टी२०आय मालिकेत ४८ धावांनी विजय मिळवून भारताचे आव्हान जिवंत

भारताने पाच सामन्यांच्या टी२०आय मालिकेत दिमाखदार पुनरागमन केले आहे. त्यांनी विशाखापट्टणम येथील डॉ. वाय. एस. राजशेखर रेड्डी एसीए- व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर आयोजित तिसऱ्या टी२०आय सामन्यात दक्षिण आफ्रिकेला तब्बल ४८ धावांनी पराभूत केले.

ऋतुराज गायकवाड (५७) आणि ईशान किशन (५४) यांच्या बॅट्स आज तळपल्या. त्यांनी अर्धशतके झळकवली. हर्षल पटेल (४/२५) आणि युजवेंद्र चहल (३/२०) यांनी आपल्या मेन इन ब्लूना पाच चेंडू शिल्लक राखून १७९ धावांचा बचाव करायला मोलाची मदत केली.  

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा याने टी२०आय मालिकेत सलग तिसऱ्या वेळी टॉस जिंकून आधी गोलंदाजी करण्याचा पर्याय निवडला. कटकमध्ये आयोजित दुसऱ्या टी२०आय सामन्यातील खेळणाऱ्या अकरा खेळाडूंच्या संघात काहीही बदल न करण्याचा आश्चर्यकारक निर्णय दोन्ही संघांनी घेतला.

भारताने धडाक्यात खेळाला सुरूवात करून ५.३ ओव्हर्समध्ये ५० धावा पूर्ण केल्या. ऋतुराज गायकवाडने ५ व्या ओव्हरमध्ये अँन्रिच नॉर्टजेच्या चेंडूंवर सलग पाच चौकार फटकावले. पॉवरप्लेपर्यंत भारतीय संघ ५७/० वर पोहोचला होता.

अवघ्या ३० चेंडूंमध्ये सात चौकार आणि दोन षटकारांसह गायकवाडने टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात आपले पहिले अर्धशतक पूर्ण केले. टी२०आय मालिकेच्या पाच सामन्यांमधील पहिल्या दोन सामन्यांत २३ आणि १ या धावसंख्येनंतर आता त्याला दिलासा मिळाला आहे.

आपला हा सलामीचा फलंदाज पाच चेंडूंनंतर केशव महाराजच्या चेंडूवर हल्ला चढवण्याच्या प्रयत्नात प्रोटीआजच्या स्पिनरकडे कॅच देऊन बाद झाला.

आपल्या सलामीच्या भागीदाराचाच कित्ता गिरवताना ईशान किशनने ३१ चेंडूंमध्ये मालिकेतील आपले दुसरे अर्धशतक पूर्ण केले.

तिसऱ्या क्रमांकावर आलेला श्रेयस अय्यर तेराव्या ओव्हरमध्ये तबरेज शम्सीच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू होता होता वाचला. पण त्यानंतर दोन चेंडूंवर तो बाद झाला. स्क्वेअर लेगवर अँन्रिच नॉर्ट्जेने त्याचा स्वीप शॉट कॅच केला.

त्यानंतर लवकरच किशननेदेखील पॅव्हिलियनचा रस्ता पकडला. ड्वायने प्रेटोरियसच्या ऑफ कटर चेंडूला या डावखुऱ्या फलंदाजाने सीमेपलीकडे टोलवायचा प्रयत्न केला. परंतु तो डीप स्क्वेअर लेगवर रेझा हेंड्रिक्सच्या हातात जाऊन विसावला.

एक दोन कॅच हातातून सुटल्यावर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा याने भारतीय कर्णधार ऋषभ पंतला अवघ्या सहा धावांवर झेलबाद केले.

भारताने १७.३ ओव्हर्समध्ये १५० धावा पूर्ण केल्या. पेनल्टीटाइम ओव्हरमध्ये दिनेश कार्तिक बाद झाल्यानंतर यजमान संघाने २० ओव्हर्समध्ये ५ विकेट्स देऊन १७९ धावा पूर्ण केल्या.

दक्षिण आफ्रिकेचा १८० धावांचा पाठलाग अत्यंत संथ सुरू झाला. कर्णधार टेम्बा बावुमा चौथ्या ओव्हरमध्ये आठ धावांवर बाद झाला.

प्रोटीआजनी आपला पॉवरप्लेचा टप्पा ३८/२ वर पूर्ण केला. हर्षल पटेलने आपल्या पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर रेझा हेंड्रिक्सच्या रूपात आपली पहिली विकेट घेतली. त्याने पटेलच्या संथ गोलंदाजीवर फटका मारायचा प्रयत्न केला. पण युजवेंद्र चहलने अगदी सहजपणे कॅच घेतला.

भारतीय स्पिनरने लेग साइडला चेंडू टाकून एक विकेट घेतली. हा चेंडू रसी वान देर डुसेनच्या बॅटच्या कडेला लागला आणि ऋषभ पंतच्या हातात जाऊन विसावला.

ड्वायने प्रेटोरियसने दक्षिण आफ्रिकेचा खेळ सावरण्याचा प्रयत्न केला. त्याने ८.३ ओव्हर्समध्ये संघाला ५० धावांपलीकडे नेले. परंतु चहल- पंत या जोडगोळीने त्याला बाद करून त्याचा खेळ लवकरच संपवला.

चहलचा फ्लॅट चेंडू प्रेटोरियसने सरकवण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बॅटच्या बाहेरील कडेला लागला आणि ऋषभ पंतने स्टंप्सच्या मागे आणखी एक कॅच घेतला. हा अष्टपैलू खेळाडू १६ चेंडूंवर २० धावा काढून पॅव्हिलियनला परतला. 

हर्षल पटेलने मधल्या फळीत आलेल्या डेव्हिड मिलर या दक्षिण आफ्रिकेच्या महत्त्वाच्या खेळाडूला बाद केले. त्याच्या ऑफ कटरला खेळण्याच्या प्रयत्नात असलेल्या मिलरचा कॅच एक्स्ट्रा कव्हरवर ऋतुराज गायकवाडने पकडला. ही महत्त्वाची कॅच त्याने झेप घेऊन पकडली.

त्यानंतर लवकरच प्रोटीआज १४.४ ओव्हर्समध्ये १०० धावांपर्यंत पोहोचले. हेन्रिच क्लासेन हा युजवेंद्र चहलचा आजचा तिसरा बळी ठरला. त्याने ऑफसाइडला चेंडू उडवल्यानंतर अक्झर पटेलने अगदी सहजपणे तो पकडला.

कागिसो रबाडाने हर्षल पटेलचा शॉर्ट आणि वाइड ऑफ चेंडू डी पॉइंटवर भिरवण्याचा प्रयत्न केला. तिथे प्रतीक्षेत असलेल्या चहलने अगदी सोपा कॅच पकडून त्याला बाद केले. त्यामुळे हर्षलला आजची तिसरी विकेट मिळाली.

सामना संपत असताना भुवनेश्वर कुमारने केशव महाराजला स्लो लेग कटर चेंडू टाकला. त्याने कॅच दिनेश कार्तिकच्या हातात सोपवला. अशा रितीने भुवनेश्वरला सामन्यातली पहिली विकेट मिळाली.

त्यानंतर दोनच चेंडूंनंतर ऋषभ पंत आणि भूवी यांनी एन्रिच नॉर्ट्जे आणि वायने पार्नेल यांच्यामध्ये झालेल्या गैरसमजुतीचा फायदा घेऊन नॉर्टजेला रन आऊट केले.

हर्षल पटेलच्या शेवटच्या ओव्हरमधला पहिला बॉल तबरेज शम्सीने लाँग ऑनवर भिरकावला. पण तिथे अवेश खानने कॅच पकडून त्याला बाद केले.

सध्या टी२०आय मालिका २-१ ने दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने कललेली आहे. भारताला आजच्या विजयाने हुरूप आला आहे. त्यामुळे शुक्रवार दिनांक १७ जून रोजी राजकोटवरील सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर चौथ्या टी२०आय मालिकेत टीम्स एकत्र येतील तेव्हाही विजयाची आशा असेल.