INDvZIM: निकी-दीप्तीची मोक्याच्या क्षणी दमदार खेळी, भारताचा चार विकेट्सने विजय

पहिल्या विजयासाठी भारताला चांगलाच संघर्ष करावा लागला. मात्र निकी प्रसाद आणि प्लेयर ऑफ द मॅच दीप्ती शर्माच्या शानदार कामगिरीमुळे रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या पहिल्या टी२० सामन्यात भारताने झिम्बाब्वेवर चार विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

झिम्बाब्वेची सावध सुरुवात, केलिस न्धलोवूच्या ४२ धावा

झिम्बाब्वेने सुरुवातीला सावध पवित्रा घेत आपला डाव हळूहळू उभारण्यावर भर दिला. सलामीवीर केलिस न्धलोवूने एका बाजूने डाव सावरत ४४ चेंडूंमध्ये सहा चौकारांसह ४२ धावा केल्या. तिच्या खेळीमुळे पाहुण्या संघाला सुरुवातीला स्थैर्य मिळालं आणि इतर फलंदाजांसाठी चांगला पाया रचला गेला. १० षटकांअखेर झिम्बाब्वेची धावसंख्या १ बाद ६० अशी होती. यादरम्यान केलिस आणि मुपाचिक्वा यांनी ५३ धावांची भागीदारी रचली. मात्र भारतीय महिला गोलंदाजांनी धावगतीवर नियंत्रण ठेवल्यामुळे झिम्बाब्वेच्या फलंदाजांना मोठे फटके सहजासहजी लगावता आले नाहीत.

शार्ने मेयर्सची अखेरच्या षटकांत फटकेबाजी, नंदनी शर्माच्या दोन महत्त्वपूर्ण विकेट्स

डावाच्या शेवटच्या टप्प्यात शार्ने मेयर्सने ३३ चेंडूंमध्ये चार चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद ४३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तिच्या या फटकेबाजीमुळे झिम्बाब्वेला १०० धावांचा टप्पा पार करता आला. सामन्यातील महत्त्वाच्या क्षणी तिने धावगती वाढवली. विशेषतः अरुंधती रेड्डीने टाकलेल्या १८व्या षटकात झिम्बाब्वेने १५ महत्त्वपूर्ण धावा वसूल केल्या.

दुसऱ्या बाजूला नंदनी शर्माने चार षटकांत अवघ्या ११ धावा देत दोन विकेट्स पटकावल्या. यष्टिरक्षक रिचा घोषनेही तिला उत्तम साथ दिली. झिम्बाब्वेच्या डावातील शेवटच्या षटकात रिचाने दोन फलंदाजांना यष्टिचीत करत महत्त्वाची भूमिका बजावली. अखेर झिम्बाब्वेने २० षटकांत ५ बाद ११४ धावा केल्या.

भारताची सुरुवातीलाच घसरगुंडी, झिम्बाब्वेच्या गोलंदाजांचा दबाव

झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच अचूक टप्पा आणि दिशा राखत भारतीय फलंदाजांवर दबाव निर्माण केला. उजव्या हाताची मध्यमगती गोलंदाज न्याशा ग्वान्झुराने भारताला आक्रमक सुरुवात करू दिली नाही. तिने भारतीय फलंदाजांना चांगलंच अडचणीत आणत तीन महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. भारताची आघाडीची फळी झटपट कोसळली आणि अवघ्या ३.१ षटकांत संघाची अवस्था ४ बाद १९ अशी झाली.

निकी-दीप्तीने सावरला भारताचा डाव, यजमान संघाला मिळवून दिला विजय

पदार्पणाचा सामना खेळणारी निकी प्रसाद आणि दीप्ती शर्मा यांनी कठीण परिस्थितीतही संयम सोडला नाही. दोघींनी सुरुवातीला खेळपट्टीवर स्थिरावण्यासाठी वेळ घेतला आणि त्यानंतर संधी मिळताच फटके लगावले. त्यांच्या ८२ धावांच्या भागीदारीमुळे भारताचा डाव पुन्हा रुळावर आला. दीप्तीने आक्रमक फलंदाजीची जबाबदारी स्वीकारली, तर दुसऱ्या बाजूने निकीने तिला मोलाची साथ दिली. संयम आणि योग्य वेळी केलेली फटकेबाजी यांचा सुरेख मिलाफ साधत दोघींनी सामन्याचं चित्र पालटलं. दीप्तीने ३७ चेंडूंमध्ये ४९ धावा केल्या. अखेर मेयर्सने तिचा झेल घेतला. मात्र निकीने शेवटपर्यंत नाबाद राहत ३९ धावांची शानदार खेळी केली. पदार्पणाच्या सामन्यातच तिने कमालीचा संयम आणि परिपक्वता दाखवली. भारताने हा सामना चार विकेट्सने जिंकला.

संक्षिप्त धावफलक

झिम्बाब्वे: २० षटकांत ५ बाद ११४ (शार्ने मेयर्स ४३, केलिस न्धलोवू ४२; नंदनी शर्मा २/११) पराभूत विरुद्ध भारत: १५.४ षटकांत ६ बाद ११६ (दीप्ती शर्मा ४९, निकी प्रसाद ३९*; न्याशा ग्वान्झुरा ३/१८) चार विकेट्सने.