शिखर धवनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाची वेस्ट इंडिजविरूद्ध तीन सामन्यांच्या ओडीआयमध्ये कसोटी
इंग्लंडमध्ये व्हाइट बॉल स्वरूपातील दोन्ही मालिका खिशात टाकल्यानंतर भारतीय क्रिकेट टीम आता २२ जुलै पासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत आयोजक वेस्ट इंडिजविरूद्ध खेळणार आहे.
बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया (बीसीसीआय)ने आपल्या अनेक पहिल्या खेळाडूंना कॅरेबियनमध्ये आयोजित आगामी ओडीआय मालिकेत विश्रांती देण्याचे ठरवले आहे. त्यात कर्णधार रोहित शर्मा, जसप्रीत बुमरा, विराट कोहली, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या आणि मोहम्मद शामी यांचा समावेश आहे.
रोहितच्या अनुपस्थितीत त्याचा दीर्घकालीन सलामीचा फलंदाज असलेला जोडीदार शिखर धवन याच्याकडे भारतीय ओडीआय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. स्टार ऑल राऊंडर रवींद्र जडेजा याला उपकर्णधारपदाची धुरा देण्यात आली आहे.
धवनच्या नेतृत्वाखाली भारताने मागी वर्षी श्रीलंकेत तीन सामन्यांची एक दिवसीय मालिका २-१ ने जिंकली होती.
दरम्यान तरूण तडफदार फलंदाज शुभमन गिल आणि विकेट कीपर फलंदाज संजू सॅम्सन यांनी भारताच्या ओडीआय संघात पुनरामगन केले आहे. गिल भारतीय ओडीआय स्वरूपात ऑस्ट्रेलियात २०२० मध्ये खेळल्यानंतर प्रथमच खेळणार आहे तर सॅम्सन ऋषभ पंतच्या जागेवर ईशान किशनखेरीज दुसरा विकेट कीपर म्हणून खेळेल.
या १६ खेळाडूंच्या भारतीय ओडीआय संघातील जलदगती गोलंदाजीचे पर्याय म्हणून अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर आहेत. युजवेंद्र चहल, अक्सर पटेल आणि जडेजा हे तीन स्पिनर्स आहेत.
अलीकडेच झालेल्या ओडीआय होम मालिकेत बांग्लादेशकडून ०-३ चा सपशेल पराभव पत्करलेला वेस्ट इंडिजचा संघ पुनरागमनाच्या प्रतीक्षेत आहे.
निकोलस पूरनच्या नेतृत्वाखालील यजमान संघाने भारतीय मालिकेसाठी आपल्या १३ खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे.
वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार जेसन होल्डरला बांग्लादेश मालिकेनंतर आराम देण्यात आला होता. तो आता पुन्हा ओडीआय संघात परतला आहे.
डावखुरा स्पिनर गुदाकेश मोतीने बांग्लादेश मालिकेत चमकदार कामगिरी केली होती. त्याने वेस्ट इंडिज ओडीआयमध्ये आपली जागा कायम राखली आहे.
वेस्ट इंडिज विरूद्ध भारत यांची आकडेवारी
भारताने ओडीआय सामन्यांच्या विजयाच्या संख्येत वेस्ट इंडिजवर थोडेसे वर्चस्व गाजवले आहे. त्यांनी आतापर्यंत खेळलेल्या १३६ सामन्यांपैकी ६७ सामने जिंकले आहेत. वेस्ट इंडिजने ६३ सामने जिंकले आहेत. दोन सामने बरोबरीत संपले तर चार सामन्यांचा निकाल लागला नाही.
या खेळाडूंवर असेल लक्ष
भारताचा धडाडीचा फलंदाज सूर्यकुमार यादवकडे प्रेक्षकांचे लक्ष असेल. इंग्लंडविरूद्ध तीन टी२०आय मध्ये १७१ धावा काढल्यानंतर सूर्यकुमार यादवची एकदिवसीय मालिका खूप साधारण ठरली. त्याने तीन सामन्यांत फक्त ४३ धावा केल्या. भारताने आपल्या अनेक स्टार्सना आराम दिल्यामुळे या मुंबई इंडियन्सच्या स्टारवर मधल्या फळीत जास्त जबाबदारी येईल आणि त्याला कॅरेबियन्समध्ये जास्त धावा कराव्या लागतील.
गोलंदाजीबाबत सांगताना भारताचा युजवेंद्र चहल अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावेल. हा स्टार लेग स्पिनर इंग्लंडमधल्या उत्तम गोलंदाजांपैकी एक ठरला. त्याने ५.३५ च्या सरासरीने तीन एक दिवसीय सामन्यांत सात विकेट्स घेतल्या.
वेस्ट इंडिजसाठी बलाढ्य भारतीय संघाविरूद्ध उत्तम कामगिरी करण्याची जबाबदारी कर्णधार निकोलस पूरनवर असेल. या खेळाडूने बांग्लादेशविरूद्ध तीन टी२०आय सामन्यांत १०८ धावा कुटल्या आणि त्यानंतर तीन एकदिवसीय सामन्यांत ९१ धावा केल्या. यजमान संघाला भारताविरूद्ध एकदिवसीय मालिका जिंकायची असल्यास पूरनच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असेल.
वेस्ट इंडिज विरूद्ध भारत हे तिन्ही एकदिवसीय सामने पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदादवरील क्वीन्स पार्कवर खेळवले जातील. सामने भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७ वाजता सुरू होतील.