MI बॉईज वीकली रिकॅप: धावा, विकेट्स आणि दमदार प्रभाव!
पलटन, आपल्या स्टार खेळाडूंच्या कामगिरीसाठी उभं राहून दाद द्यावी, असा हा आठवडा ठरला. मुंबई इंडियन्सचे खेळाडू वेगवेगळ्या जर्सीमध्ये, जगभरातील विविध लीग आणि स्पर्धांमध्ये खेळत असले, तरी एक गोष्ट कायम तीच राहिली... कधीही हार न मानण्याची वृत्ती. निर्भीड फटकेबाजी, विकेट्स मिळवण्याची भूक आणि अवघ्या काही क्षणांत सामन्याचा प्रवाह आपल्या बाजूने वळवण्याची क्षमता या सगळ्यांनी विशेष छाप पाडली. महत्त्वाच्या आकडेवारीमागेही काहीतरी खास होतं, कारण आपल्या खेळाडूंनी मिळालेल्या संधीचं सोनं करत आपला सर्वोत्तम खेळ दाखवला. क्रिकेटविश्वात सर्वत्र ब्लू अँड गोल्डच्या शिलेदारांनी आपल्या कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
नमन धीरची फलंदाजीतील धडाकेबाजी
आपल्या नमन धीरच्या जबरदस्त खेळींचं वर्णन करायचं झालं, तर ‘धडाकेबाज फटकेबाजी’ हेच शब्द अगदी योग्य ठरतील. त्याच्या पॉवर हिटिंगची झलक अगदी सुरुवातीपासूनच पाहायला मिळाली. शेर-ए-पंजाब टी२० स्पर्धेतील आपल्या मोहिमेची सुरुवात त्याने २२ चेंडूंमध्ये एक चौकार आणि पाच षटकारांसह झटपट ४७ धावा करत केली. त्यानंतरच्या सामन्यात मात्र त्याने सर्व प्रकाशझोत आपल्याकडे खेचून घेतला. सात चौकार आणि तब्बल १० षटकारांच्या जोरावर त्याने ५६ चेंडूंमध्ये ११७ धावा ठोकल्या. त्याचा स्ट्राइक रेट होता २०८. तिसऱ्या सामन्यात नमन अखेरपर्यंत क्रीझवर टिकून राहिला आणि नाबाद ८८ (४८) धावांची मॅन ऑफ द मॅच खेळी करत आपल्या संघाला विजयरेषा पार करून दिली.
अश्वनी कुमारचा गोलंदाजी शो
हॅटट्रिक हिरो अश्वनी कुमारकडे भागीदारी मोडण्याची, प्रतिस्पर्ध्यांच्या गोटात दबाव निर्माण करण्याची आणि एकापाठोपाठ विकेट्स घेण्याची खास क्षमता आहे. शेर-ए-पंजाब टी२० स्पर्धेत संधी मिळताच त्याने तिचं सोनं केलं. आपल्या चार षटकांच्या शानदार स्पेलमध्ये त्याने ८.८ च्या इकॉनॉमीने ३५ धावांत चार विकेट्स घेतल्या. यामध्ये सामन्याच्या १६.६, १८.१ आणि १८.२ षटकांमध्ये घेतलेल्या विकेट्ससह शानदार हॅटट्रिकचाही समावेश होता.
तिलक वर्माने क्लास आणि संयमाने पालटला सामन्याचा प्रवाह
आघाडीवरून नेतृत्व करत तिलक वर्माने दुलीप ट्रॉफी २०२६ मध्ये दक्षिण विभागासाठी पहिल्या डावात नाबाद ११६ (२५०) धावांची अत्यंत महत्त्वपूर्ण आणि शानदार खेळी केली. एका बाजूने विकेट्स पडत असताना त्याने आपला किल्ला लढवत रेड-बॉल क्रिकेटमध्ये कमालीची जिद्द, संयम आणि धैर्य दाखवलं. त्यानंतर दुसऱ्या डावातही त्याने ७९ चेंडूंमध्ये नाबाद ५१ धावा केल्या. या दमदार कामगिरीच्या जोरावर त्याने मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पटकावला आणि आपल्या संघाला अंतिम फेरीत पोहोचवलं.
Quin-Ton डी कॉक मोड सक्रिय झाला आहे
क्विनीने आपल्या तुफानी फलंदाजीने कॅरेबियनमध्ये रंगत आणली. त्याने ५७ चेंडूंमध्ये ११ चौकार आणि सहा षटकारांसह शानदार १०६ धावा फटकावल्या. दबावाचं मनोरंजनात रूपांतर करत त्याने अचूकपणे क्षेत्ररक्षणातील मोकळ्या जागा शोधल्या. QDK मोड अॅक्टिव्हेट झाला की मग मोठ्या फटक्यांची आतषबाजी होणार, हे ठरलेलंच!
मिचेल सँटनरचा फाइव्ह-स्टार शो
वूरबर्गमध्ये मिचची कमाल पाहायला मिळाली. चार षटकांत अवघ्या १६ धावा देत त्याने पाच विकेट्स घेतल्या आणि त्याचा इकॉनॉमी रेट राहिला अवघा ४. टी२० क्रिकेटमधील त्याच्या पहिल्याच पाच विकेट्सच्या कामगिरीने युरोपमध्ये जल्लोषाचं वातावरण निर्माण केलं आणि त्याला प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कारही मिळवून दिला. नियंत्रण, फ्लाइट आणि फलंदाजाला चकवण्याची कला... या अचूक मिश्रणाच्या जोरावर त्याने मधल्या षटकांमध्ये आपली छाप पाडली.
थंडर बोल्टचा विजेच्या वेगाचा पाच विकेट्सचा धमाका
मॅन ऑफ द मॅच बोल्टी पुन्हा एकदा आपल्या सर्वोत्तम रंगात दिसला. त्याने चार षटकांत २४ धावा देत पाच विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे, टी२० क्रिकेटमधील त्याचीही ही पहिलीच पाच विकेट्सची कामगिरी होती आणि तीदेखील वूरबर्गमध्येच आली. युरोपमधील त्याच्या या खास स्पेलमध्ये सगळंच होतं... स्विंग, सीम, वेग आणि अचूकता.
आपला MI DNA जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचतोय आणि क्रिकेटविश्वातील प्रत्येक मैदानावर आपल्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर ब्लू अँड गोल्डची जादुई ऊर्जा पसरवत आहे.