News

MI vs KKR मॅच प्रीव्ह्यू: आपल्या घरच्या खेळपट्टीवर विजयी मार्गावर येण्यासाठी मुंबई इंडियन्स उत्सुक

By Mumbai Indians

आपल्या टीमसाठी मागचे काही सामने आव्हानात्मक ठरले आहेत. परंतु हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सची टीम आता आपल्या मैदानात वानखेडेवर नवीन उत्साहाने एक नवीन सुरूवात करायला सज्ज आहे. 

विजयाच्या मार्गावर परतण्याच्या इच्छेने शुक्रवार दिनांक ३ मे रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आयपीएल २०२४ च्या ५१ व्या सामन्यात मुंबई इंडियन्स कोलकाता नाइट रायडर्सचा सामना करेल.

मागच्या सामन्यात आपल्या टीमला लखनऊ सुपर जायंट्सकडून त्यांच्या घरच्या खेळपट्टीवर शेवटच्या ओव्हरमध्ये ४ विकेट्सनी पराभव पत्करावा लागला. एमआयने आतापर्यंत १० सामन्यांपैकी ३ विजय मिळाले आहेत. त्यामुळे टीम आता चौथ्या विजयासाठी सज्ज आहे.

केकेआर टीमबद्दल बोलायचे झाल्यास टीमने आपल्या मागच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध ७ विकेट्सनी विजय मिळवला होता. कोलकाताने आयपीएल २०२४ सीझनमध्ये ९ सामने खेळले आहेत. त्यातले ६ सामने जिंकले असून ३ हरले आहेत.

मुंबई इंडियन्सला या सामन्यात आपल्या फलंदाजांकडून मोठ्या आणि स्फोटक कामगिरीची अपेक्षा असेल. आतापर्यंत या सीझनमध्ये तिलक वर्माने सर्वाधिक धावा एमआयसाठी केल्या आहेत. त्याने १० सामन्यांमध्ये १५३.८१ च्या स्ट्राइक रेटने ३४३ धावा केल्या आहेत. त्यात तीन अर्धशतकेही आहेत.

हिटमॅन रोहित शर्माने आतापर्यंत खेळलेल्या १० सामन्यांमध्ये १५८.२९ स्ट्राइक रेट आणि ३५.०० च्या सरासरीने ३१५ धावा केल्या आहेत. त्यात एक शतकी खेळी आहे.

याशिवाय या सामन्यात टीमला सलामी फलंदाज ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांच्याकडून स्फोटक खेळाची अपेक्षा असेल. त्यांनी या सीझनमध्ये फारशी कमाल दाखवलेली नाही.

जसप्रीत बुमरा आणि गेराल्ड कोएत्झीच्या खांद्यावर जलदगती गोलंदाजीची जबाबदारी असेल तर अनुभवी लेग स्पिनर पियूष चावलावर मधल्या ओव्हर्समध्ये फलंदाजांना आळा घालायची जबाबदारी असेल.

मागच्या सामन्यात कर्णधार हार्दिक पांड्याने दोन विकेट्स घेतल्या होत्या. या वेळी तोसुद्धा गोलंदाजी करू शकतो.

हेड-टू-हेड आकडेवारी

हेड-टू-हेड आकडेवारीचा विचार केला तर मुंबई इंडियन्सची टीम कोलकात्यावर जड आहे. एमआय आणि केकेआर यांच्यामध्ये ३२ सामने झाले आहेत. त्यातले मुंबई इंडियन्सने २३ सामने जिंकले आहेत तर कोलकाता नाइट रायडर्सने ९ वेळा विजय मिळवला आहे.

या दोन्ही टीम्समध्ये खेळवल्या गेलेल्या शेवटच्या पाच सामन्यांमधल्या दोन वेळा आपल्या टीमने विजय मिळवला आहे. आयपीएल २०२४ मध्ये हे दोन्ही संघ प्रथमच एकमेकांसमोर येत आहेत. मागच्या सीझनमध्ये मुंबई आणि कोलकात्यादरम्यान एक सामना झाला होता. त्यात आपल्या टीमने ५ विकेट्सनी विजय मिळवला होता.

काय: आयपीएल २०२४ चा ५१ वा सामना, मुंबई इंडियन्स विरूद्ध कोलकाता नाइट रायडर्स

कधी: शुक्रवार, ३ मे २०२४. सायंकाळी ७.३० वाजता

कुठे: वानखेड़े स्टेडियम, मुंबई

काय अपेक्षा आहे: आपला बालेकिल्ला असलेल्या वानखेडेवर आपल्या फलंदाजांची तडाखेबंद फलंदाजी बघायला तयार राहा. बूम बूम बुमराचे अचूक यॉर्कर्स विकेट्स घेण्यासाठी उत्सुक आहेत. एकूणात आपली टीम आपल्या घरच्या खेळपट्टीवर एक नवीन सुरूवात करायला सज्ज आहे.

आपण काय करायचे आहे: पलटन मागचे काही सामने आपल्यासाठी कठीण गेले आहेत यात काहीच शंका नाही. पण आपल्याला लढायला खूप चांगलं येतं. तर पलटन आपल्या घरी, वानखेडेवर ब्लू अँड गोल्ड जर्सीला चिअर अप नक्की करा.