गंभीर दुखापत, पुन्हा खेळण्यासाठी त्याने इंजेक्शन्स घेतले- रोहितबद्दल द्रविड सांगतोय

खेळ संपला होता. प्रत्येक ओव्हरसोबत पिच टणक होत होते. भारतीय संघाचे ७ फलंदाज बाद झाले होते आणि त्यांना आवश्यक असलेला रनरेट प्रतिओव्हर ८ पेक्षा जास्त होता तर विजयासाठी ५९ धावांची गरज होती. साधारण १५ चेंडू आणि सहा धावानंतर महत्त्वाचा फलंदाज दीपक चहर बाद झाला. बांग्लादेशसाठी २-० ने मालिका जिंकणे सोपे झाले.

रोहित शर्माला जोरदार दुखापत झाली होती आणि स्लिप्समध्ये कॅच पकडताना त्याचे बोट सरकले होते. तो हॉस्पिटलमधून परतला आणि ९ व्या क्रमांकावर खेळायला जाणार होता. मोहम्मद सिराज दुसऱ्या बाजूला होता. एकूणच गणित: ५९ धावा | २९ चेंडू | २ विकेट्स शिल्लक.

या सगळ्या परिस्थितीत सिराजला संपूर्ण ओव्हरमध्ये चेंडूला बॅटसुद्धा लावता आली नाही. अशीच आणखी एक ओव्हर गेली आणि त्यात फक्त एक धाव काढली गेली. भारताला एका जादूची गरज होती. ती जादू म्हणजे आपला कर्णधार होता. तुटलेला ग्लोव्ह आणि अंगठ्यातून दिसणारे प्लास्टर असतानाही त्याने फटकेबाजी सुरू केली.

"त्याला हॉस्पिटलला जावे लागले. त्याचा हाताला खूप जास्त इजा झाली होती. त्याला हाड हॉस्पिटलमध्ये जाऊन जुळवावे लागले, एक दोन इंजेक्शन्स घ्याव्या लागल्या आणि मग तो मैदानात उतरला. तो खेळायला उतरायला आणि प्रयत्न करायला खूप उत्सुक होता ही खूप मोठी गोष्ट आहे. त्याने आपल्याला विजयाच्या किती जवळ आणले ही अत्यंत आश्चर्यकारक गोष्ट आहे," सामन्यानंतर भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने सांगितले.

त्याने खरोखरच आटोकाट प्रयत्न केला. २९ चेंडूंमध्ये ५९ धावांपासून २४ चेंडूंमध्ये ४१ धावा ते १२ चेंडूंमध्ये ४० धावा ते ६ चेंडूंमध्ये २० धावा, २ चेंडूंमध्ये १२ धावा आणि १ चेंडूत ६ धावा. तो एकखांबी तंबूसारखा पाय रोवून उभा राहिला आणि एकच हात फिट असताना त्याने धुंवाधार फलंदाजी केली.

नंतर बांग्लादेशविरूद्ध आपण २-०ने हरलो पण लढल्याशिवाय नाही. एकांडा शिलेदार, कठीण परिस्थिती, प्रचंड वेदना आणि त्रास असतानाही खेळला. आपला कर्णधार रो... रोंरावत आला!