News

INDvSL तिसरा ओडीआयः संपूर्ण आणि ओडीआय क्रिकेटमधला सर्वांत मोठा विजय

By Mumbai Indians

फलंदाजीत आणि गोलंदाजीतही या वेळी जराही स्पर्धा नव्हती. भारतीय संघ मैदानात आला, त्याने पाहिले आणि त्याने जिंकून घेतले सारे... अशाच प्रकारचा आजचा सामना होता. या वेळी अनेक विक्रमांची बरोबरी झाली, ते मोडीत निघाले आणि या स्वरूपातल्या सर्वांत मोठ्या विजयाचाही विक्रम नोंदवला गेला.

शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी अप्रतिम सलामीने खेळाची सुरूवात केली आणि विराट कोहलीने स्फोटक खेळ केला. त्यामुळे भारतीय धावसंख्या ५० ओव्हर्समध्ये ३९०/५ वर गेली.

आता दिवसातला रोमांच संपला असे वाटत असतानाच मोहम्मद सिराजने अक्षरशः बेकहॅमसारखा चेंडू स्विंग केला आणि श्रीलंकन फलंदाजांना पाणीच पाजले. श्रीलंकेचा डाव २२ ओव्हर्समध्ये ७३ धावा करतानाच पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळला. भारतीय संघाने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिकेत व्हाइटवॉशने विजय मिळवला.

गिलचे तंत्र आणि स्फोटक हिटमॅन

रोहितने जोरदार पुल शॉट्स मारत संपूर्ण भारतीय क्रिकेट चाहत्यांना खूप खूश केले. त्याने ४९ चेंडूंवर ४२ धावा केल्या. त्याने आजच्या इनिंगमध्ये अत्यंत सुंदर खेळ केला. दुसरीकडे गिलने चेंडू खेळवत ठेवला, सहजपणे मधल् जागा शोधल्या आणि भारताला पॉवर प्लेमध्ये अगदी सहजपणे ७५ धावांवर नेऊन सोडले.

या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ९५ धावा केल्या.

कोहली- गिलकडून फटकेबाजी सुरूच

विराट कोहली आज अजिबात शांत बसायच्या मूडमध्ये नव्हता. तो फक्त धावा कुटायलाच आला होता आणि त्याने पहिल्या सहा चेंडूंमध्ये तीन चौकार मारून आपला हा इरादा स्पष्ट केला. गिल आणि कोहली यांनी गोलंदाजांना जराही दयामाया दाखवली नाही आणि रनरेट सातच्या आसपास राहील याची काळजी घेत राहिले.

गिलने आपले ओडीआयमधील दुसरे शतक पूर्ण केले आणि शतकी धाव काढण्यापूर्वी आपल्या ज्येष्ठ सहकाऱ्याला हाय-फाय दिला आणि त्यानंतर धाव पूर्ण करून त्याने आनंदाने उडीच मारली. त्याने ९७ चेंडूंवर ११६ धावा केल्या आणि तो बाद झाला. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी १३१ धावांची भागीदारी केली.

कोहलीचा जबरदस्त खेळ

आपले ४६ वे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यातील शतक पूर्ण केल्यानंतर (एकूण ७४) कोहलीने शेवटच्या चार ओव्हर्समध्ये गोलंदाजांचा धुव्वा उडवला. त्याने ८५ चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले आणि त्यानंतर पुढच्या फक्त २५ चेंडूंमध्ये त्याने ६६ धावा केल्या आणि ११० चेंडूंमध्ये १६६ धावांचा डोंगर रचला. या दरम्यान त्याने १३ चौकार आणणि आठ षटकार ठोकले. त्याच्या या दिमाखदार खेळामुळे भारताला ५० ओव्हर्समध्ये ३९०/५ अशी धावसंख्या उभारता आली जी ओडीआयमधली भारताची नवव्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या ठरली.

कोहलीने ओडीआयमधला पाचव्या क्रमांकाचा आघाडीचा धावा करणारा फलंदाज म्हणून महेला जयवर्धनेलाही मागे टाकले. तो सचिन तेंडुलकरच्या ४९ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय शतकांपासून फक्त तीन शतके दूर आहे.

सिराजने रचला कळसाध्याय!

इतकी सुंदर फलंदाजी पाहिल्यानंतर आता फार काही पाहण्यासारखे उरले नाही से चाहत्यांना वाटत होते. पण या हैदराबादी गोलंदाजाने सर्वांच्या या अंदाजाला खोटे ठरवत तिरूवनंतपुरमच्या मैदानावर चांगलीच आतषबाजी केली. तो संधी शोधत होता, फलंदाजांना आपल्या स्विंग आणि वेगाने चांगलाच अडचणीत आणत होता. त्याचे चेंडू खेळणे श्रीलंकन फलंदाजांसाठी जवळपास अशक्य झाले होते.

त्यामुळेच श्रीलंका पॉवरप्लेमध्येच ३७/५ वर पोहोचली होती.

थोडा वेळ लागला, पण काम चोख झाले.

भारताला सामना आणि मालिका संपवण्यासाठी फक्त एका विकेटची गरज होती. परंतु कर्णधार रोहितला सिराजने आपल्या पाच विकेट्स घ्याव्यात असे वाटत होते (मुंबईकर कायमच दिलदार असतात.) खरेतर श्रेयस अय्यरसुद्धा आपल्याकडे तयारच होता. (तो खरोखरच सुंदर स्पिन खेळतो, बरं का). दुर्दैवाने, कासून रजिताने सिराजच्या शेवटच्या तीन ओव्हर्स खेळून काढून त्याला हा आनंद मिळू दिला नाही.

मग कुलदीपने जबाबदारी खांद्यावर घेऊन लाहिरू कुमाराला बाद केले. श्रीलंकेचा संघ ७३ धावांवर सर्व बाद झाला. भारताने ३१७ धावांनी सामना जिंकला आणणि एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावांनी विजयाचा न्यूझीलंडचा विक्रम (२००८ मध्ये आयर्लंडविरूद्ध २९० धावांनी विजय) मागे टाकला.

भारताने आणखी एक मालिका आणि दोन्ही प्रकारांमध्ये विजय मिळवला आहे. भारतीय संघ आता लवकरच हैदराबादला जाईल. तिथे आपण किवींचे स्वागत करणार आहोत.

थोडक्यात धावसंख्या

भारत ५० ओव्हर्समध्ये ३९०/५ (विराट कोहली १६६*, शुभमन गिल ११६) कडून श्रीलंकेचा २२ ओव्हर्समध्ये ७३ धावांवर सर्वबाद करून पराभव. (मोहम्मद सिराज ४/२२, कुलदीप यादव २/१६)