NZvIND दुसरा वनडे सामना: भारतीय वेगवान गोलंदाजांची दमदार कामगिरी, पावसाच्या व्यत्ययानंतर भारताचा विजय!

NZvIND दुसरा वनडे सामना: भारतीय वेगवान गोलंदाजांची दमदार कामगिरी, पावसाच्या व्यत्ययानंतर भारताचा विजय!

By Mumbai Indians

कमी धावसंख्येच्या या रोमांचक सामन्यात भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच आपली छाप पाडली. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनीही जोरदार प्रत्युत्तर देत सामना रंगतदार केला. मात्र, अखेर पावसाने सामन्यात व्यत्यय आणला आणि त्यानंतर भारतीय संघाने बाजी मारली.

न्यूझीलंडचा डाव अवघ्या १३४ धावांत आटोपला

पावसामुळे ४७ षटकांचा करण्यात आलेल्या या एकदिवसीय सामन्यात शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या दौऱ्यात नाणेफेकीच्या बाबतीत भारताचं नशीब पुन्हा एकदा फळफळलं. मात्र, न्यूझीलंडसाठी सुरुवात अत्यंत निराशाजनक ठरली. पॉवरप्लेमध्ये भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यातून यजमान संघाला सावरताच आलं नाही. औकिब नबीने पहिल्या सहा षटकांत टिम सायफर्ट आणि विल यंग यांना माघारी धाडलं, तर अंशुल कंबोजनेही आपल्या पहिल्याच षटकात विकेट घेतली. त्यामुळे दहा षटकांअखेर न्यूझीलंडची अवस्था ३ बाद २९ अशी झाली. मधल्या षटकांमध्ये गुरनूर ब्रारने शानदार गोलंदाजी करत टॉम लॅथम, ग्लेन फिलिप्स, कर्णधार मिचेल सँटनर आणि ब्लेअर टिकनर यांना बाद केलं. डॅरिल मिचेलची झुंजार ५५ धावांची खेळी हीच न्यूझीलंडच्या डावातील एकमेव दिलासादायक बाब ठरली. अखेर न्यूझीलंडचा संपूर्ण संघ ४१ षटकांत अवघ्या १३४ धावांत गारद झाला.

रोहितची तुफानी फटकेबाजी, विराटच्या नावावर नवा विक्रम

कागदावर भारतासमोरचं लक्ष्य सोपं वाटत होतं, पण प्रत्यक्षात धावांचा पाठलाग तितकासा सोपा ठरला नाही. रोहित शर्माने ऑफ साइडला शानदार चौकार लगावत आपलं खातं उघडलं. मात्र, पहिल्याच षटकात जेकब डफीच्या गोलंदाजीवर स्लिपमध्ये झेल देत शुभमन गिल बाद झाला. त्यानंतर विराट कोहलीही अवघ्या सात धावा करून मिड-ऑफला झेल देत माघारी परतला. मात्र, या छोट्याशा खेळीतही विराटने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये १९७८ धावा करत तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. दुसरीकडे, आपला हिटमॅन रोहित शर्मा मैदानावर असेपर्यंत चाहत्यांचं भरपूर मनोरंजन करत होता. त्याने अवघ्या २३ धावांच्या खेळीत दोन चौकार आणि दोन षटकार लगावले. पुल आणि फ्लिक फटक्यांची सुंदर झलक दाखवत त्याने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. मात्र, पॉवरप्लेच्या अखेरीस काइल जेमिसनने त्याला बाद केलं. या टप्प्यावर भारताची अवस्था ३ बाद ४० अशी झाली होती. आवश्यक धावगतीपेक्षा भारताची धावगती चांगली असली, तरी सामन्याचं पारडं झपाट्याने न्यूझीलंडच्या बाजूने झुकू लागलं होतं.

न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांचं जोरदार पुनरागमन

न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांनी भारताला पुन्हा सामन्यावर पकड मिळवण्याची संधीच दिली नाही. काइल जेमिसनने ३५ धावांत तीन विकेट्स घेत न्यूझीलंडकडून सर्वोत्तम गोलंदाजी केली, तर जेकब डफीनेही तीन विकेट्स पटकावल्या. मधल्या षटकांमध्ये अक्षर पटेल, श्रेयस अय्यर आणि नमन धीर बाद झाल्यामुळे भारताच्या अडचणी वाढल्या. श्रेयसच्या ३० धावांच्या खेळीमुळे भारताच्या विजयाच्या आशा कायम होत्या. त्याने केएल राहुलसोबत ३९ धावांची भागीदारी रचत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. भारतीय डावातील हीच सर्वात आश्वासक भागीदारी ठरली. मात्र, भारताची धावसंख्या ७ बाद १११ असताना जेमिसनने पुन्हा एकदा विकेट घेतली आणि सामना अधिकच चुरशीचा झाला.

पावसाचा खेळखंडोबा, DLS पद्धतीनुसार भारताचा विजय

अखेर पावसानेच सामन्याचा निकाल निश्चित केला. भारताने २६ षटकांत ७ बाद ११३ धावा केल्या असताना पावसामुळे खेळ थांबवण्यात आला. त्यावेळी डकवर्थ-लुईस-स्टर्न (DLS) पद्धतीनुसार भारतासाठी निर्धारित धावसंख्या १०९ होती. पावसामुळे पुढे खेळ होऊ न शकल्याने सामना थांबवण्यात आला आणि भारताला चार धावांनी विजयी घोषित करण्यात आलं. फलंदाजांची सातत्याने पडझड होत असताना केएल राहुलने नाबाद २६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत भारताचा डाव सावरला. या विजयासह भारताने मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे.

संक्षिप्त धावफलक

न्यूझीलंड: ४१ षटकांत सर्वबाद १३४ (डॅरिल मिचेल ५५, मिचेल सँटनर ३१; गुरनूर ब्रार ४/३०) विरुद्ध भारत: २६ षटकांत ७ बाद ११३ (श्रेयस अय्यर ३०, केएल राहुल २६*; काइल जेमिसन ३/३५). DLS पद्धतीनुसार भारताचा चार धावांनी विजय.