“WPL लिलावात आमच्या मनासारख्या गोष्टी घडल्याचा खूप आनंद आहे”: ल्यूक विल्यम्स
नवे चेहरे, नवा उत्साह आणि मुंबई इंडियन्सच्या निळ्या-सोनेरी रंगांत एका नव्या पर्वाची चाहूल! आगामी WPL २०२७ हंगामासाठी योग्य खेळाडूंची निवड करून संतुलित संघ उभारण्याच्या दिशेने मुंबई इंडियन्सने पावलं टाकली आहेत. आता या संघबांधणीमागील विचार जाणून घेण्याची वेळ आली आहे. कोचीमध्ये झालेल्या लिलावात मुंबई इंडियन्सची कामगिरी कशी राहिली, खेळाडूंच्या निवडीमागे कोणती रणनीती होती आणि नव्या हंगामात संघासमोर कोणत्या संधी आहेत, याबाबत लिलावानंतर मुख्य प्रशिक्षक ल्यूक विल्यम्स यांनी आपले विचार मांडले.
सर्वप्रथम लिलावातील मुंबई इंडियन्सच्या कामगिरीबद्दल बोलताना ल्यूक म्हणाले, “मुंबई इंडियन्ससाठी लिलाव ज्या पद्धतीने पार पडला, त्याबद्दल आम्ही खूप उत्साही आहोत. लिलावापूर्वीच आम्ही काही प्रमुख खेळाडूंना कायम ठेवून संघाचा मुख्य गट निश्चित केला होता. त्यामुळे संघातील वेगवेगळ्या भूमिकांसाठी आणखी सक्षम पर्याय उपलब्ध करून देण्यावर आमचा भर होता. हे उद्दिष्ट साध्य करण्यात आम्हाला यश मिळालं आहे, असं आम्हाला वाटतं.”
लिलावात मुंबई इंडियन्सने आपली प्रमुख उद्दिष्टं साध्य केल्याबद्दल ते पुढे म्हणाले, “सुरुवातीला आम्ही किरण नवगिरेसाठी बोली लावली होती, पण दुर्दैवाने तिला संघात घेण्यात आम्हाला यश आलं नाही. मात्र त्यानंतर आम्ही ठरवलेल्या अनेक खेळाडूंना संघात घेण्यात यशस्वी ठरलो. एकूणच लिलावात आमच्या मनासारख्या गोष्टी घडल्याचा खूप आनंद आहे.”
मुंबई इंडियन्सने नुकत्याच संघात घेतलेल्या सहा युवा खेळाडूंमध्ये कोणत्या गोष्टी विशेष भावल्या, याबाबत ल्यूक म्हणाले, “आमच्या स्काउटिंग टीमने या खेळाडूंची निवड केली होती. त्यानंतर चाचण्यांदरम्यान आम्ही त्यांच्या खेळाचं बारकाईने निरीक्षण केलं. त्यांचा दृष्टिकोन आणि कौशल्याची पातळी पाहून आम्ही खूप प्रभावित झालो. या सर्व खेळाडू मुंबई इंडियन्स परिवारात उत्तम प्रकारे सामावून जातील, असा आम्हाला विश्वास आहे.”
मुंबई इंडियन्सने अनकॅप्ड भारतीय खेळाडूंना संघात स्थान दिल्याबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं, “लिलावात आम्ही कॅप्ड आणि अनकॅप्ड अशा दोन्ही प्रकारच्या खेळाडूंच्या निवडीसाठी तयार होतो. आगामी हंगामात काही प्रतिभावान अनकॅप्ड खेळाडू संघात असणं ही आमच्यासाठी उत्साहवर्धक गोष्ट आहे. मुंबई इंडियन्सच्या वातावरणात ते कशी कामगिरी करतात आणि त्यांच्या खेळाचा कसा विकास होतो, हे पाहणंही रंजक ठरेल.”
अखेरीस, आपली मुंबईकर सानिका चाळकेचा संघात समावेश झाल्याबद्दल ल्यूक यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, “सानिका ही डावखुरी फलंदाज असून तिच्या समावेशामुळे आमच्या संघाच्या फलंदाजीला आणखी बळकटी मिळाली आहे. त्यातच ती मुंबईची स्थानिक खेळाडू आहे, हीदेखील खूप चांगली गोष्ट आहे. तिला मुंबई इंडियन्सच्या संघात स्थान मिळाल्याचा जितका आनंद झाला असेल, तितकाच आनंद आम्हालाही तिला संघात घेता आल्याचा झाला आहे, याची मला खात्री आहे.”