आयपीएल २०२७ पूर्वी मुंबई इंडियन्सकडून नव्या प्रशिक्षकवर्गाची घोषणा

मुंबई इंडियन्सने आगामी आयपीएल २०२७ हंगामासाठी आज नव्या प्रशिक्षकवर्गाची घोषणा केली. यामध्ये रॉबिन उथप्पा यांची फलंदाजी प्रशिक्षक, मिचेल मॅक्लेनाघन यांची गोलंदाजी प्रशिक्षक, टी. दिलीप यांची क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आणि धवल कुलकर्णी यांची गोलंदाजी विकास प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

हे चौघेही मुख्य प्रशिक्षक कायरन पोलार्ड यांच्या नेतृत्वाखाली नव्या प्रशिक्षकवर्गाचा भाग असतील. मुंबई इंडियन्सच्या संस्कृतीची सखोल जाण, आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव आणि नव्या प्रतिभेला घडवून संघाला यश मिळवून देण्याचं समान ध्येय असलेला हा प्रशिक्षकवर्ग संघाला नवी दिशा देण्यासाठी सज्ज आहे.

उथप्पा, मॅक्लेनाघन आणि कुलकर्णी यांच्यासाठी ही नियुक्ती म्हणजे पुन्हा एकदा आपल्या परिचयाच्या निळ्या-सोनेरी रंगांत परतण्याची संधी आहे. या तिघांनीही यापूर्वी खेळाडू म्हणून मुंबई इंडियन्सचं प्रतिनिधित्व केलं आहे. फ्रँचायझीसोबत गेल्या सोळा वर्षांपासून जोडलेले पोलार्ड आणि हे तिन्ही माजी खेळाडू एकत्र आल्यामुळे मुंबई इंडियन्सची मूल्यं, संघाकडून असलेल्या अपेक्षा आणि जिंकण्याची मानसिकता समजून घेणाऱ्या व्यक्तींशी दीर्घकालीन नातं जपण्याची MI ची परंपरा आणखी मजबूत होणार आहे.

रॉबिन उथप्पा – फलंदाजी प्रशिक्षक

२००७ मध्ये झालेल्या पहिल्यावहिल्या आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा सदस्य असलेला रॉबिन उथप्पा भारतीय आणि फ्रँचायझी क्रिकेटमधील आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीचा मोलाचा अनुभव घेऊन येत आहे. २००८ मध्ये मुंबई इंडियन्सचं प्रतिनिधित्व केलेला उथप्पा आता आधुनिक टी२० क्रिकेटची सखोल जाण घेऊन पुन्हा संघात परतत आहे. संघाची फलंदाजी अधिक भक्कम करणं, सामन्याच्या परिस्थितीनुसार योग्य रणनीतिक निर्णय घेण्याची क्षमता विकसित करणं आणि टी२० क्रिकेटच्या बदलत्या गरजांशी जुळवून घेण्यासाठी खेळाडूंना मदत करणं, यावर त्याचा भर असेल.

मिचेल मॅक्लेनाघन – गोलंदाजी प्रशिक्षक

मुंबई इंडियन्ससोबत चार वेळा आयपीएल विजेतेपद पटकावणाऱ्या मिचेल मॅक्लेनाघनने २०१५ ते २०२० या काळात फ्रँचायझीचं प्रतिनिधित्व केलं आहे. २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मधील मुंबई इंडियन्सच्या विजेतेपदांमध्ये त्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. आपल्या जिंकण्याच्या जिद्दीसाठी आणि आक्रमक गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा मॅक्लेनाघन आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा मोलाचा अनुभव आणि टी२० गोलंदाजीची सखोल जाण घेऊन येत आहे. MI च्या व्यापक परिवाराशी त्याचं नातं कायम राहिल्यामुळे फ्रँचायझीची संस्कृती आणि खेळाडूंच्या विकासाबाबतचा दृष्टिकोन यांची त्याला उत्तम समज आहे.

टी. दिलीप – क्षेत्ररक्षण प्रशिक्षक

भारतीय पुरुष संघासोबत यशस्वी कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर टी. दिलीप आता मुंबई इंडियन्समध्ये सामील होत आहेत. २०२४ आणि २०२६ च्या आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक विजेतेपदांसह २०२५ च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपदाच्या वेळी ते भारतीय संघाच्या प्रशिक्षकवर्गाचा भाग होते. अनुभवी आणि नावाजलेले क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. खेळाडूंची चपळाई, योग्य तयारी, कामगिरीतील सातत्य आणि क्षेत्ररक्षणाचा सर्वोत्तम दर्जा राखण्यावर त्यांचा विशेष भर असतो.

धवल कुलकर्णी – गोलंदाजी विकास प्रशिक्षक

मुंबई इंडियन्ससोबत २०१३ आणि २०२० मध्ये दोन वेळा आयपीएल विजेतेपद पटकावणारा धवल कुलकर्णी पुन्हा एकदा फ्रँचायझीमध्ये परतत आहे. त्याने २००८ ते २०१३ आणि २०२० ते २०२१ अशा दोन वेगवेगळ्या कार्यकाळांत MI चं प्रतिनिधित्व केलं आहे. मुंबईच्या क्रिकेटविश्वातील परिचित चेहरा असलेल्या धवलकडे प्रदीर्घ अनुभव, भारतीय खेळपट्ट्या आणि परिस्थितीची सखोल जाण तसेच मुंबई इंडियन्सशी असलेलं घट्ट नातं ही मोठी जमेची बाजू आहे.

हंगामादरम्यान इतर प्रशिक्षकांसोबत काम करताना संघातील गोलंदाजांना, विशेषतः युवा भारतीय गोलंदाजांना घडवण्यात धवल महत्त्वाची भूमिका बजावेल. वर्षभर चालणाऱ्या त्याच्या या जबाबदारीमुळे मुंबई इंडियन्सच्या कामगिरी सुधारणा कार्यक्रमात सातत्य राखलं जाईल. त्याचबरोबर खेळाडूंच्या विकासासाठी नियमित मार्गदर्शन मिळेल आणि संघाकडे उपलब्ध असलेल्या प्रतिभावान गोलंदाजांची फळी अधिक मजबूत होईल.

पोलार्डच्या नेतृत्वाखाली हा प्रशिक्षकवर्ग एकत्रितपणे काम करत खेळाडूंच्या विकासाला चालना देईल, सर्वोत्तम कामगिरीसाठी पोषक वातावरण निर्माण करेल आणि आगामी हंगामातील आव्हानांसाठी संघाला सज्ज करेल.

आयपीएल २०२७ च्या तयारीला सुरुवात करत असताना या नियुक्तींमधून नव्या प्रतिभेला वाव देणं, नव्या कल्पनांचं स्वागत करणं आणि सर्वोच्च स्तरावर स्पर्धा करण्यास सक्षम संघ उभारणं, या मुंबई इंडियन्सच्या सातत्यपूर्ण बांधिलकीचं दर्शन घडतं.