News

IPL 2024, MI vs KKR: मुंबई इंडियन्सचा कोलकाता नाइट राइडर्सकडून २४ धावांनी पराभव

By Mumbai Indians

इंडियन प्रीमियर लीग २०२४ च्या ५१ व्या सामन्यात कोलकाता नाइट राइडर्सकडून मुंबई इंडियन्सला २४ धावांनी पराभव पत्करावा लागला. सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने मुंबईला विजयासाठी १७० धावांचे लक्ष्य दिले. मुंबई इंडियन्सचा संघ १८.५ ओव्हर्समध्ये १४५ धावांवर बाद झाला.

मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात कर्णधार हार्दिक पांड्याने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर प्रथम फलंदाजी करताना कोलकात्याच्या टीमने व्यंकटेश अय्यरच्या ७० धावांच्या मदतीने १९.५ ओव्हर्समध्ये १६९ धावा केल्या.

आपल्या ब्लू अँड गोल्ड टीमने उत्तम गोलंदाजी करत सुरूवातीच्या ओव्हर्समध्येच केकेआरवर दबाब ठेवला. आपण ५७ धावांवर ५ विकेट्स घेतल्या. फिल सॉल्ट ५ धावांवर तर सुनील नारायण ८ धावांवर बाद झाला. रिंकू सिंगलाही फक्त ५ धावा करता आल्या.

यानंतर व्यंकटेश अय्यरने टीमला सावरून ३६ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. मनीष पांडेने या सामन्यात ३१ चेंडूंमध्ये ४२ धावा केल्या आणि अय्यरसोबत सहाव्या विकेटसाठी ८३ धावांची भागीदारी केली. आंद्रे रसेल (७) लाही रन आऊट करून घरी पाठवले. व्यंकटेश अय्यरने ५२ चेंडूंमध्ये ७० धावा केल्या.

आमच्या गोलंदाजांनी अप्रतिम खेळाचे प्रदर्शन केले. बुमरा आणि तुषारा यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. हार्दिक पांड्याने २ विकेट्स घेतल्या तर पियूष चावलाने एक विकेट घेतली.

केकेआरने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या मुंबईच्या वतीने सलामी फलंदाजीसाठी रोहित शर्मा आणि ईशान किशन समोर आले. मुंबईला पहिला झटका दुसऱ्या ओव्हरमध्ये मिळाला तर ईशान किशन ७ चेंडूंमध्ये १३ धावा करून बाद झाला. मिशेल स्टार्कने ईशानला क्लीन बोल्ड केले.

टीमला दुसरा झटका नमन धीरच्या रूपाने बसला. तो ११ चेंडूंमध्ये ११ धावा करून वरूण चक्रवर्तीच्या चेंडूवर बाद झाला. यानंतर पॉवर प्ले संपण्यापूर्वी रोहित शर्मादेखील आपली विकेट देऊन बाद झाला. नारायणच्या चेंडूवर रोहितने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला पण मनीष पांडेने त्याची कॅच घेतली. आपल्या हिटमॅनने १२ चेंडूंमध्ये ११ धावा केल्या.

रोहित शर्माची विकेट पडल्यानंतर आपल्या सूर्यादादाने टीमसाठी आपल्या धावा करण्याची जबाबदारी निभावली. मुंबईची धावसंख्या ८ ओव्हरनंतर ३ विकेटवर ५४ धावा होती. सूर्या एकीकडे धावा करतच होता परंतु त्याच वेळी दुसऱ्या बाजूला विकेट्स पडत राहिल्या. नेहलदेखील ६ विकेट्स करून बाद झाला. यानंतर हार्दिक पांड्या रसेलच्या चेंडूवर एक धाव करून बाद झाला.

यानंतर मुंबईसाठी सूर्यकुमार यादवने टिम डेव्हिडसोबत एकत्र येऊन एक चांगली भागीदारी केली. सूर्याने ३० चेंडूंवर आपले अर्धशतक पूर्ण केले. या टप्प्यावर मुंबई इंडियन्सला विजयाची आशा दिसली होती. परंतु सूर्यकुमार रसेलच्या चेंडूवर बाद झाला.

त्याने ३५ चेंडूंमध्ये ५६ धावा केल्या. टीमला या वेळी विजयासाठी २७ चेंडूंमध्ये ५० धावांची गरज होती. त्याचवेळी विकेट्स पडत राहिल्या आणि मुंबई इंडियन्सची पूर्ण टीम १८.५ ओव्हर्समध्ये १४५ धावांवर सर्व विकेट्स देऊन बाद झाली.

शेवटच्या ओव्हरमध्ये मिशेल स्टार्कने तीन विकेट्स घेतल्या आणि या सामन्यात केकेआरच्या वतीने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. त्याच्याशिवाय वरूण चक्रवर्ती, सुनील नारायण, आंद्रे रसेल यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

थोडक्यात धावसंख्या

मुंबई इंडियन्सचा कोलकाता नाइट राइडर्सकडून २४ धावांनी पराभव.

केकेआर: (१९.५ ओव्हर्समध्ये १६९ धावा) - व्यंकटेश अय्यर ७०(५२), मिशेल स्टार्क ३३/४

एमआय: (१८.५ ओव्हर्समध्ये १४५ धावा) - सूर्यकुमार यादव ५६(३५), जसप्रीत बुमरा १८/३