सकारात्मक दृष्टीकोन आणि योग्य विचारसरणीः रो आणि कंपनीने या सीझनमध्ये शिकलेल्या गोष्टी

२०२२ सालचा अत्यंत कठीण आणि तावून सुलाखून काढणारा सीझन टीमला खूप काही शिकवून गेला आणि आगामी वर्षांमध्ये पुढे नेण्यासाठी अनेक बाबी त्यातून मिळाल्या.

आमचा कर्णधार रोहित शर्मा याच्यासह आमच्या काही खेळाडूंनी त्यांनी काय शिकले आणि या ज्ञानाचा भविष्यात कशा प्रकारे उपयोग होईल याबाबत विचार व्यक्त केलेत.

नेव्हर से डाय दृष्टीकोन

आमच्या कॅप्टन रो साठी या सीझनमध्ये महत्त्वाची ठरलेली एक गोष्ट म्हणजे संपूर्ण टीम घट्ट एकत्र उभी राहिली आणि सुरूवातीला निकाल अत्यंत वाईट लागले असतानाही त्यातले कुणीही थांबले नाही.

“टीममधली एकता हे चांगले चिन्ह आहे. त्यातल्या कुणीही हार मानल्याचे मला दिसले नाही. आम्ही एक कुटुंब म्हणून एकत्र राहिलो. ते सरावादरम्यान प्रयत्न करत होते आणि मला त्यांचा खूप अभिमान वाटतो. टीममधले स्नेहबंध खूप छान होते. आमचे एकच ध्येय होते आणि सर्वच त्या ध्येयाप्रति काम करत होते,” रोहित म्हणाला..

डायरेक्टर ऑफ क्रिकेट ऑपरेशन्स झहीर खान यानेही याच भावना व्यक्त केल्या.

“हा सीझन अनपेक्षित होता. पण आम्हाला ज्या गोष्टी शिकता आल्या आणि सकारात्मक बाबींवर भर द्यायचा आहे. टीम एकमेकांसोबत घट्ट राहिली आणि त्यांनी एकमेकांना पाठिंबा दिला हे पाहणे खूप आनंदाचे होते. आता आम्ही पुढच्या सीझनकडे कशा दृष्टीने पाहतो आणि कशा प्रकारे तयारी करतो हे खूप महत्त्वाचे ठरेल. आम्हाला सीझन अत्यंत सकारात्मकपणे संपवता आला. ही गोष्ट आमच्यासाठी खूप महत्त्वाची होती. आम्ही आता आणखी शक्तिशाली होऊन परतणार आहोत,” तो म्हणाला.

विविध आव्हानांशी जुळवून घेणे

आमचा जलदगती गोलंदाज रायली मेरेडिथ याच्यासाठी भारतीय स्थितीत जुळवून घेणे खूप कठीण होते. इथले वातावरण खूप उष्ण आहे आणि ऑस्ट्रेलियातल्या घरच्या खेळपट्टीपेक्षा इथे चेंडू कमी उसळत होता. पण त्याने या प्रक्रियेचा आनंद घेतला.

“इथे वातावरण ऑस्ट्रेलियापेक्षा वेगळे आहे. तुम्हाला वेगवेगळ्या भागात गोलंदाजी करावी लागते आणि वेगवेगळे बदल करावे लागतात. मला फक्त सातत्यपूर्ण खेळ करून टीमला मदत करयाची आहे. लढत राहण्याचे प्रयत्न ही एक गोष्ट अत्यंत वेगळी ठरते. हीच गोष्ट आमच्या संपूर्ण संघाने शिकली आहे. इथे सगळेच खूप स्नेहपूर्ण वागतात,” रायली म्हणाला.

आमच्या बिग हिटर टिम डेव्हिडने खेळणाऱ्या ११ च्या संघापासून थोडा वेळ बाहेर घालवला. त्याच्यासाठी हा कठीण काळ होता असे त्याने मान्य केले. पण त्याने टीमला पाठबळ देण्यासाठी खूप मेहनत केली आणि एक खेळाडू म्हणून मोठे होण्यासाठी त्याला खूप फायदा झाला.

“हा सीझन आमच्यासाठी फायदेशीर होता कारण मी आणि आमच्या टीमसमोर आव्हान होते. सीझन पुढे गेला तसतसे थोडे जुळवून घेता आले. मला ईशान, तिलक आणि रमणदीपसोबत बोलताना खूप मजा आली. बाहेर बसणे कठीण होते. पण तुम्हाला हे स्वीकारून तुमच्या टीमला शक्य तितके पाठबळ द्यावे लागले. मी फलंदाजी आणि जिममध्ये खूप मेहनत केली. मी खूप मजबूत झालो. त्यामुळे माझ्या वाढीसाठी हा कालावधी खूप छान ठरला,” डेव्हिड म्हणाला.

ऑल राऊंडर डॅनियल सॅम्सच्या फॉर्ममध्ये अगदी पहिल्या सुरूवातीच्या काही सामन्यांपासून ते सीझनच्या नंतरच्या भागापर्यंत मोठे बदल झाले. त्याला हा अनुभव समृद्ध करणारा ठरला.

“चांगले क्रिकेटपटू आणि चांगली माणसे होण्यासाठी हा आमच्यासाठी एक महत्त्वाचा सीझन ठरला. मला मानसिक ताकद वाढवण्यासाठी खूप मदत झाली. मला आव्हानांचा सामना करावा लागला. मी ज्या पद्धतीने पुनरागमन केले त्याचा मला खूप अभिमान वाटतो. एमजे त्याच्या कठीण काळात काय करत होता याची मी त्याच्याशी चर्चा केली. हा कालावधी माझ्यासाठी खूप छान ठरला,” सॅम्स म्हणाला.

वरिष्ठ खेळाडूंशी चर्चा

आमच्या सीझनमधल्या तरूण खेळाडूंसाठी रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर आणि महेला जयवर्धने आणि इतर खेळाडूंशी साधलेला संवाद अविस्मरणीय ठरला.

“सचिन, रोहित आणि महेला यांच्याशी संवाद साधल्यामुळे मला आत्मविश्वास मिळाला आणि मी अधिक परिपक्व झालो. मी वेगवेगळ्या परिस्थितीत आणि स्थितीत वेगवेगळ्या प्रकारच्या इनिंग्स खेळल्या. त्यामुळे मला बऱ्याच गोष्टी शिकता आल्या. मी प्रत्येक सामन्यानंतर रोहितशी बोललो. त्याने मला सामन्याचा आनंद घेण्याचा आणि वर्तमानकाळावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. आमचे ध्येय प्रत्येक सामना जिंकण्याचे आहे. त्यामुळे मला १०० टक्के कामगिरी करायची आहे,” तिलक वर्मा म्हणाला.

आपला सहकारी किशोरवयीन खेळाडू आणि मित्र डेवाल्ड ब्रेविस याच्यासाठी परिस्थितीबद्दल जागरूकता हा एक महत्त्वाचा विषय ठरला.

“मला संधी मिळेल त्या क्षणासाठी तयार राहायचे होते. इथल्या सगळ्या खेळाडूंनी मला फक्त सामन्याचा आनंद घेण्याचा सल्ला दिला. फक्त प्रयत्न करत राहा आणि स्वतःच्या खेळावर विश्वास ठेव. इथे सगळेच स्पेशल आहेत आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घे. मला आंतरराष्ट्रीय खेळाडूंविरूद्ध खेळताना मजा आली. मला हल्ला कधी करायचा आणि थांबायचे कधी हे क्षण ओळखता आले,” ब्रेविस म्हणाला.

हृतिक शौकीनसाठी नेट्समध्ये सामन्याच्या स्थितीत सराव केल्यामुळे त्याला प्रत्यक्ष सामन्यात उत्तम कामगिरी करता आली.

“कर्णधार आणि प्रशिक्षकांनी मला माझा खेळ आणि क्षमतांवर काम करायचा सल्ला दिला. ते माझ्याशी नेट्समध्ये सामन्याच्या स्थितीत सराव करायचा सल्ला द्यायचे. आम्ही पुढच्या सीझनसाठी बरेच काही शिकलो आहोत,” हृतिक म्हणाला.

आमचा उगवता ऑल राऊंडर रमणदीप सिंग याने पुढच्या स्तरावर आपल्याला काय घेऊन जाऊ शकते याबद्दल एक महत्त्वाची गोष्ट शिकलीय.

“पुढच्या स्तरावर तुम्हाला घेऊन जाणारी एकच गोष्ट म्हणजे आत्मविश्वास आणि तुम्ही तुमचे काम आणि मेहनत करून हे शिकता. मी सुरूवातीला रोहितशी बोललो आणि त्याच्यासारखा महान खेळाडू तुमच्या पाठीशी असतो तेव्हा तुम्हाला खूप खास वाटते. मी त्याने माझ्यासाठी तयार केलेल्या प्रक्रिया पूर्ण करत होतो. इथे सगळेच एक कुटुंब आहेत,” रमणदीपने सांगितले.

या तरूणांच्या दृष्टीकोनाबद्दल कर्णधार रोलाही खूप अभिमान वाटला. ही सकारात्मकता आणण्यासाठी सपोर्ट स्टाफने खूप महत्त्वाची भूमिका बजावली असे त्याने सांगितले.

“त्यांच्यापैकी काहीजण भविष्यात उत्तम कामगिरी करणार आहेत. या सीझनमध्ये त्यांनी उत्तम खेळ केला आणि चांगले योगदान दिले ही या सीझनमधली माझ्यावर प्रभाव टाकणारी सर्वांत महत्त्वाची गोष्ट होती. ते मानसिकरित्या अत्यंत तंदुरूस्त आहेत आणि त्यांच्यामध्ये जिंकण्याची भूक आहे. त्यांच्यापैकी अनेकजण प्रथमच खेळत होते. त्यामुळे त्यांना इथे कम्फर्टेबल वाटू देणे हे आमचे काम होते. इथे व्यवस्थापनाकडून आलेले पाठबळ महत्त्वाचे आहे आणि आमच्याकडे ते आहे याचा मला आनंद आहे. त्यांनी आम्हाला स्वातंत्र्य आणि पाठिंबा दिला. त्यामुळे भविष्यात मला या टीमसाठी उज्ज्वल भविष्याची आशा आहे,” असे रोहित शेवटी म्हणाला.

टीमचे एकत्रित प्रयत्न आमच्यासाठी सीझन अत्यंत उत्साहात संपवण्यासाठी महत्त्वाचे ठरले आणि टीमची मेहनत आणि त्यांनी शिकलेल्या गोष्टी दुसऱ्या सत्रात खूप उपयुक्त ठरल्या.

हा सीझन टीममध्ये प्रत्येकासाठीच खूप काही शिकवून जाणारा ठरलाय. आता पुढच्या सीझनची आतुरता लागून राहिली आहे!