WPL साठी मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी ल्यूक विल्यम्स यांची नियुक्ती

मुंबई, २४ सप्टेंबर २०२६: मुंबई इंडियन्सने जाहीर केले आहे की लिसा किटली यांनी मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदावरून पुढे जाण्याचा निर्णय घेतला असून, २०२७ महिला प्रीमियर लीग हंगामापूर्वी त्यांच्या जागी ल्यूक विल्यम्स यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

श्रीमती नीता एम. अंबानी म्हणाल्या, “मुंबई इंडियन्स कुटुंबात ल्यूक विल्यम्स यांचं स्वागत करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. ल्यूक यांनी विजेतेपद मिळवून देण्याची आपली क्षमता सिद्ध केली आहे. त्यांच्याकडे समृद्ध अनुभव, महिला क्रिकेटची सखोल जाण आणि खेळाडूंच्या विकासासाठी मजबूत बांधिलकी आहे. आपल्या मुलींनी WPL मध्ये अभिमानास्पद वारसा निर्माण केला आहे आणि मला विश्वास आहे की ल्यूक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि हरमनच्या नेतृत्वात त्या सातत्याने प्रगती करतील, आणखी मोठं यश मिळवतील आणि सर्वत्र युवा मुलींना मोठी स्वप्नं पाहण्यासाठी प्रेरित करतील. आपण सर्वजण मिळून या रोमांचक नव्या अध्यायाची सुरुवात करत असताना ल्यूक आणि संपूर्ण संघाला माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा.

मुंबई इंडियन्ससाठी दिलेल्या योगदानाबद्दल मी लिसा किटली यांचेही आभार मानते आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देते.”

दक्षिण ऑस्ट्रेलियाकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळलेले माजी क्रिकेटपटू ल्यूक विल्यम्स यांच्याकडे महिला क्रिकेटमधील यशस्वी कामगिरीचा समृद्ध अनुभव आहे. जगभरातील तीन प्रमुख स्पर्धांमध्ये विजेतेपद पटकावणाऱ्या संघांचा ते भाग राहिले आहेत - ऑस्ट्रेलियातील वुमन्स बिग बॅश लीग (२०२२, २०२३), इंग्लंडमधील द हंड्रेड (सहाय्यक प्रशिक्षक म्हणून, २०२३) आणि भारतातील WPL (२०२४).

मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक श्री. ल्यूक विल्यम्स म्हणाले, “मुंबई इंडियन्ससारख्या प्रतिष्ठित आणि यशस्वी संघटनेचा भाग होताना आणि या प्रतिभावान खेळाडू व सपोर्ट स्टाफसोबत काम करण्याची संधी मिळताना मी खूप उत्साहित आहे. एकत्रितपणे काहीतरी खास उभारण्याची, रोमांचक शैलीचं क्रिकेट खेळण्याची आणि यशासाठी स्पर्धा करण्याची आपल्याकडे उत्तम संधी आहे. या आव्हानासाठी मी उत्सुक आहे आणि आपल्या चाहत्यांना अभिमान वाटावा असे अनेक क्षण देण्यासाठी आतुर आहे.”

ग्रेड क्रिकेटमध्ये तीन वेळा ब्रॅडमन मेडल पटकावणाऱ्या विल्यम्स यांनी (२००५/२००६, २००७/२००८ आणि २००९/२०१० हंगाम) ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि भारतात जवळपास दोन दशकं प्रशिक्षक म्हणून काम केलं आहे. यामध्ये २०२५ पासून इंग्लंड महिला संघाचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून निभावत असलेल्या भूमिकेचाही समावेश आहे.

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने WPL च्या आतापर्यंतच्या चार हंगामांपैकी दोनदा - २०२३ आणि २०२५ मध्ये - विजेतेपद पटकावलं आहे.