मुंबई इंडियन्सकडून महेला जयवर्धने यांना भावपूर्ण निरोप

मुंबई इंडियन्सकडून महेला जयवर्धने यांना भावपूर्ण निरोप

By Mumbai Indians

मुंबई, १७ ऑक्टोबर २०२६: मुंबई इंडियन्सने आज महेला जयवर्धने हे संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदावरून पायउतार होत असल्याची घोषणा केली. यासह #OneFamily सोबतच्या त्यांच्या दशकभराच्या प्रवासाची सांगता होत आहे.

मुंबई इंडियन्ससाठी महेला हे केवळ मुख्य प्रशिक्षक नव्हते, तर त्यांचं योगदान त्याहून कितीतरी मोठं राहिलं आहे. त्यांच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळात मुंबई इंडियन्सने तीन आयपीएल विजेतेपदं पटकावली. २०१७ ते २०२२ आणि त्यानंतर पुन्हा २०२४ ते २०२६ अशा दोन कार्यकाळांत त्यांनी फ्रँचायझीची संस्कृती घडवण्यात मोलाची भूमिका बजावली. संघात एकजुटीचं आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासोबतच शिस्त, परस्पर सहकार्य आणि वैयक्तिक कामगिरीपेक्षा संघाला प्राधान्य देण्याची भावना त्यांनी कायम जपली.

श्रीमती नीता एम. अंबानी म्हणाल्या, “गेल्या अनेक वर्षांत महेला यांनी मुंबई इंडियन्ससाठी मोलाचं योगदान दिलं आहे. त्यांचं शांत आणि संयमी नेतृत्व, प्रामाणिकपणा आणि क्रिकेटवरील नितांत प्रेम आमच्यासाठी नेहमीच खूप महत्त्वाचं राहिलं आहे. संपूर्ण MI परिवाराच्या वतीने महेला यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल आणि इतकी वर्षं दाखवलेल्या अढळ बांधिलकीबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. आपण एकत्र केलेला प्रवास आणि जपलेल्या आठवणी आमच्यासाठी कायम खास राहतील. महेला हे नेहमीच आमच्या #OneFamily चा भाग असतील. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आम्ही त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो.”

महेला जयवर्धने म्हणाले, “गेल्या दशकभराहून अधिक काळ मुंबई इंडियन्स हा माझ्या प्रवासाचा अत्यंत खास भाग राहिला आहे. खेळाडू, प्रशिक्षकवर्ग, #OneFamily कडून मिळालेली अविश्वसनीय साथ आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे चाहत्यांचं प्रेम यामुळे हा अनुभव माझ्यासाठी आयुष्यभर जपून ठेवण्यासारखा ठरला आहे. या प्रवासात आपण अनेक अविस्मरणीय क्षण अनुभवले, आव्हानांवर मात केली आणि आपल्या सर्वांना अभिमान वाटावा असं काहीतरी घडवलं. इतकी वर्षं माझ्यावर दाखवलेला अढळ विश्वास, दिलेला पाठिंबा आणि जपलेली मैत्री यासाठी मी श्रीमती नीता अंबानी आणि आकाश अंबानी यांचे मनापासून आभार मानतो. आपण एकत्र मिळवलेल्या यशाचा मला प्रचंड अभिमान आहे. मी इथून निरोप घेत असलो, तरी MI साठी माझ्या हृदयात नेहमीच एक खास स्थान असेल. आगामी काळात संघाला भरभरून यश मिळो, हीच माझी सदिच्छा आहे.”

२०२२ मध्ये महेला यांनी ग्लोबल हेड ऑफ परफॉर्मन्स ही जबाबदारी स्वीकारली. या भूमिकेत त्यांनी जगभरातील विविध लीगमध्ये MI फ्रँचायझीच्या विस्तारावर देखरेख ठेवली. त्याचबरोबर वन फॅमिलीमधील सर्व संघांची क्रिकेटविषयक विचारसरणी एकसंध राहावी, यासाठी त्यांनी प्रशिक्षकवर्गासोबत जवळून काम केलं. याच काळात मुंबई इंडियन्स महिला संघ, MI न्यूयॉर्क आणि MI एमिरेट्स या तिन्ही संघांनी प्रत्येकी एक विजेतेपद पटकावलं. त्यामुळे जागतिक क्रिकेटमध्ये मुंबई इंडियन्सचा वारसा आणखी समृद्ध झाला.