्या नावावर झाला.
या शानदार कामगिरीचं बक्षीस म्हणून नमनने २७ सप्टेंबर २०२६ रोजी भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि आता क्रिकेटच्या सर्वात छोट्या फॉरमॅटमध्ये आपली छाप पाडण्याची वेळ आली आहे. अवघ्या काही षटकांत प्रतिस्पर्ध्यांवर प्रतिहल्ला चढवणं, सहजपणे चेंडू सीमारेषेपलीकडे पाठवणं आणि धावगतीला वेग देणं — या क्षमतेमुळे तो सामन्याचं चित्र बदलू शकतो. खरा अष्टपैलू खेळाडू असल्यामुळे गोलंदाजीचा आणखी एक पर्याय देत तो संघासाठी अधिक उपयुक्त ठरतो. अष्टपैलुत्व, ताकद, आक्रमक इंटेंट आणि निर्भीड क्रिकेटचा हा मिलाफ कोणत्याही कर्णधारासाठी नक्कीच फायद्याचा आहे.
दुसरीकडे, तिलक वर्माच्या खेळात संयमासोबत परिस्थितीचं अचूक आकलन, दबाव पेलण्याची क्षमता आणि गरजेनुसार खेळाचा वेग बदलण्याचं कौशल्य आहे. ही टी२० मालिका त्याला पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची ताकद दाखवण्याची आणि निर्णायक क्षणी संघासाठी उभं राहण्याची संधी देणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील आपल्या सुवर्णपदक विजेत्या खेळाडूने पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात गरजेच्या वेळी आपली भूमिका चोख बजावली होती. त्याने अवघ्या २२ चेंडूंमध्ये तीन चौकार आणि चार षटकारांसह नाबाद ५१ धावांची झंझावाती खेळी केली. TV भारतीय संघासाठी काय घेऊन येतो, याची ती आणखी एक झलक होती — संयम, स्पष्ट विचार आणि खेळावर नियंत्रण.
टी२० क्रिकेटमध्ये संघाला काहीतरी वेगळं देऊ शकणाऱ्या खेळाडूंची भूमिका नेहमीच महत्त्वाची असते. संधी मिळाल्यास नमन संघासाठी ती ठिणगी ठरू शकतो, तर तिलक डावाला एकत्र बांधून ठेवणारा दुवा. हे दोघे एकत्र आले की फलंदाजीला एक वेगळीच धार मिळू शकते. पाच सामने, पाच वेगवेगळी मैदानं आणि त्यासोबत नव्या संधी आणि नवी आव्हानं. मंच सज्ज आहे आणि आपले MI बॉईज आणखी एका मोठ्या अध्यायासाठी तयार आहेत. पलटनने त्यांना मोठं होताना पाहिलंय, आता वेस्ट इंडिजविरुद्ध मैदानात उतरताना त्यांच्यासाठी आवाज करण्याची वेळ आली आहे.
वेस्ट इंडिजचा भारत दौरा - टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेचं वेळापत्रक
|
तारीख |
ठिकाण |
वेळ |
|
६ ऑक्टोबर २०२६ |
लखनऊ |
संध्याकाळी ७ वाजता IST |
|
९ ऑक्टोबर २०२६ |
रांची |
संध्याकाळी ७ वाजता IST |
|
११ ऑक्टोबर २०२६ |
इंदूर |
संध्याकाळी ७ वाजता IST |
|
१४ ऑक्टोबर २०२६ |
हैदराबाद |
संध्याकाळी ७ वाजता IST |
|
१७ ऑक्टोबर २०२६ |
बेंगळुरू |
संध्याकाळी ७ वाजता IST |