AFGvIND पहिला टी२० सामना: अभिषेकची वादळी खेळी, भारताची मालिकेत १-० अशी आघाडी

AFGvIND पहिला टी२० सामना: अभिषेकची वादळी खेळी, भारताची मालिकेत १-० अशी आघाडी

By Mumbai Indians

अभिषेक शर्माच्या शानदार ८२ धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने अफगाणिस्तानविरुद्धची आपली विजयी घोडदौड कायम राखली. अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या पहिल्या टी२० सामन्यात भारताने सात विकेट्सने दणदणीत विजय मिळवत तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

बुमराहचा सुरुवातीलाच प्रहार, टी२० क्रिकेटमध्ये ३५०वी विकेट

बूम बूम, मानलं! क्रिकेटच्या सर्वात छोट्या फॉरमॅटमध्ये भारताच्या गोलंदाजीची सुरुवात करताना JB ने पहिल्याच षटकात रहमानुल्लाह गुरबाजची महत्त्वपूर्ण विकेट घेतली. बॅक ऑफ लेंथ चेंडूवर गुरबाज फसला आणि अभिषेक शर्माने शानदार लो कॅच घेत कोणतीही चूक केली नाही. बुमराहने टी२० क्रिकेटमधील आपली ३५०वी विकेट पूर्ण केली आणि चहल व भुवनेश्वर कुमारनंतर हा टप्पा गाठणारा तो तिसरा भारतीय गोलंदाज ठरला. त्याने २६ धावांत १ विकेट अशी कामगिरी केली.

भारताने लावला ब्रेक, यजमानांची ५ बाद ४३ अशी अवस्था

मेन इन ब्लूने आपली रणनीती अचूकपणे राबवल्यामुळे अफगाणिस्तानचा संघ अडचणीत सापडला. कर्णधार इब्राहिम झादरान अतिरिक्त धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला. भारताने चौथ्या षटकातच फिरकी गोलंदाजीचा वापर केला. त्यानंतर सेदिकुल्लाह अटल, गुलबदिन नायब आणि दरविश रसूली यांच्या विकेट्स झटपट पडल्या. ६.६ षटकांत अफगाणिस्तानची अवस्था ५ बाद ४३ अशी झाली आणि पॉवरप्लेमध्ये भारताने सामन्यावर आपली पकड मजबूत केली. अर्शदीप सिंग, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

अझमतचे महत्त्वपूर्ण अर्धशतक, अर्शदीपच्या खात्यात तीन विकेट्स

अफगाणिस्तानसाठी पुनरागमन कठीण वाटत असतानाच अझमतुल्लाह ओमरझाईने आपल्या संघाला २० षटकांत ८ बाद १५६ अशा सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले. त्याने ४४ चेंडूंमध्ये नाबाद ६४ धावांची शानदार खेळी केली. यादरम्यान त्याने अनुभवी मोहम्मद नबीसोबत (३३) ८३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. दोघांनी काही मोठे फटके लगावत अफगाणिस्तानचा डाव पुन्हा रुळावर आणला. भारताकडून अर्शदीप सिंग सर्वात प्रभावी गोलंदाज ठरला. त्याने चार षटकांत ४.८ च्या इकॉनॉमीने अवघ्या १९ धावा देत तीन विकेट्स घेतल्या.

अभिषेकचे भन्नाट अर्धशतक, ईशान-अभिषेकच्या जोडीने अफगाण गोलंदाजांची उडवली तारांबळ

सलामीवीर अभिषेक शर्माने अवघ्या २२ चेंडूंमध्ये आपले १२वे टी२० आंतरराष्ट्रीय अर्धशतक दिमाखात पूर्ण केले. त्याची ही खेळी जितकी आक्रमक होती, तितकीच मनोरंजकही होती. मैदानाच्या चारही बाजूंना मोठमोठे फटके लगावत त्याने प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर अक्षरशः हल्ला चढवला. सात चौकार आणि सात षटकारांसह त्याने अवघ्या ३२ चेंडूंमध्ये ८२ धावांची वादळी खेळी केली.

एका बाजूला ईशान किशनने ठिणगी पेटवली, तर दुसऱ्या बाजूला अभिषेक शर्माने त्यात आणखी आग ओतली. दोघांच्या १२१ धावांच्या भागीदारीने पॉवरप्लेचं रूपांतर अक्षरशः पार्टी मोडमध्ये केलं. दोघांनी मिळून गोलंदाजांवर जोरदार आक्रमण करत भारतीय डावाला भक्कम स्थितीत आणलं. ईशान ४२ धावांवर सीमारेषेजवळ झेलबाद झाला. राशिद खानने शानदार झेल घेत त्याला माघारी पाठवलं. मात्र तोपर्यंत नुकसान झालं होतं आणि भारताने १३.४ षटकांत ३ बाद १५७ धावा करत सात विकेट्सने सहज विजय मिळवला.

संक्षिप्त धावफलक

अफगाणिस्तान: २० षटकांत ८ बाद १५६ (अझमतुल्लाह ओमरझाई ६४*, मोहम्मद नबी ३३; अर्शदीप सिंग ३/१९) पराभूत विरुद्ध भारत: १३.४ षटकांत ३ बाद १५७ (अभिषेक शर्मा ८२, ईशान किशन ४२; मोहम्मद नबी २/२८) सात विकेट्सने.