दर्जेदार प्रवासाची अजरामर कहाणी : धन्यवाद, अजिंक्य रहाणे! 💙

दर्जेदार प्रवासाची अजरामर कहाणी : धन्यवाद, अजिंक्य रहाणे! 💙

By Mumbai Indians

प्रत्येक पिढीला असा एखादा क्रिकेटपटू पाहण्याचं भाग्य लाभतं, जो आपल्याला शिकवून जातो की महानता ही केवळ क्रिकेटच्या मैदानापुरती मर्यादित नसते. अजिंक्य रहाणे हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. आज सोशल मीडियावरील एका भावनिक व्हिडिओद्वारे त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. भारतासाठी त्यांनी ८५ कसोटी, ९० एकदिवसीय आणि २० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळत आपल्या कारकिर्दीचा सुवर्ण अध्याय पूर्ण केला.

अजिंक्य नेहमीच आपल्या शब्दांपेक्षा बॅटने अधिक बोलला. कर्णधार म्हणूनही त्याने स्वतः पुढाकार घेत आदर्श नेतृत्व कसं असावं, हे दाखवून दिलं. भारतीय क्रिकेटची जबाबदारी त्याने नेहमीच शांतपणे, सन्मानाने आणि विलक्षण संयमाने पेलली. निवृत्ती जाहीर करताना तो म्हणाला, "जीवनाचं वास्तव हेच आहे की प्रत्येक गोष्टीची सुरुवात असते आणि प्रत्येक गोष्टीचा शेवटही असतो. वेळ आली की तिचा आदर करून पुढे जायचं असतं. फलंदाज म्हणून मी नेहमी योग्य 'टायमिंग'वर विश्वास ठेवला आहे आणि त्याचं महत्त्व समजून घेतलं आहे. आज मला वाटतं की पुढे जाण्याची आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करण्याची हीच योग्य वेळ आहे." एका विलक्षण कारकिर्दीचा पडदा आज जरी पडला असला, तरी त्याचा प्रेरणादायी प्रवास अनेक युवा क्रिकेटपटूंना कायम प्रेरणा देत राहील.

मोठ्या मंचावर क्रिकेट खेळण्याचं स्वप्न डोळ्यांत घेऊन मुंबईच्या मैदानांतून घडलेला अजिंक्य रहाणे २००८ मध्ये, अवघ्या १९व्या वर्षी मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूममध्ये दाखल झाला. अभिमानाने निळ्या आणि सोनेरी रंगांची जर्सी परिधान करत त्याने आपल्या व्यावसायिक प्रवासाची सुरुवात केली. पुढील दोन हंगाम मुंबई इंडियन्ससोबत घालवताना त्याला अनेक दिग्गजांसोबत ड्रेसिंग रूम शेअर करण्याची संधी मिळाली. त्या काळात मिळालेला प्रत्येक धडा आत्मसात करत त्याने मोठ्या मंचावरील पहिली पावलं टाकली. त्याच क्षणापासून जिद्द, नम्रता आणि दर्जा या मूल्यांनी सजलेला त्याचा प्रवास सुरू झाला.

अजिंक्य पुढे म्हणाला, "डोंबिवलीहून रोज सरावासाठी प्रवास करणाऱ्या त्या लहान मुलापासून ते भारतासाठी खेळण्यापर्यंत... या खेळासाठी मी माझं सर्वस्व दिलं. प्रत्येक दिवस, प्रत्येक डाव आणि फलंदाजीची प्रत्येक संधी माझ्यासाठी भारताची टोपी घालण्याच्या स्वप्नाशी जोडलेली होती. मी नेहमी एकाच तत्त्वावर जगलो – स्वतःपेक्षा देश आणि संघाला प्राधान्य द्यायचं. मी हा खेळ पूर्ण प्रामाणिकपणे खेळलो आणि नेहमी विश्वास ठेवला की तुमचा हेतू योग्य असेल, तर खेळ तुमची काळजी स्वतः घेतो."

अजिंक्य रहाणेची खरी गुणवत्ता कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक खुलून आली. आव्हानात्मक परदेशी परिस्थितीत त्याचे देखणे ड्राइव्ह, मऊ हातांनी खेळलेले फटके आणि अप्रतिम संतुलन पाहणं ही क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणीच असायची.

मात्र त्याच्या कारकिर्दीचा सर्वात मोठा अध्याय ठरली २०२०-२१ ची बॉर्डर-गावसकर ट्रॉफी. कठीण परिस्थितीतून भारतीय संघाला सावरत त्याने नेतृत्वाची नवी व्याख्या लिहिली. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवरील त्याचं शतक आजही चाहत्यांच्या स्मरणात ताजं आहे. त्यानंतर १९ जानेवारी २०२१ रोजी गब्बा येथे भारताला ऐतिहासिक तीन विकेट्सनी विजय मिळवून देत, ऑस्ट्रेलियाचा त्या मैदानावरील ३२ वर्षांचा अजिंक्य विक्रम मोडीत काढला आणि भारताने मालिका २-१ अशी जिंकली.

अजिंक्यने आपल्या कसोटी कारकिर्दीत १२ शतकं झळकावली. त्यापैकी अनेक खेळी इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि वेस्ट इंडिजसारख्या बलाढ्य संघांविरुद्ध आल्या. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्येही त्याने भारताचं प्रतिनिधित्व करत २०१४ आणि २०१६ टी-२० विश्वचषक, तसेच २०१५ एकदिवसीय विश्वचषक खेळला. आता पुढच्या पिढीसोबत आपला अनुभव वाटून घेण्याची त्याची इच्छा आहे. तो म्हणाला, "या खेळाने मला जे काही दिलं, त्याचं ऋण फेडण्यासाठी पुढच्या पिढीला मार्गदर्शन करायचं आहे. क्रिकेटने मला शिकवलेल्या मूल्यांचा वारसा त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. मुंबईतून एका तरुण क्रिकेटपटू म्हणून सुरुवात करून भारतासाठी खेळण्याचा प्रवास माझ्यासाठी मोठा सन्मान होता. या प्रवासात विजयही आले, पराभवही आले. पण क्रिकेट खेळण्याचा आनंद, विविध संघांसोबत खेळण्याची संधी आणि आयुष्यभरासाठी आठवणी कमावणं, हाच माझ्या कारकिर्दीचा सर्वात मोठा समाधानाचा भाग आहे."

चाहत्यांचे आभार मानताना त्याने मनापासून भावना व्यक्त केल्या. "प्रत्येक चढ-उतारात माझ्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिलेल्या सर्व क्रिकेट चाहत्यांचे मनःपूर्वक आभार. 'अजिंक्य' म्हणजे अजिंक्य, पण क्रिकेटने मला अनेकदा पराभव दाखवला. मात्र एक जागा अशी होती जिथे मी कधीच हरलो नाही... ती म्हणजे तुमची मनं. तुम्ही मला कधी परका मानलाच नाही. तुमच्या प्रेमासाठी, विश्वासासाठी आणि पाठिंब्यासाठी मनापासून धन्यवाद. कॅप क्रमांक २७८... आता निरोप घेतो."

या प्रवासाचा हा अध्याय संपला असला, तरी तुमचा वारसा कायम प्रेरणा देत राहील. मुंबईच्या मातीपासून मोठी स्वप्ने पाहण्याचं धाडस करणाऱ्या असंख्य भावी क्रिकेटपटूंसाठी तुमची कहाणी कायम दीपस्तंभ ठरेल. धन्यवाद, अजिंक्य. 💙