News

MI vs DC: मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून पहिला विजय नोंदवला

By Mumbai Indians

मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला २९ धावांनी हरवून या सीझनचा पहिला विजय आपल्या नावावर नोंदवला आहे.

मुंबई इंडियन्सने रविवारी आयपीएल २०२४ चा आपला चौथा सामना दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध खेळला. MI vs DC सामन्यात ऋषभ पंतने दिल्ली कॅपिटल्सच्या वतीने टॉस जिंकून एमआयला प्रथम फलंदाजी करायला आमंत्रित केले.

हार्दिक पांड्या अँड कंपनीने आपल्या नियत २० ओव्हर्समध्ये पाच विकेट्स देऊन २३४ धावा केल्या.

एमआयच्या वतीने रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी खेळायला सुरूवात केली आणि दोन्ही सलामी फलंदाजांनी मुंबई इंडियन्सला एक चांगली सुरूवात करून दिली. धावफलकावर ८० धावा दिसत असताना रोहित शर्मा बाद झाला. या दरम्यान आपला हिटमॅनने २७ चेंडूंमध्ये ४९ धावांची जोरदार कामगिरी केली. त्याने तीन षटकार आणि सहा चौकार मारले.

यानंतर ईशानच्या मदतीला सूर्यकुमार यादव मैदानात आला. आपला सूर्यादादा मैदानावर परतला आहे. परंतु तो शून्यावरच बाद झाला. अशा रितीने ९ ओव्हर्सनंतर आपल्या टीमची धावसंख्या दोन विकेट्सवर ९२ धावा अशी होती.

या दरम्यान ईशान किशन २३ चेंडूमध्ये ४२ धावा करून बाद झाला. त्यानंतर तिलक वर्मा ६ धावा करून खलील अहमदच्या चेंडूवर बाद झाला. १६ ओव्हर्स संपल्या तेव्हा एमआयची धावसंख्या चार विकेट्स देऊन १५० अशी होती. क्रीझवर टिम डेव्हिड आणि कर्णधार हार्दिक पांड्या यांनी जम कायम ठेवला होता.

आपली धावसंख्या १८१ असताना हार्दिक पांड्या बाद झाला. हार्दिकने ३३ चेडूंमध्ये एक षटकार आणि तीन चौरा मारून ३९ धावा केल्या.

टिम डेव्हिडची मदत करण्यासाठी मैदाना रोमारिओ शेफर्ड आला. या दोघांनी मिळून अत्यंत स्टायलिश पद्धतीने एमआयची धावसंख्या २० ओव्हर्समध्ये २३४ धावांवर नेऊन पोहोचवली.

रोमारिओ शेफर्डने २० व्या ओव्हरमध्ये तूफानी खेळ करून ३२ धावा केल्या. या सीझनमध्ये एकाच ओव्हरमध्ये केलेल्या या सर्वाधिक धावा होत्या. अशा रितीने मुंबई इंडियन्सने पाच विकेट्स देऊन २३४ धावा केल्या.

मुंबई इंडियन्सच्या या भल्यामोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायला उतरलेल्या ऋषभ पंत अँड कंपनीची सुरूवात विशेष नव्हती. तीन ओव्हर्स संपल्यानंतर दिल्लीची धावसंख्या फक्त १५ वर होती. पुढच्याच ओव्हरमध्ये रोमारिओ शेफर्डने डेव्हिड वॉर्नरला फक्त १० धावांवर बाद केले.

यानंतर दिल्लीकडून पृथ्वी शॉ आणि अभिषेक पोरल यांनी मिळून खेळ पुढे नेला. आपल्या जोरदार फटकेबाजीसमोर दिल्लीचे फलंदाज फार टिकले नाहीत. दहाव्या ओव्हरच्या शेवटी दिल्लीची धावसंख्या एका विकेटमध्ये ९४ होती.

जसप्रीत बुमराने १२ व्या ओव्हरमध्ये पृथ्वी शॉ (६६) आपली शिकार करून एमआयला मोठा विजय मिळवून दिला. यानंतर बुमराने १५ व्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर अभिषेक (४१) ला बाद केले आणि दिल्लीला बॅकफूटवर टाकले.

या दरम्यान ट्रिस्टन स्टब्स (७१*) सोडून दिल्लीच्या इतर फलंदाजांना फारसे चांगले खेळता आले नाही. दिल्ली कॅपिटल्सचा संघ आपल्या नियत २० ओव्हर्समध्ये आठ विकेट्स देऊन फक्त २०५ धावा करू शकला. अंतिमतः त्यांना एमआयकडून २९ धावांवर पराभव पत्करावा लागला.

एमआयसाठी गेराल्ड कोत्झीने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या, जसप्रीत बुमराने दोन आणि रोमारिओ शेफर्डने एक विकेट घेतली.

मुंबई इंडियन्स टीम आता येत्या गुरूवार दिनांक ११ एप्रिलला आपला पुढचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरूद्ध खेळेल.