News

AUSvIND, तिसरा कसोटी सामना: बुमरा- आकाशची ऐतिहासिक कामगिरी, अश्विनची निवृत्ती आणि मुसळधार पाऊस!

By Mumbai Indians

बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ चा गाबामध्ये झालेला तिसरा सामना गाबा २०२१ मध्ये झालेल्या सामन्यासारखा झाला नाही.

या वेळी पावसाने तर धुमाकूळच घातला. दोन्ही टीम्स आणि भारतातील चाहत्यांना त्याने हैराण करून सोडले. भारतीय प्रेक्षक पहाटे पहाटे उठून उत्साहाने सामना बघायला टीव्हीसमोर बसत होते. पण पावसाने त्यांचा हिरमोड केला.

संपूर्ण सामन्यात बॅकफूटवर वाटत असलेल्या पाहुण्या संघाच्या बाजूने हा सामना गेला. 

चला तर मग बघूया पावसाचा अडथळा सोडता बाकीचा सामना कसा झाला ते. ⬇️

ऑस्ट्रेलियासाठी हेड, स्मिथची चमकदार कामगिरी

पहिल्या दिवशी पावसाने खेळ बिघडवल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ दुसऱ्या दिवशी मोठ्या उत्साहाने खेळायला उतरला. बूमने पहिल्या अर्ध्या तासातच उस्मान ख्वाजा आणि नॅशन मॅकस्वीनी यांच्या विकेट्स घेतल्या. आपला लाडका उगवता तारा नितीश रेड्डीदेखील मागे नव्हता. त्यानेही एक विकेट घेऊन ऑस्ट्रेलियन संघाला ७५/३ वर आणून ठेवले.

त्यानंतर जे काही घडले ते यजमान संघाच्या चाहत्यांना आनंद देणारे होते.

टीम इंडियाचे दुःस्वप्न असलेल्या ट्राविस हेड (१५२) आणि स्टीव्ह स्मिथ (१०१) यांनी आपल्या संघाचे तारू सावरले आणि २४१ धावांची दणदणीत भागीदारी केली. भारतीय संघाला त्यांनी अडचणीत आणले.

जस्सी असेल तर घाबरायचे कशाला

८१ व्या ओव्हरच्या सुरूवातीला नवीन चेंडू वापरावा लागेल असे दिसले तेव्हा रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने हा पर्याय लगेचच स्वीकारला. जुना चेंडू त्यांना फारसा फायदेशीर ठरत नव्हता.

… आणि मग आपल्या लाडक्या हिऱ्याने- जसप्रीत बुमराने नवीन चेंडूसोबतच्या आपल्या दुसऱ्याच ओव्हरमध्ये स्टीव्ह स्मिथला पॅव्हिलियनला परत पाठवले. त्यामुळे बराच काळ अडचणीची ठरलेली त्यांची भागीदारी मोडीत निघाली.

त्यानंतर लवकरच आपल्या या जलदगती गोलंदाजाने मिशेल मार्श आणि ट्राविस हेड यांनादेखील बाद केले. त्याने या वेळी आणखी एकदा पाच विकेट्सचा विक्रम नोंदवून सेना राष्ट्रांमध्ये एकाच सामन्यात सर्वाधिक पाच विकेट्स घेणारा भारतीय खेळाडू ठरण्याचा गौरव प्राप्त केला.

तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात ऑसीजची इनिंग ४४५ वर संपली. त्यांनी आदल्या रात्रीच्या ४०५/७ च्या धावसंख्येत ४० धावांची भर घातली.

अटीतटीचा लढा = फॉलो ऑन टाळला

टीम इंडियाचे फलंदाज पुन्हा एकदा यजमान संघाच्या धडाकेबाज गोलंदाजीला बळी पडले. आपला संघ तिसऱ्या दिवसाच्या शेवटी ५१/४ वर होता. केएल राहुलने एका बाजूला गड सांभाळून ठेवला होता.

चौथ्या दिवशी या उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाने आठ चौकारांसह ८० धावा करून अत्यंत महत्त्वाचे अर्धशतक फटकावले. सर दि जडेजाने ७७ धावा केल्या. परंतु आपल्यावरचा धोका अजूनही टळला नव्हता.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील २१३/९ वर असलेल्या संघाला फॉलो ऑन टाळण्यासाठी आणखी३३ धावांची गरज होती.

आकाश दीप-जसप्रीत बुमरा यांनी आपल्या खांद्यावर धुरा घेतली आणि अत्यंत संयमाने खेळत २५२/९ वर धावसंख्या आणून ठेवली. भारतीय संघाने फॉलो ऑन टळल्यामुळे सुटकेचा निःश्वास सोडला.

पॅट कमिन्सच्या पेनल्टीटाइम चेंडूवर आकाश दीपने एक सणसणीत षटकार ठोकला. भारतीयांच्या काळजाला त्याने दिलासा दिला. हा मनोरंजक षटकार तुम्हाला इथे बघता येईल:

गाबा कसोटी- दिवस पाचवा- आपल्यासाठी काही ना काही सरप्राइज असतेच!

ऑसीजने शेवटच्या दिवशी भारतीय संघाला २६० वर सर्वबाद केले आणि १८५ धावांची आघाडी घेतली.

पॅट कमिन्सच्या टीमचा प्लॅन स्पष्ट होता. त्यांच्याकडे भलीमोठी आघाडी होतीच. शिवाय वेळही फारसा शिल्लक नव्हता. त्यामुळे विकेट्सचा फारसा विचार न करता सटासट धावा फटकावणे हेच उद्दिष्ट त्यांनी समोर ठेवले.

परिणाम? त्यांनी ८९/९ धावा फटकावून २७५ धावांचे लक्ष्य आपल्यासमोर ठेवले आणि डाव घोषित केला. बूमने आणखी तीन विकेट्स घेतल्या तर मोहम्मद सिराज आणि आकाश दीप यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. या दरम्यान आपल्या जसप्रीत बुमराने ऑस्ट्रेलियात सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारा भारतीय खेळाडू म्हणून विक्रम नोंदवला.

दुर्दैवाने हवामानाचा अंदाज काहीतरी वेगळाच होता. शेवटचा दिवस, दणदणीत खेळ होणार अशी अपेक्षा असताना पावसानेही आपला डाव खेळायचे ठरवले.

आर. अश्विनची आपल्या दमदार क्रिकेट करियरला अखेरची सलामी!

आपला दिग्गज अष्टपैलू खेळाडू रवीचंद्रन अश्विन याने सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.

धन्यवाद अॅश अण्णा. तुम्ही भारतीय क्रिकेटला दिलेले योगदान अमूल्य आहे. 💙 पलटनकडून तुमच्या दुसऱ्या इनिंगसाठी खूप शुभेच्छा आणि तुमच्या प्रियजनांसोबत तुम्हाला आता भरपूर फिल्टर कॉफीचा आस्वाद घेता येईल अशी आशा आहे.☕

आता दोन्ही टीम्सना २६ डिसेंबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात २-१ ची आघाडी घेण्याची उत्सुकता आहे.

 

थोडक्यात धावसंख्या: ऑस्ट्रेलिया ४४५/१० (ट्राविस हेड १५२; जसप्रीत बुमरा ६/७६) आणि ८९/७ घोषित (पॅट कमिन्स २२; जसप्रीत बुमरा ३/१८) आणि भारत २६०/१० (केएल राहुल ८४; पॅट कमिन्स ४/८१) आणि ८/० (यशस्वी जैस्वाल ४*) सामना अनिर्णित