“कर्णधार आणि प्रशिक्षकांनी माझ्या गोलंदाजीवर विश्वास ठेवून स्वातंत्र्य दिले”: विल जॅक्स

आपले बॉइज इन गोल्ड अँड ब्लू पंजाब किंग्सचा सामना करण्यासाठी तयार आहेत आणि आपल्याला विजय मिळाल्यास मंगळवारी होणाऱ्या क्वालिफायर १ मध्ये स्थान मिळेल.

जयपूरमध्ये तयारी तर जोरात सुरू आहे. टाटा आयपीएल २०२५ गुणतक्त्यावर १६ गुणांसह आपण चौथ्या क्रमांकावर आहोत. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या श्रेयसच्या टीमपेक्षा एकच गुण आपल्याकडे कमी आहे.

सोमवारी सवाई मानसिंग स्टेडियमवर होणाऱ्या या मोठ्या सामन्यापूर्वी विल जॅक्सने कॅम्पमधल्या मूडबद्दल चर्चा केली.

“आमच्या कॅम्पमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आम्ही संपूर्ण स्पर्धेत खूप चांगल्या प्रकारे तयारी करत आहोत. आम्ही चांगले खेळत होतो आणि मग ब्रेक पडला. परंतु परत आल्यापासून आम्हाला खूप चांगले वाटते आहे. आम्ही आधी जितके सज्ज होतो तितकेच आताही तयार आहोत,” जॅक्स म्हणाला.

“माझी जबाबदारी लवचिक आहे. कधीकधी मी तिसऱ्या क्रमांकावर होतो तर कधी पुढच्या फळीत खेळायला गेलो. टीम माझ्यावर जी जबाबदारी टाकेल ती पूर्ण करायला मला आनंद वाटतो.

“आमच्याकडे उत्तम फलंदाज आहेत. कधीकधी इतर खेळाडू काही परिस्थितीत चांगली कामगिरी करू शकतात असे वाटते. मला इथे खूप मजा आली. मी खूप खूश आहे,” सीझनमधल्या आपल्यावरील जबाबदारीबाबत बोलताना त्याच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता.

या सीझनमध्ये आपल्या गोलंदाजीने आपण खूश असल्याचेही त्याने सांगितले.

“माझ्या कर्णधाराने (हार्दिक पांड्या) आणि प्रशिक्षकांनी माझ्या गोलंदाजीवर विश्वास ठेवून मला स्वातंत्र्य दिले. मी गोलंदाजीला येतो तेव्हा हार्दिक माझा उत्साह वाढवतो आणि मला चिअर अप करतो.”

या सीझनमध्ये उत्तम फॉर्ममध्ये असलेल्या सूर्यकुमार यादवचेही त्याने कौतुक केले.

“स्काय हा अत्यंत चांगला खेळाडू आहे. तो प्रत्येक सामन्यात सातत्यपूर्ण खेळतो. तो अत्यंत हुशार आहे. प्रत्येक ठिकाणासाठी आणि आपण ज्याच्याविरूद्ध खेळणार आहोत त्या गोलंदाजाचा अभ्यास करतो. त्याच्याकडे योजना तयार असते आणि ती तो पार पाडतो. त्यामुळे त्याच्या सातत्यपूर्ण खेळात भर पडते. मला त्याच्याकडून खूप काही शिकायला मिळाले आहे,” जॅक्स म्हणाला.