ENGvIND तिसरा एकदिवसीय सामना: लॉर्ड्सचा राजा, रोहित शर्मा!!

ENGvIND तिसरा एकदिवसीय सामना: लॉर्ड्सचा राजा, रोहित शर्मा!!

By Mumbai Indians

सामना आणि मालिका इंग्लंडने जिंकली असेल, पण लॉर्ड्सला त्याचा खरा नायक रोहित शर्माच्या रूपाने मिळाला. सलाम, हिटमन! आपल्या कारकिर्दीतील ३४वे एकदिवसीय शतक झळकावत त्याने फलंदाजीचा अप्रतिम नमुना सादर केला. क्रिकेटच्या इतिहासाने समृद्ध अशा लॉर्ड्सच्या मैदानावर त्याने आपल्या गौरवशाली कारकिर्दीत आणखी एक सुवर्ण अध्याय जोडला आणि लॉर्ड्स ऑनर्स बोर्डवर आपले नाव कोरले. क्रिकेटच्या माहेरघरात इंग्लंडने २७ धावांनी विजय मिळवला, पण मनं जिंकली ती रॉयल रोहितने.

डकेट-बेथेलची दमदार सुरुवात, प्रसिधने दिला पहिला धक्का

भारतीय गोलंदाजांनी सातत्याने प्रयत्न केले, मात्र सुरुवातीपासूनच बेन डकेट आणि जेकब बेथेल यांनी इंग्लंडला मजबूत स्थितीत पोहोचवले. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी १९२ धावांची भक्कम भागीदारी केली. प्रसिध कृष्णाने अखेर ही भागीदारी मोडली. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बेथेलने चेंडू हवेत उचलला आणि डीप स्क्वेअर लेगवर उभ्या असलेल्या रोहित शर्माने स्थिर राहून उत्कृष्ट झेल टिपला.

बेथेलने ९३ चेंडूंमध्ये ९१ धावा केल्या. त्याच्या खेळीत ११ चौकार आणि २ षटकार होते. त्यानंतर डकेटने आपले शतक पूर्ण केले आणि इंग्लंडला २५० धावांचा टप्पा ओलांडून दिला. त्याने जो रूटसोबत १०१ धावांची भागीदारीही केली. अखेर प्रिन्स यादवने स्वतःचाच झेल घेत डकेटची खेळी संपवली. डकेटने १४१ धावा करताना १८ चौकार आणि १ षटकार लगावला.

रूट-बटलरची जोरदार फिनिश

मागील सामन्यातील लय कायम राखत जो रूटने पुन्हा एकदा प्रभावी फलंदाजी केली. त्याने अवघ्या ४८ चेंडूंमध्ये नाबाद ७८ धावा केल्या. त्याच्या खेळीत ९ चौकार होते. दुसऱ्या बाजूला जोस बटलरने तितकीच आक्रमक साथ दिली. त्याने फक्त १३ चेंडूंमध्ये नाबाद ४१ धावा केल्या. या खेळीत ४ चौकार आणि ३ खणखणीत षटकार होते.

इंग्लंडने निर्धारित ५० षटकांत ३ बाद ३८७ धावा करत लॉर्ड्सवरील एकदिवसीय सामन्यांतील सर्वोच्च धावसंख्या उभारली.

भारताकडून प्रसिद्ध कृष्णाने २/६९ अशी कामगिरी केली.

कर्णधार गिलची साथ, रो-हिटमॅन चा दमदार डाव

भारताच्या धावांचा पाठलाग करताना शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी सकारात्मक सुरुवात केली. दोघांनी सुरुवातीला संयम राखत आणि नंतर मोठे फटके खेळत इंग्लंडच्या गोलंदाजांवर दबाव आणला. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी १४७ धावांची शानदार भागीदारी उभारली. इंग्लंडचे गोलंदाज उत्तर शोधत असतानाच आदिल रशीदच्या चेंडूवर शुभमन गिल एलबीडब्ल्यू झाला.

हिटमॅन... काय अप्रतिम शतक!

लॉर्ड्सवर तो दिवस संपूर्णपणे रोहित शर्माच्या नावावर होता. त्याने आपल्या शैलीदार फलंदाजीने ३४वे एकदिवसीय शतक झळकावले. जेव्हा संघाला एका नायकाची गरज होती, तेव्हा आपल्या मुंबईचा राजाने आपल्या खास अंदाजात जबाबदारी उचलली. देखणे कव्हर ड्राइव्ह, दमदार पुल शॉट्स आणि प्रेक्षकांच्या डोक्यावरून जाणारे उंच षटकार... रोहितने संपूर्ण डावावर नियंत्रण ठेवत लॉर्ड्सलाच आपले मैदान बनवले. दर्जा, संयम आणि नियंत्रण यांचा अप्रतिम मिलाफ सादर करत त्याने संपूर्ण देशाला अभिमान वाटावा अशी खेळी केली. या शतकासह लॉर्ड्सवर एकदिवसीय शतक झळकावणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला. याचबरोबर परदेशात सर्वाधिक एकदिवसीय शतके झळकावण्याच्या यादीत तो ८ शतकांसह अव्वल स्थानावर पोहोचला. त्याने भारताचा पाठलाग योग्य मार्गावर ठेवला, मात्र अखेर ११० चेंडूंमध्ये १३८ धावा करून तो बोल्ड झाला. त्याच्या खेळीत १७ चौकार आणि ५ षटकार होते. त्या वेळी भारताची धावसंख्या ३८.४ षटकांत २६०/२ अशी होती.

कोहलीची ७४ धावांची झुंजार खेळी

विराट कोहलीनेही भारताच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. त्याने अर्धशतक पूर्ण करत उत्कृष्ट लय दाखवली. मात्र आवश्यक धावगती वाढत असल्याने त्याला मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करावा लागला आणि अखेरीस सॅम करनने त्याला ६० चेंडूंतील ७४ धावांवर बाद केले. ती करनची सामन्यातील तिसरी विकेट होती.

भारताने अखेरच्या चेंडूपर्यंत झुंज दिली, पण विजय हुकला. भारताचा डाव ५० षटकांत ७ बाद ३६० धावांवर संपला. इंग्लंडने २७ धावांनी विजय मिळवत मालिका २-१ अशी आपल्या नावावर केली.

संक्षिप्त धावफलक

इंग्लंड: ५० षटकांत ३८७/३
(बेन डकेट १४१, जेकब बेथेल ९१, जो रूट ७४; प्रसिध कृष्णा २/६९)*

भारत: ५० षटकांत ३६०/७
(रोहित शर्मा १३८, शुभमन गिल ७७, विराट कोहली ७४; सॅम करन ४/७५)

निकाल: इंग्लंडचा भारतावर २७ धावांनी विजय; मालिका २-१ अशी इंग्लंडच्या नावावर.