“रोहितने वाढदिवसाला चेहऱ्याला केक लावू नका असं सांगितलंय... पण मी लावणारच”: शार्दुल ठाकूर

“रोहितने वाढदिवसाला चेहऱ्याला केक लावू नका असं सांगितलंय... पण मी लावणारच”: शार्दुल ठाकूर

By Mumbai Indians

वानखेडे पुन्हा एकदा डरकाळी फोडण्यासाठी तयार होत असताना आपणही जोरदार जल्लोषासाठी तयार होऊया. कारण २९ एप्रिल २०२६ रोजी आपला सामना आहे सनरायझर्स हैदराबादसोबत. विजयी वारूवर स्वार होऊन आपल्या डीएनएमधला नेव्हर गिव्ह अप फॅक्टर जगाला दाखवण्याची ही वेळ आहे. उत्साह वाढू लागला आहे, कठीण परिस्थिती आहे आणि मुंबई इंडियन्स मधल्या टप्प्यात पुन्हा एकदा गर्जना करण्यासाठी सज्ज आहे. सामन्यापूर्वी आपला अष्टपैलू शार्दुल ठाकूरने एमआय चर्चामध्ये सहभाग घेऊन आपल्या खास आणि उत्साही पद्धतीने संवादात प्राण ओतला.

त्याने सर्वप्रथम पालघरमधून येऊन भारताचे प्रतिनिधित्व करण्यापर्यंतच्या प्रवासाबाबत सांगितलं. त्यानंतर मुंबई इंडियन्समध्ये येऊन वानखेडेवर खेळण्याबाबत बोलताना शार्दुल म्हणाला की, “हो, वानखेडे स्टेडियम खूप खास आहे कारण मी ते लहानपणी पाहिले होते. तुम्ही लोकल ट्रेनमध्ये प्रवास करता तेव्हा आझाद, क्रॉस आणि ओव्हल मैदान दिसते. आयुष्यात कधीतरी मी तिथे खेळेन असे माझे कायम स्वप्न होते. आधी रणजी ट्रॉफी खेळणे, मग भारतासाठी खेळणे आणि मग वानखेडेवर मुंबी इंडियन्ससाठी खेळणे हा एक वेगळा अनुभव आहे. तुमच्या नावाशी मुंबईचे नाव जोडले जाते तेव्हा तिथे खेळणे हा एक अद्भुत अनुभव असतो. चाहते तुम्हाला जोरदार पाठिंबा देतात, स्टेडियम उत्साहाने फुललेले असते आणि मुंबईच्या मातीत खेळणे हा वेगळा आनंद आहे.”

रोहित शर्माबाबतच्या त्याच्या खास नात्याबाबत बोलताना शार्दुल म्हणाला, “रोहित मला मागच्या काही वर्षांपासून ओळखतो. मी शाळेत सराव सत्रात असताना त्याने मला सर्वप्रथम पाहिले. मी १५ वर्षांचा होतो. त्यानंतर मी रणजीसाठी खेळायला लागलो आणि त्यानंतर माझी निवड भारतासाठी झाली. आम्ही खूप वेळ सोबत घालवला. तो माझा वरिष्ठ असतानाही त्याने मला अत्यंत प्रेमाने वागवले. आम्ही दोघे एकमेकांसोबत असताना चेष्टामस्करी करू शकतो. एक सीनियर प्रो असून मला त्याच्या स्पेसमध्ये एंट्री देणे ही एक मोठी गोष्ट आहे. असं सगळे करत नाहीत.”

“रोहित एक व्यक्ती म्हणून कधीही बदललेला नाही. तो अतिशय नम्र आहे. त्याला आपण कुठून आलो हे माहीत आहे. त्यामुळे तो प्रत्येक व्यक्तीचा आदर करतो. मी त्याला सांगितले आहे की तुझ्यामधले मूल असेच कायम ठेव. त्याचे एक कारण होते. तो स्वतःला ज्या प्रकारे सादर करतो ते अनेक वर्षे खेळल्यानंतर, स्टारडम आणि प्रसिद्धी मिळाल्यानंतरही तसेच आहे. हे सगळे मिळाल्यावर लोक बदलतात. पण रोहित आहे तसाच आहे. ही एक खूप मोठी गोष्ट आहे,” शार्दुल म्हणाला.

मधल्या फळीत एक भागीदारी बहरत असताना विकेट्स घेण्याबाबत लॉर्ड शार्दुल म्हणाला, “ही सगळी देवाची कृपा आहे. माझे काम मैदानात उतरून सर्वोत्तम कामगिरी करण्याचे आहे. मी आव्हाने स्वीकारायला कायम तयार असतो. बऱ्याचदा मला लवकर विकेट्सही मिळाल्या आहेत. माझ्या टीमसाठी हे शक्य करता आले त्याबद्दल मी स्वतःला नशीबवान समजतो.”
त्यानंतर पारस म्हाम्ब्रे आणि लसिथ मलिंगा यांच्या प्रशिक्षणाच्या पद्धतीतील फरकाबाबत आणि नेट सत्र त्यांच्यासोबत कसे वाटते याबाबत बोलताना तो म्हणाला, “मी पारससोबत खूप काम केले आहे आणि आमच्यातील नाते खूप छान आहे. त्याच्या मते प्रत्येक गोष्ट आकडेवारी, कोणत्या फलंदाजांविरूद्ध कोणत्या चेंडूंचा तसेच मैदानातील कोणत्या जागांचा वापर करता येईल याच्याशी संबंधित असते. मलिंगासोबत सराव करताना मैदानात प्रॅक्टिकल विचार करणे, एखाद्या फलंदाजाला फसवण्यासाठी पर्याय कशा रितीने शोधायचे आणि नवीन कल्पना कशा आणायच्या या गोष्टी महत्त्वाच्या असतात. दोघांच्या स्टाइल्स वेगवेगळ्या आणि उपयुक्त आहेत.”

रोहित शर्माचा वाढदिवस येत असताना (३० एप्रिल) शार्दुलने त्याच्या चेहऱ्याला केक लावायची इच्छा व्यक्त केली. “त्याने आम्हा सर्वांना सांगितले आहे की चेहऱ्याला केक लावू नका. पण मी तर रोहितच्या चेहऱ्याला केक लावल्याशिवाय राहणार नाही.” 😆

भागीदारी मोडण्यापासून ते फटकेबाजीपर्यंत शार्दुल ठाकूर एमआयला हवे असलेले परिपूर्ण पॅकेज आहे! 🔥