News

मुंबई इंडियन्स लखनौ सुपर जायंट्सशी विजयाच्या मार्गावर परतण्याच्या इराद्याने सामना करणार

By Mumbai Indians

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स टीम लखनौ येथील श्री. अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियमवर ३० एप्रिल रोजी लखनौ सुपर जायंट्सविरूद्ध खेळणार आहे. मुंबईला दिल्लीविरूद्ध झालेल्या अटीतटीच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. परंतु आपली टीम अद्यापही प्लेऑफ्सच्या स्पर्धेत आहे.

टीमच्या फलंदाजांनी मागच्या सामन्यात जोरदार फलंदाजीचे प्रदर्शन घडवले होते. आपला तरूण फलंदाज तिलक वर्माच्या जबरदस्त फॉर्ममुळे टीममध्ये एक सकारात्मक ऊर्जा दिसते. कर्णधार पांड्यानेही दिल्लीविरूद्ध १९१.८८ च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करून आपल्या टीमच्या आत्मविश्वासात भर घातली आहे.

मुंबईच्या टीमने आतापर्यंत स्पर्धेत तीन सामन्यांमध्ये विजय मिळवला. लखनौविरूद्ध ब्लू अँड गोल्ड टीम विजयाच्या मार्गावर परतून आयपीएल २०२४ मध्ये आपला चौथा विजय मिळवण्यासाठी उत्सुक असेल.

लखनौची टीम केएल राहुलच्या नेतृत्वाखाली पहिल्या चार क्रमांकात जागा मिळवण्यासाठी प्रचंड जोर लावतेय. त्यांना मागच्या सामन्यात टेबल टॉपर राजस्थान रॉयल्सकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.

मुंबई आणि लखनऊदरम्यान स्पर्धेतला हा पहिला सामना असेल. लखनौचे फलंदाज एमआयच्या जसप्रीत बुमराच्या घातक गोलंदाजीपासून सावध राहण्याचा प्रयत्न करतील. याशिवाय टीमचा अनुभवी स्पिनर पियूष चावलादेखील लखनौच्या पिचवर यजमान संघाला चकवा देऊ शकतो.

इकाना येथील मैदान मुंबईच्या राजाचे म्हणजे रोहित शर्माचे आवडते आहे. तिथे त्याने आंतरराष्ट्रीय शतकी कामगिरीदेखील केली आहे. त्यामुळे लखनौच्या गोलंदाजांना रोहितच्या रूपाने मोठ्या वादळाला सामोरे जावे लागू शकते.

लखनौचा कर्णधार केएल राहुलचा फॉर्म सध्या उत्तम आहे. त्याशिवाय ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉइनिसदेखील आपल्या टीमकडून सातत्याने उत्तम खेळतो आहे.

लखनौचे स्पिनर्सदेखील या स्पर्धेत चांगलेच फॉर्ममध्ये आहेत. कृणाल पांड्याच्या नेतृत्वाखाली लखनौच्या स्पिन गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली आहे. पण या वेळी त्यांच्यासमोर कोणत्याही आव्हानाला सहज पेलणारी मुंबईची टीम आहे.

या स्पर्धेत पांड्या बंधू एकमेकांच्या समोर प्रथमच येणार आहेत. त्यामुळेही हा सामना खास आहे. आता कोण कोणावर भारी पडणार हे पाहायला मजा येईल.

हेड-टू-हेड आकडेवारी

मुंबई आणि लखनौ आतापर्यंत आयपीएलमध्ये चार सामने खेळले आहेत. त्यातला एक सामना मुंबईने जिंकला असून लखनौने तीन सामने जिंकले आहेत. या सीझनमध्ये या दोन्ही टीम्स प्रथमच समोरासमोर येतील. त्यामुळे मुंबई इंडियन्सला हेड टू हेड आकडेवारी समसमान आणायला आवडेल.

काय: आयपीएल २०२४ चा ४८ वा सामना. लखनौ सुपर जायंट्स विरूद्ध मुंबई इंडियन्स

कधी: मंगळवार, ३० एप्रिल २०२४, सायंकाळी ७.३० वाजता

कुठे: श्री अटल बिहारी बाजपेयी इकाना स्टेडियम, लखनौ

काय अपेक्षा आहे: लखनौची पिच फलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. त्यामुळे चौकार षटकारांची बरसात पाहायला मिळू शकते. आपली टीम एक नवीन उत्साह आणि तयारीने आपला चौथा विजय नोंदवण्यासाठी मैदानात उतरेल.

आपण काय करायचे आहे: मागचे सोडून द्या. जे झाले ते झाले. आता आपल्या टीमला आपल्या पाठिंब्याची गरज आहे पलटन. तिची ताकद वाढवा. उत्साह वाढवा.