मनापासून धन्यवाद, लिसा किटली!

मनापासून धन्यवाद, लिसा किटली!

By Mumbai Indians

प्रिय लिसा,

काही प्रवास हंगामांमध्ये मोजले जातात, काही निकाल आणि आकडेवारीत. पण खऱ्या अर्थाने खास असलेले प्रवास मोजले जातात वाटेत भेटलेल्या माणसांमध्ये, जुळलेल्या नात्यांमध्ये, मागे ठेवलेल्या शिकवणीत आणि हंगाम संपल्यानंतरही कायम सोबत राहणाऱ्या आठवणींमध्ये. मुंबई इंडियन्स महिला संघासोबतचा तुमचा प्रवासही असाच खूप खास राहिला आहे.

वुमन इन ब्लू अँड गोल्डसोबतचा तुमचा हा अध्याय आता संपत असताना, आमच्या #OneFamily साठी तुम्ही दिलेल्या प्रत्येक योगदानाकडे आम्ही कृतज्ञतेने मागे वळून पाहतो. ड्रेसिंग रूमपासून डगआऊटपर्यंत, सराव सत्रांपासून सामन्यांच्या दिवसांपर्यंत तुम्ही तुमचा अनुभव, ज्ञान, सकारात्मकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या संघाला शिकण्यासाठी, परिस्थितीनुसार जुळवून घेण्यासाठी आणि सातत्याने प्रगती करण्यासाठी मदत करण्याची बांधिलकी सोबत आणलीत. तुम्ही असं वातावरण निर्माण केलंत, जिथे आमच्या खेळाडूंना स्वतःला व्यक्त करता आलं, शिकता आलं आणि मैदानावर आपल्या शंभर टक्क्यांहून अधिक योगदान देता आलं.

क्रिकेटची उत्तम जाण आणि सर्वोच्च स्तरावरील अनेक वर्षांच्या अनुभवातून तुम्ही संघाला ज्ञानाचा मोठा खजिना दिलात. पण क्रिकेटच्या पलीकडेही... तुमची ऊर्जा, आपुलकी आणि प्रत्येक गोष्टीकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहण्याची क्षमता यामुळे खरा फरक पडला.

काही जण संघाचा एक भाग बनतात... पण लिसा, तुम्ही आमच्या कहाणीचाच एक भाग बनलात. मनमोकळ्या गप्पा, शिकवण, हास्याचे क्षण, चांगले आणि कठीण दिवस आणि आपल्या प्रवासाला आकार देणारे असे कितीतरी छोटे-छोटे क्षण तुमच्यासोबत जोडले गेले.

आता तुम्ही क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या नॅशनल डेव्हलपमेंट लीड म्हणून एका नव्या अध्यायाला सुरुवात करत आहात. या नव्या वाटचालीसाठी तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा. MI कुटुंबाचा इतका खास भाग राहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

पण मुंबई इंडियन्स मध्ये आम्ही नेहमी म्हणतो त्याप्रमाणे…

एकदा MI चा भाग झालात, की कायम MI चाच भाग राहता.