DC vs MI: मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सकडून १० धावांनी पराभव

आयपीएल २०२४ सीझनच्या ४३ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सला दिल्ली कॅपिटल्सकडून १० धावांनी पराभव पत्करावा लागला. 

आपल्या टीमचा कर्णधार हार्दिक पांड्याने टॉस जिंकून आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने २० ओव्हर्समध्ये ४ विकेट्स देऊन २५७ धावा केल्या.

पाठलागासाठी उतरलेल्या आपल्या टीमला हे लक्ष्य पूर्ण करता आले नाही. त्यांनी २० ओव्हर्समध्ये ९ विकेट्स देऊन २४७ धावा केल्या.

दिल्ली कॅपिटल्सची सुरूवात चांगली झाली. त्यांच्या सलामी फलंदाजांनी एक दणदणीत खेळ केला. जॅक फ्रेझर मॅकगर्क आणि अभिषेक पोरेल यांनी पहिल्या विकेटसाठी ११४ धावांची भागीदारी केली. त्यानंतर पियूष चावलाने जॅकला बाद केले. त्याने एक चांगला खेळ करून ११ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने २७ चेंडूंमध्ये ८४ धावा केल्या.

१० व्या ओव्हरमध्ये अभिषेकला मोहम्मद नबीने पॅव्हिलियनला पाठवले. त्याने २७ चेंडूंमध्ये ३७ धावांचे योगदान दिले. यानंतर शाय होप आणि कर्णधार ऋषभ पंतने खेळ पुढे नेला आणि या दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी झाली.

शाय होप १७ चेंडूंमध्ये ४१ धावा करून ल्यूक वूडच्या हातून बाद झाला. ऋषभने २९ धावा केल्या. ट्रिस्टन स्टब्सने नाबाद राहून २५ चेंडूंमध्ये ४८ धावा केल्या. त्यात ६ चौकार आणि २ षटकार समाविष्ट होते. अक्षर पटेलने नाबाद ११ धावा केल्या. अशा रितीने दिल्लीने मुंबई इंडियन्ससमोर २५८ धावांचे लक्ष्य ठेवले.

पाठलागासाठी उतरलेल्या आपल्या टीमची सुरूवात चांगली झाली नाही. ईशान किशन आणि रोहित शर्मा सर्वप्रथम मैदानात उतरले. पण चौथ्या ओव्हरमध्ये मुंबईची पहिली विकेट पडली. रोहित ८ धावा करून बाद झाला. त्यानंतर ईशानचीही विकेट गेली. त्याने १४ चेंडूंमध्ये २० धावा करताना चार चौकार मारले.

तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव या दोघांनी वेगाने धावा केल्या. पण खलील अहमदने सूर्याला बाद करून मुंबईची तिसरी विकेट घेतली. सूर्याने ३ चौकार आणि २ षटकार मारून १३ चेंडूंमध्ये २६ धावा केल्या.

यानंतर १३ व्या ओव्हरमध्ये रसीख सलामने आपल्या टीमला दोन विकेट्सचे झटके दिले. हार्दिक पांड्याने ४ चौकार आणि ३ षटकार मारून २४ चेंडूंमध्ये २६ धावा केल्या.

नेहल वढेरा ४ धावांवर बाद झाला. टिम डेव्हिडने १७ चेंडूंमध्ये ३७ धावा केल्या. यानंतर तिलकदेखील बाद झाला.

तिलक वर्माने एक देखणा खेळ करत ४ चौकार आणि ४ षटकार मारून ३२ चेंडूंमध्ये ६३ धावा केल्या. मोहम्मद नबीने ७ धावा केल्या तर पियूषने १० आणि ल्यूक वूडने ९ धावा केल्या. आपल्या टीमने २० ओव्हर्समध्ये ९ विकेट्स देऊन २४७ धावा केल्या. आपल्याला १९ धावांनी पराभव पत्करावा लागला.

मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना ३० एप्रिल रोजी लखनौ सुपर जायंट्सविरूद्ध असेल.

थोडक्यात धावसंख्या

मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सकडून १० धावांनी पराभव

मुंबई इंडियन्स: २० ओव्हर्समध्ये २४७ /९ (तिलक वर्मा ६३, रसिख सलाम ३/३४)

दिल्ली कॅपिटल्स: २० ओव्हर्समध्ये २५७/४ (जॅक फ्रेझर ८४, मोहम्मद नबी १/२०)