रेड बॉल, ब्लू हार्ट: या दिवशी Hitman ने 161 धावा केल्या होत्या
13 फेब्रुवारी 2021 रोजी चेन्नई पीच धावा करायला कठीण आहे म्हणून सगळे काळजीत असताना रोहित शर्माने जे काही केले ते सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे.
इंग्लंडचा संघ मैदानात उतरला तेव्हा पीच पहिल्या सेशनपासूनच धूळ फेकणारी होती. फलंदाज घाबरलेले होते की जणू काही आपण इथे पडू असे त्यांना वाटत होते. पण तो मैदानात उतरला ते आपली मुंबईची शाना स्टाईल घेऊनच.
सामन्यात फक्त टिकायचे नव्हते तर इंग्लंडच्या लक्षात येण्यापूर्वी त्यांच्या हातातून तो खेचून घ्यायचा होता. भारत सुरुवातीला अडचणींत आला होता. पण रोहितने हार मानली नाही. बाकीचे खेळाडू धुळीत धडपडत असताना त्याने चेपोकला शिवाजी पार्कचे मैदान समजून धावा अक्षरशः चोपल्या.
जेवणाच्या वेळेपर्यंत भारतीय संघ 106/3 वर होता. पण रोहितने 47 चेंडूंमध्ये 50 धावा केल्या होत्या. त्याच्या काळजात धडधड होत नव्हती तर हेतू आणि खेळ स्पष्ट होता. आपण फक्त बसून बाद व्हायची वाट पाहू शकत नाही हे त्याला माहीत होते.
स्वीपिंग हा एक चांगला आणि सुरक्षित पर्याय आहे हे मला माहीत होते असे त्याने एएनआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
हा स्वीप शॉट त्या दिवशी त्याचे अस्त्र ठरला. त्याने स्पिनर्सना (मोईन अली आणि जॅक लीच) भंडावून सोडले. संध्याकाळी 6.00 वाजता दादरला होणाऱ्या गर्दीतून वाट काढणे जसे दिव्य असते तसे त्याने गॅपमधून जागा शोधून फटकेबाजीचे दिव्य पार पाडले. 231 चेंडूंमध्ये 161 धावा त्याने केल्या. त्यात 18 चौकार आणि दोन षटकार होते. प्रत्येक धाव कठीण असलेल्या पिचवर त्याने पहिल्या दिवशी भारताची अर्ध्यापेक्षा जास्त धावसंख्या पूर्ण केली. त्याचं हे क्लासिक खडूस क्रिकेट होतं. जबरदस्त, तडाखेबाज आणि लय भारी!
पलटनला तर घरी आल्यासारखे वाटले. गणवेश वेगळा पण कडक मुंबई स्पिरीट. अशा मैदानात जिथे खेळणे जवळपास अशक्य आहे तिथे रोहितने स्वतःला सिद्ध केले. शांत, संयमी आणि जबरदस्त. मुंबईचा लाडका छोकरा!