IND vs AFG, तिसरा एकदिवसीय: रोहित-यशस्वीच्या तडाखेबंद खेळीच्या जोरावर भारताचा अफगाणिस्तानवर दणदणीत विजय

भारताने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तानवर एकतर्फी वर्चस्व गाजवत मालिका ३-० अशी जिंकली. प्रसिध कृष्णाच्या भेदक गोलंदाजीसह रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांच्या तुफानी फलंदाजीमुळे टीम इंडियाचा विजय अत्यंत सहज झाला.

शनिवारी चेन्नई येथे झालेल्या या सामन्यात अफगाणिस्तानची सुरुवात खराब झाली असली, तरी त्यांनी ४४.२ षटकांत सर्वबाद २१८ धावा केल्या.

कर्णधार हश्मतुल्लाह शाहिदीने शानदार शतक झळकावत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले. भारताकडून प्रसिद्ध कृष्णाने घातक गोलंदाजी करत पाच विकेट्स पटकावल्या.

टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या अफगाणिस्तानची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. दुसऱ्याच षटकात सलामीवीर रहमानुल्लाह गुरबाज ५ धावा करून माघारी परतला. त्यानंतर प्रसिद्ध कृष्णाने रहमत शाह (५) आणि इब्राहिम झद्रान (११) यांना बाद करत अफगाणिस्तानच्या अडचणी वाढवल्या.

दरविश रसूलीलाही मोठी खेळी करता आली नाही आणि तोही स्वस्तात बाद झाला. पॉवरप्ले संपण्यापूर्वीच अफगाणिस्तानने चार महत्त्वाच्या विकेट्स गमावल्याने संघावर मोठा दबाव आला.

एका बाजूने सातत्याने विकेट्स पडत असताना कर्णधार हश्मतुल्लाह शाहिदीने जबाबदारी स्वीकारली. त्याने संयमी फलंदाजी करत डाव सावरला. त्याची खेळी संथ होती आणि त्याने अनेक डॉट चेंडू खेळले, मात्र कठीण परिस्थितीत विकेटवर टिकून राहणे संघासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले.

शाहिदीने १३१ चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले. त्याच्या खेळीत १३ चौकार आणि १ षटकार होता. त्याच्या खेळीमुळे अफगाणिस्तानला २०० धावांचा टप्पा पार करता आला आणि संघाने ४५व्या षटकापर्यंत फलंदाजी केली.

भारताकडून प्रसिध कृष्णा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. पॉवरप्लेमध्येच त्याने चार विकेट्स घेत अफगाणिस्तानच्या फलंदाजीचा कणा मोडला आणि नंतर आणखी एक बळी घेत आपल्या कारकिर्दीतील पाच विकेट्सचा टप्पा पूर्ण केला.

लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने धडाकेबाज सुरुवात केली. सलामीवीर रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी केली. पहिल्याच षटकात भारताने २३ धावा फटकावत आपल्या इराद्यांची स्पष्ट झलक दाखवली.

पॉवरप्लेदरम्यान भारतीय फलंदाजांनी अफगाणिस्तानच्या गोलंदाजांवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. पाच षटकांनंतर भारताची धावसंख्या बिनबाद ४२ होती.

यानंतर दोघांनीही धावगती आणखी वाढवली. रोहित आणि यशस्वीने मोठे फटके खेळत धावफलक वेगाने पुढे नेला. आठ षटकांनंतर भारत बिनबाद ७५ धावांपर्यंत पोहोचला. या दरम्यान यशस्वी जयस्वालने शानदार लयीत फलंदाजी करत अवघ्या ३७ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या खेळीत ७ चौकार आणि १ षटकार होता.

भारतीय संघाने १३व्या षटकात १०० धावांचा टप्पाही पार केला. रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांच्या भक्कम सलामी भागीदारीमुळे भारताने सामन्यावर पूर्ण नियंत्रण मिळवले. अर्धशतकानंतरही यशस्वी आक्रमकच खेळत राहिला, तर रोहितही आपल्या अर्धशतकाच्या उंबरठ्यावर पोहोचला होता.

रोहित शर्मानेही फार वेळ न दवडता १६व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर राशिद खानविरुद्ध चौकार मारत अर्धशतक पूर्ण केले. १६ षटकांनंतर भारताची धावसंख्या १२३ होती आणि दोन्ही सलामीवीर उत्कृष्ट लयीत फलंदाजी करत होते.

२१व्या षटकात भारताने १५० धावा पूर्ण केल्या. रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांच्या सलामी जोडीने अफगाणिस्तानच्या गोलंदाजीला पूर्णपणे निष्प्रभ केले. दोघांच्या शानदार फलंदाजीमुळे भारत सहज विजयाच्या दिशेने वाटचाल करत होता.

अफगाणिस्तानला अखेर २३व्या षटकात पहिले यश मिळाले. मोहम्मद नबीच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात रोहित शर्मा मिडविकेटवर झेलबाद झाला. रोहितने ६९ चेंडूंमध्ये ७९ धावांची शानदार खेळी केली, ज्यात ९ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता.

यानंतर भारताने २८.४ षटकांत १ बाद २२४ धावा करत हा सामना अत्यंत सहज जिंकला.

यशस्वी जयस्वालनेही आपल्या शतकाची नोंद केली. त्याने ८६ चेंडूंमध्ये ११० धावांची दमदार खेळी साकारली. या विजयासह भारताने सामना ९ विकेट्सने जिंकत अफगाणिस्तानचा मालिकेत ३-० असा सफाया केला. 🇮🇳