ENGvIND एकदिवसीय मालिका पूर्वावलोकन: अनुभवी खेळाडूंचे पुनरागमन = नव्या सुरुवातीची संधी

ENGvIND एकदिवसीय मालिका पूर्वावलोकन: अनुभवी खेळाडूंचे पुनरागमन = नव्या सुरुवातीची संधी

By Mumbai Indians

आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे खरे वैशिष्ट्य म्हणजे परिस्थिती क्षणार्धात बदलू शकते. टी२० मालिका इंग्लंडच्या नावावर गेली असली, तरी आता सुरू होणारी एकदिवसीय मालिका पूर्णपणे वेगळे चित्र दाखवू शकते. भारताकडे केवळ निकाल बदलण्याचीच नव्हे, तर मानसिकतेतही नव्याने सुरुवात करण्याची सुवर्णसंधी आहे. या स्वरूपात लांब फलंदाजी, महत्त्वपूर्ण भागीदाऱ्या, जोडीने मारा करणारे गोलंदाज, डावाच्या विविध टप्प्यांमध्ये प्रभाव टाकण्याची क्षमता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुरुवातीपासूनच परिस्थितीशी जुळवून घेणे हे यशाचे मुख्य सूत्र ठरणार आहे. 💙

भारताचा कर्णधार शुभमन गिल अनुभवी आणि युवा खेळाडूंचा उत्तम समतोल असलेल्या संघासह आपली छाप पाडण्यास उत्सुक असेल. 'मेन इन ब्लू'ला पुनरागमनाची पूर्ण आशा बाळगण्यास पुरेशी कारणे आहेत. रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांसारख्या अनुभवी खेळाडूंचे पुनरागमन केवळ संघाची ताकद वाढवणार नाही, तर पाहुण्या संघाचा आत्मविश्वासही उंचावणार आहे. 🧿🙏

मुंबई इंडियन्सच्या आपल्या अनुभवी जोडीकडे विशेष लक्ष ठेवा. सर्वप्रथम आपल्या मुंबईचा राजा रो-हिटमन शर्मा. डावाच्या सुरुवातीलाच तो सामन्याचा वेग ठरवू शकतो, नव्या चेंडूचे आव्हान समर्थपणे पेलू शकतो आणि क्षणार्धात गती बदलू शकतो. सुरुवातीला मिळालेल्या संधींचे मोठ्या शतकांत रूपांतर करण्याची त्याची क्षमता विलक्षण आहे.

दुसऱ्या बाजूला बूम बूम बुमराह हा भारताचा सर्वात मोठा तुरुपाचा पत्ता आहे. महत्त्वाच्या भागीदाऱ्या मोडून काढणे, डेथ ओव्हर्समध्ये सलग अचूक यॉर्कर्स टाकणे आणि सामन्याची दिशा बदलणे—यामुळे तो कोणत्याही कर्णधारासाठी अमूल्य ठरतो. अशा दिग्गज खेळाडूंमुळे संघात शांतता, अनुभव आणि आत्मविश्वास येतो. 👏

या मालिकेतील तीन सामने तीन वेगवेगळ्या मैदानांवर होणार असल्याने प्रत्येक ठिकाणी वेगळे आव्हान असेल. पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे पलटनच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद फुलवण्याची ही मोठी संधी आहे.

बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन हे फलंदाजांसाठी अनुकूल मैदान मानले जाते. मात्र नव्या चेंडूने सुरुवातीला चांगली सीम मूव्हमेंट मिळू शकते, ज्याचा वेगवान गोलंदाज फायदा घेऊ शकतात.

कार्डिफमधील सोफिया गार्डन्स हे तुलनेने संतुलित खेळपट्टीसाठी ओळखले जाते. येथे फलंदाजांना चांगली सुरुवात करून मोठ्या खेळीत रूपांतर करण्याची संधी मिळते, तर पॉवरप्लेमध्ये शिस्तबद्ध गोलंदाजी आणि मधल्या षटकांत फिरकीपटूंना मदत मिळू शकते.

लॉर्ड्स, लंडन येथे होणाऱ्या अखेरच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणारा संघ सुरुवातीच्या स्विंगचा सामना करत मधल्या षटकांत धावगती वाढवण्याचा आणि अखेरीस मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करेल.

या मालिकेतील काही महत्त्वाच्या लढतींपैकी शुभमन गिल विरुद्ध जोफ्रा आर्चर ही निश्चितच लक्षवेधी असेल. अलीकडच्या काळात आर्चर उत्कृष्ट लयीत गोलंदाजी करत आहे.

तसेच दोन्ही JB मैदानात असताना जसप्रीत बुमराह विरुद्ध जोस बटलर ही लढतही रोमांचक ठरेल, विशेषतः नव्या चेंडूवर.

दुसरीकडे, मधल्या षटकांत कुलदीप यादव आपल्या विविधतेने इंग्लंडच्या फलंदाजीची लय बिघडवू शकतो. या मालिकेतील एक्स-फॅक्टर उंचापुरा वेगवान गोलंदाज गुरनूर बरार ठरू शकतो.

भारत आता नव्या प्रवासाला सुरुवात करत आहे. अनुभवी खेळाडूंचे पुनरागमन, नव्याने जागलेला आत्मविश्वास आणि स्पष्ट रणनीती यामुळे विजयी मार्गावर परतण्यासाठी आवश्यक असलेले सर्व घटक भारतीय संघाकडे आहेत. रंगमंच सजला आहे... आता मास्टरस्ट्रोक खेळण्याची वेळ आली आहे. 💙

इंग्लंड दौरा – भारताची एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक

सामना

तारीख

संघ

स्थळ

वेळ

पहिला एकदिवसीय

१४ जुलै २०२६

इंग्लंड विरुद्ध भारत

बर्मिंगहॅम

सकाळी ११:०० (स्थानिक वेळ) / दुपारी ३:३० (IST)

दुसरा एकदिवसीय

१६ जुलै २०२६

इंग्लंड विरुद्ध भारत

कार्डिफ

दुपारी १:०० (स्थानिक वेळ) / सायंकाळी ५:३० (IST)

तिसरा एकदिवसीय

१९ जुलै २०२६

इंग्लंड विरुद्ध भारत

लंडन

सकाळी ११:०० (स्थानिक वेळ) / दुपारी ३:३० (IST)