टिम डेव्हिड हा अतिशय बुद्धिमान खेळाडू आहेः ईशान किशन

विकेट कीपर आणि ओपनर ईशान किशन याने सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला आणि टिम डेव्हिड, त्याचा स्वतःचा फॉर्म आणि रमणदीप सिंगची उत्तम कामगिरी यांच्याबाबत चर्चा केली.

टिम डेव्हिडच्या अलीकडच्या सामन्यांमध्ये तडाखेबाज पॉवर हिटिंगबाबत विचारले असता ईशानने डेव्हिडचे खूप कौतुक केले.

“मी डेव्हिडला जेवढं पाहिलं आहे त्यावरून तो खेळ खूप गांभीर्याने खेळतो. तो फक्त षटकार ठोकण्यासाठी उत्सुक नसतो तर तो मेरिटवर बॉल टोलवतो आणि आपल्या खेळाबद्दल तो प्रशिक्षकांशीही चर्चा करतो. त्याला हे माहीत आहे की पहिल्या चेंडूपासूनच त्याला जोरदार धावा करायच्या आहेत. त्याच्या फटक्यांमध्ये इतकी ताकद आहे की तो हे सहजपणे करू शकतो. गोलंदाजाची फक्त एक चूक आणि चेंडू थेट सीमापार जातो. तो खरोखर एक टॅलेंटेड खेळाडू आहे,” ईशान म्हणाला.

सीझनच्या मध्यावर टिम डेव्हिडला खेळणाऱ्या ११ च्या संघात न घेतल्याबद्दल बोलताना ईशानने हे टीमच्या हितामध्येच ठरवण्यात आल्याचे सांगितले.

“व्यवस्थापन कायम टीमसाठी योग्य असतील तेच निर्णय घेते. डेव्हिडसाठी हे दुर्दैवी होते. परंतु त्यामुळे त्याला भारतीय परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी मदत झाली. त्यामुळे त्याला स्वतःवर काम करण्याची संधी मिळाली आणि तुम्ही त्याचा परिणाम पाहतच आहात,” तो म्हणाला.

तीन विकेट्स घेऊन शेवटच्या टप्प्यात अत्यंत धमाकेदार फटके मारून लोकांच्या नजरेत भरलेल्या रमणदीपचेही ईशानने कौतुक केले.

“रमणदीप एक चांगला खेळाडू आहे. त्याने स्वतःवर नीट काम केले तर तो एक उत्तम दर्जाचा ऑल राऊंडर होऊ शकतो,” तो म्हणाला.

स्वतःच्या फॉर्मबद्दल सांगताना ईशानने सुरूवातीचे काही सामने कठीण गेल्यानंतर स्वतःच्या खेळात काही बदलले असल्याच्या गोष्टीला नकार दिला.

“परिस्थितीनुसार खेळणे कायम महत्त्वाचे असते- तुम्हाला कधीकधी १०० टक्के खेळ करावा लागतो तर कधीकधी तुम्हाला विकेट आणि प्रतिस्पर्धी यांचा अभ्यास करण्यासाठी वेळ द्यावा लागतो. प्रत्येक दिवस आणि प्रत्येक खेळ वेगळा आहे. त्यामुळे फलंदाजालाही त्यानुसार जुळवून घ्यावे लागते. सर्वोत्तम खेळाडूसुद्धा हे करतात. टीममध्ये तुमची जबाबदारी काय आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे,” ईशान म्हणाला.

टिम डेव्हिडने केलेल्या धुंवाधार फलंदाजीनंतर आलेला निकाल पचवणे खूप कठीण आहे. परंतु या लढवय्या कामगिरीमुळे आम्हाला २१ मे रोजी सीझनच्या शेवटच्या सामन्यात प्रोत्साहन मिळाले आहे.