SLvIND पहिली कसोटी रिपोर्ट: पडिक्कलचे शतक, सुथारच्या १० विकेट्सच्या जोरावर भारताचा दिमाखदार विजय
श्रीलंकेतील गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने सुरुवातीपासूनच आपला सर्वोत्तम खेळ दाखवला आणि शानदार विजय मिळवण्याचा विश्वास कायम ठेवला. प्लेयर ऑफ द मॅच देवदत्त पडिक्कलच्या १६७ धावा आणि मानव सुथारच्या १० विकेट्स (४/७६ आणि ६/५५) यांच्या जोरावर भारताने १६५ धावांनी दणदणीत विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. यासोबतच भारताने आपली ६००वी कसोटी विजयाने साजरी केली.
दिवस १: पडिक्कलचे पहिले कसोटी शतक, केएल राहुलचे क्लासिक अर्धशतक
गॉलचे मैदान देवदत्त पडिक्कलच्या धावांच्या आतषबाजीचे साक्षीदार ठरले. त्याचे पहिले कसोटी शतक भारतीय चाहत्यांसाठी पर्वणीच ठरले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या भारताला यशस्वी जैस्वालच्या रूपात सुरुवातीलाच धक्का बसला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या पडिक्कलने केएल राहुलसोबत भारताचा डाव सावरत १५० धावांची भागीदारी रचली. पडिक्कल १७८ चेंडूंमध्ये १२ चौकार आणि एका षटकारासह १३१ धावांवर नाबाद राहिला, तर केएलने रिटायर्ड हर्ट होण्यापूर्वी उपयुक्त ७७ धावा केल्या. कौशल्य, नजाकत आणि वाढत्या आत्मविश्वासासह प्रतिस्पर्ध्यांवर प्रतिहल्ला चढवत पडिक्कलने संयमी खेळी साकारली. पहिल्या दिवसअखेर भारताने ७३ षटकांत २ बाद २८८ धावा केल्या. प्रभात जयसूर्याने एक विकेट घेतली.
दिवस २: पावसाच्या व्यत्ययानंतरही भारताची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल
दुसऱ्या दिवशी पावसामुळे पहिले दीड सत्र वाया गेले, तरी भारताने सामन्यावरील पकड कायम ठेवली. फलंदाजी पुन्हा सुरू झाल्यानंतर पडिक्कलने आपला शानदार फॉर्म कायम राखत भारताचे वर्चस्व अबाधित ठेवले. निरोशन डिकवेलाने यष्टिचित करण्यापूर्वी त्याने १६७ धावांची शानदार खेळी केली. दुसरीकडे, केएल राहुल ८२ धावांवर झेलबाद झाला. ध्रुव जुरेलनेही उत्तम फलंदाजी करत ६८ चेंडूंमध्ये एक षटकार आणि चार चौकारांसह ५१ धावा केल्या. डावखुरा ऑर्थोडॉक्स फिरकीपटू प्रभात जयसूर्या श्रीलंकेचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने १०९ धावांत चार विकेट्स घेतल्या. दुसऱ्या दिवसअखेर भारताने ११६ षटकांत ९ बाद ४६० धावा केल्या.
दिवस ३: दिनुषाचे झुंजार शतक, सुथार-जडेजाच्या फिरकीपुढे श्रीलंकेच्या सात विकेट्स
भारताचा पहिला डाव ११६.४ षटकांत ४६२ धावांवर संपुष्टात आला. प्रत्युत्तरात श्रीलंकेची सुरुवात खराब झाली आणि २६.१ षटकांत त्यांची अवस्था ५ बाद ९० अशी झाली. मात्र, त्यानंतर सोनल दिनुषा आणि निरोशन डिकवेला यांनी १४६ धावांची भागीदारी करत श्रीलंकेला सामन्यात परत आणले. दिनुषाने १०० धावा केल्या, तर डिकवेलाने ८० धावांचे योगदान दिले.
भारतीय गोलंदाजांनी अचूक योजना आखून शिस्तबद्ध मारा केला. खेळपट्टीवरून मिळणाऱ्या अतिरिक्त वळणाचा पुरेपूर फायदा घेत फिरकीपटू मानव सुथारने ४/७६, तर रवींद्र जडेजाने ३/५७ अशी कामगिरी केली. तिसऱ्या दिवसअखेर श्रीलंकेचा पहिला डाव ७९.४ षटकांत २८४ धावांवर आटोपला.
दिवस ४: ऋषभ पंतने वेधले लक्ष, सामन्यावर भारताची मजबूत पकड
दुसऱ्या डावात भारताने ४८.५ षटकांत १९३ धावा केल्या. ऋषभ पंतने महत्त्वपूर्ण खेळी करत ६९ चेंडूंमध्ये आठ चौकार आणि दोन षटकारांसह ६६ धावा केल्या.
याच खेळीदरम्यान पंतने कसोटी क्रिकेटमध्ये १०० षटकारांचा टप्पाही गाठला. हा पराक्रम करणारा तो पहिला भारतीय आणि जगातील सर्वात जलद फलंदाज ठरला.
पहिल्या डावातील फॉर्म कायम ठेवत पडिक्कलने ७५ चेंडूंमध्ये ४४ धावांचे योगदान दिले. असिथा फर्नांडोने चार महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. अखेरच्या डावात विजयासाठी लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेने दिवसअखेर ३४ षटकांत ४ बाद ८४ धावा केल्या. भारताला विजयासाठी आता केवळ सहा विकेट्सची गरज होती.
दिवस ५: मानव सुथारच्या सहा विकेट्स, भारताचा पहिल्या कसोटीत विजय
अखेरच्या दिवसाच्या सुरुवातीपासूनच भारताने श्रीलंकेवर प्रचंड दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. यजमान संघाने मात्र हार न मानता संघर्ष सुरू ठेवला. पण मानव सुथारच्या मनात काही वेगळेच होते. त्याने ७६व्या षटकात तीन विकेट्स घेत श्रीलंकेला मोठा धक्का दिला आणि दुसऱ्या डावात सहा विकेट्स पूर्ण केल्या. यासह त्याने संपूर्ण सामन्यात १० विकेट्स आपल्या नावावर केल्या.
अखेर भारताने श्रीलंकेचा दुसरा डाव ७७.४ षटकांत २०६ धावांवर गुंडाळत १६५ धावांनी शानदार विजय मिळवला.
संक्षिप्त धावफलक
भारत: ११६.४ षटकांत ४६२ (देवदत्त पडिक्कल १६७, केएल राहुल ८२; प्रभात जयसूर्या ४/१०९) आणि ४८.५ षटकांत १९३ (ऋषभ पंत ६६; असिथा फर्नांडो ४/३१)
श्रीलंका: ७९.४ षटकांत २८४ (सोनल दिनुषा १००; मानव सुथार ४/७६) आणि ७७.४ षटकांत २०६ (सोनल दिनुषा ८४, धनंजय डी सिल्वा ५९; मानव सुथार ६/५५)
निकाल: भारताचा १६५ धावांनी विजय.