News

“आता आम्ही प्रतिष्ठा आणि प्रतिमेसाठी खेळणार आहोत”: पियूष चावला

By Mumbai Indians

कोलकाता नाईट रायडर्सचे लक्ष्य गाठून आम्ही विजयी मार्गावर परतायला २४ धावा कमी पडल्या. आमच्यासाठी हा सामना जिंकणे आवश्यक होते असा हा एक सामना होता. दुर्दैवाने मागच्या काही कठीण सामन्यांप्रमाणे आमच्या हातातून हा सामना निसटला. 

पण आपल्या सर्वांसाठी यात एक आनंददायी क्षण ठरला. आपला अनुभवी स्पिनर पियुष चावला या दरम्यान ड्वेन ब्राव्होला मागे टाकून १८४ विकेट्स घेऊन आयपीएलमध्ये दुसरा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला.

“हा अत्यंत सुंदर प्रवास होता. आयपीएलची सुरूवात १७ वर्षांपूर्वी झाली. त्या वेळी स्पिनर्सना फार कोणी महत्त्व देत नव्हतं. पण आता भारतातील काही सर्वाधिक विकेट घेणारे खेळाडू पाहिले तर ते प्रामुख्याने सगळे स्पिनर्स अश्विन, युझी (युजवेंद्र चहल) आणि मी स्वतः आहोत. त्यामुळे ही खूप सुंदर भावना आहे,” पियूषने वानखेडे स्टेडियमवर शुक्रवारी (३ मे) आयोजित सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत सांगितलं.

आपल्या महत्त्वाच्या कामगिरीचा मागोवा ठेवून ती साजरी करतो का असे विचारल्यावर पीसी म्हणाला की टीमच्या यशात योगदान न देणाऱ्या गोष्टीचा मी आनंद मानत नाही.

“आम्ही जिंकलो नाही त्यामुळे ही सर्व कामगिरी (कामगिरीचा आनंद) वाया गेली आहे. तुम्ही पाच विकेट्स घेता आणि तुमची टीम जिंकली नाही तर त्याचा काहीही उपयोग नाही. त्यामुळे मी त्याचा फारसा विचार करत नाही,” तो म्हणाला.

“मी माझ्या फलंदाजीचा ट्रॅक ठेवतो. मग मी शून्यावर बाद झालो तरी चालेल,” त्याने मस्करी करताना सांगितलं.

“पण गोलंदाजीच्या संदर्भात सांगायचं तर मला सामन्याची मजा येते. मग मी कोणत्याही लेव्हलला खेळत असलो तरी फरक पडत नाही कारण आयपीएल एक वेगळंच आव्हान आहे. तुम्ही देशांतर्गत क्रिकेटमध्ये मला पाहिलं तरी मी कायम तेवढाच उत्साह आणि ऊर्जेने खेळत असतो कारण मला गोलंदाजी करायला आवडतं. मी १७ वर्षांपासून आयपीएल खेळतो आहे. त्यापूर्वी मी ज्युनियर क्रिकेट आणि इतर गोष्टी खेळलो. हा २२ वर्षांपासून माझ्यासाठी सुंदर प्रवास राहिला आहे.”

सामन्याबद्दल आणि एमआयच्या आतापर्यंतच्या फॉर्मबद्दल त्याला विचारलं असता पियूषने सर्वप्रथम टीमच्या कामगिरीच्या वेगात घट झाल्याचं सांगितलं.

“एक युनिट म्हणून मी असं सांगणार नाही की फक्त फलंदाजी किंवा गोलंदाजीचाच प्रभाव पडलाय. संपूर्ण टीमची कामगिरी आहे. टी२० क्रिकेट फक्त वेगाशीश संबंधित आहे असे आपण ऐकले आहे. या सीझनमध्ये आम्हाला तो वेग मिळाला नाही. हे कोणत्याही टीमसोबत घडू शकते,” तो म्हणाला.

“हे आमच्यासोबत पहिल्यांदा किंवा इतर कोणत्याही संघासोबत दुसऱ्यांदा घडतंय असं नाही. हे कोणालासोबतच होऊ शकते. हा वेग या वेळी आम्हाला मिळालेला नाही.

“वानखेडेवर १७० धावांचा पाठलाग करणं हा केकवॉक असेल असं लोकांना वाटत होतं. पण आजची विकेट वेगळी होती. ती थोडी चिकट होती. चेंडू थांबून येत होता. शिवाय कधीकधी संघाचाच फॉर्म नसतो आणि या गोष्टी घडू शकतात. आपण ते स्वीकारलं पाहिजे.”

आजच्या पराभवानंतरचे सर्व विचारविनिमय आणि प्लॅनिंग लक्षात घेता, प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याची शक्यता धूसर असल्याने एमआय पलटन पुढील तीन सामन्यांमध्ये संघाकडून फक्त आशा करू शकते.

“आम्ही आमच्या प्रतिष्ठा आणि प्रतिमेसाठी खेळणार आहोत,” असं त्याने पुढील सामन्यांबद्दल सांगितलं.

“कधीकधी तुम्ही मैदानात उतरता तेव्हा तुम्ही पात्र ठराल की नाही याचा विचार करत नाही. तुम्हाला तुमचं नाव, प्रतिष्ठेसाठी खेळावं लागतं. आम्ही हेच करणार आहोत.”

आता काही दिवसांनी आम्ही सनरायझर्स हैदराबादचे आव्हान स्वीकारण्यासाठी पुन्हा एकदा वानखेडेवर येणार आहोत. पलटन, आम्हाला माहितीय की तुम्ही प्रत्येक क्षणी आमच्यासोबत असाल आणि तुमच्या उत्साहाने आणि समर्थनाने आम्हाला सामर्थ्यवान कराल. आता ही प्लेऑफसाठीची लढत नाही तर मान उंच ठेवण्यासाठी लढत आहे!