लॉर्ड ठाकूर – २०१० मध्ये नेट गोलंदाज- २०२५ मध्ये नवीन चेंडूने गोलंदाजी

ट्रेनच्या दारातून वानखेडेकडे स्वप्नाळू नजरेने पाहण्यापासून ते मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूममध्ये उभे राहण्यापर्यंत त्याचा प्रवास एमआय खरोखर काय आहे याचे एक प्रतिबिंब आहे.

नवीन सीझनमध्ये मुंबई इंडियन्सने शार्दुल ठाकूरला संघात आणून या फ्रँचायझीच्या संस्कृतीची व्याख्या स्पष्ट केली आहे. शार्दुल ऊर्फ लॉर्ड ठाकूरची ही कोणालाही माहीत नसलेली गोष्ट. 🔥

या तरूण खेळाडूसाठी एमआयचा प्रवास २०१० मध्ये एक सहाय्यक खेळाडू म्हणून सुरू झाला. तेव्हा तर आयपीएल काँट्रॅक्टचा विषयही चर्चेत नव्हता. ड्रेसिंग रूममध्ये लवकर प्रवेश झाल्यामुळे आपल्या करियरला एक नवीन आयाम मिळाल्याचे त्याने मुंबई इंडियन्ससोबत संवाद साधताना सांगितले.

“माझ्या करियरच्या सुरूवातीच्या टप्प्यात ड्रेसिंग रूमचा अनुभव मिळणे ही माझ्यासाठी उत्तम गोष्ट होती. मला वरिष्ठ खेळाडूंसोबत संवाद साधता आला. मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये मला खूप प्रेमाने वागवले गेले. मुंबई इंडियन्सच्या संस्कृतीचा परिणाम माझ्या करियरवरही झाला.”

नेटमधल्या त्याच्या उत्तम कामगिरीमुळे लवकरच त्याच्यासाठी मोठे दरवाजे उघडले गेले.

“मला सराव सामने खेळण्यास सांगितले गेले. त्यामुळे माझा आत्मविश्वास आणि उत्साह खूप वाढला आणि मी वेगाने विकेट्स घेऊ लागलो.”

राहुल संघवी आणि पारस म्हाम्ब्रे आपल्याला नियमित मार्गदर्शन करत असल्याचे तो सांगतो. महान खेळाडूंच्या आसपास राहण्याचे क्षण अत्यंत सुंदर होते.

मी सचिन तेंडुलकर, हरभजन सिंग, मुनाफ पटेल, अँड्रूय सायमंड्स, रोहित शर्मा, अंबाटी रायाडू … यांना बघत होतो आणि मी त्यांच्यासोबत ड्रेसिंग रूम शेअर करत होतो. हे स्वप्नच असावे असे मला वाटत होते.”

अर्थात त्याची स्वप्ने त्याहीपूर्वीची आहेत. त्या काळातली जेव्हा तो धावत्या ट्रेनमधून वानखेडेकडे बघायचा. “ट्रेन इथून जायची तेव्हा आम्ही आमच्या सीट्सवरून उठायचो, दाराजवळ यायचो आणि कोणी प्रॅक्टिस करताना दिसतंय का ते पाहायचो. सचिन तेंडुलकर खेळतानाची एक झलकसुद्धा आम्हाला खूश करून जायची”, तो म्हणाला.

आता शार्दुलला मुंबई इंडियन्सच्या संघात सहभागी केल्यामुळे तो एकमेवाद्वितीय शाणा- रोहित शर्मासोबत खेळणार आहे.

"सगळे सोबत बसू तेव्हा अजून आम्हाला कळेल. खूप मजा येईल," असे शार्दुल रोहितसोबतच्या आपल्या नात्याबाबत म्हणाला. “त्याने मला कम्फर्टेबल केले, त्याच्यासोबत बोलू दिले आणि व्यक्त होऊ दिले. आम्ही एकमेकांसोबत कम्फर्टेबल झालो आणि त्याने त्यात महत्त्वाची भूमिका बजावली”, शार्दुल पुढे म्हणाला.

फ्लडलाइट्सवर वानखेडे उजळताना पाहण्यापासून ते एमआयचा खेळाडू म्हणून तिथे खेळेपर्यंत त्याचा प्रवास एका परिकथेपेक्षा कमी नाही. त्यात एमआयची गोष्ट आहे, जिथे मेहनत आणि आशा एकत्र येतात आणि स्वप्नांना दिशा मिळते.