जिद्द, नजाकत आणि लढाऊ वृत्तीने सजलेलं तिलकचं शतक

जिद्द, नजाकत आणि लढाऊ वृत्तीने सजलेलं तिलकचं शतक

By Mumbai Indians

संकटातून संघाला सावरत आपल्या तिलक वर्माने जबाबदारी घेतली खांद्यावर,

लढाई सुरू असताना क्रीझवर कायम शांत आणि संयमी,

संघासाठी सर्वस्व पणाला लावून केली त्याने फलंदाजी.

आठ प्रथम श्रेणी शतके झाली, हा आकडा अजून वाढतोय,

TV चा संयम, स्वभाव आणि कौशल्य पुन्हा एकदा दिसून येतोय.

दुसऱ्या बाजूला विकेट्स पडत गेल्या... दबावही वाढत गेला,

पण युवा तिलकला नेमकं काय करायचं, हे चांगलंच ठाऊक होतं.

एकेक चेंडू खेळत, एकेक धाव जोडत,

त्याने आपल्या डावाला दिला भक्कम आकार.

आणि जेव्हा आला तो मोठा क्षण, तेव्हा चमकण्याची वेळ होती त्याची...

खऱ्या अर्थाने कर्णधाराला साजेसं शतक, अगदी योग्य वेळी साकारलेलं.

चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या तिलक वर्मासमोर एक महत्त्वाची जबाबदारी होती... दुलीप ट्रॉफी २०२६ च्या उपांत्य फेरीच्या दुसऱ्या दिवशी आपल्या दक्षिण विभागासाठी जास्तीत जास्त धावा करायच्या. दबाव स्पष्टपणे जाणवत होता, एका पाठोपाठ एक विकेट्स पडत होत्या आणि उत्तर विभागाने उभारलेल्या १९५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण विभागाची अवस्था ३०.४ षटकांत ५ बाद ८० अशी झाली होती.

संघाला त्याची सर्वाधिक गरज असताना कर्णधार तिलक खंबीरपणे उभा राहिला, त्याने जबाबदारी स्वीकारली आणि त्यानंतर पाहायला मिळाली ती उच्च दर्जाची खेळी. त्याने परिस्थितीचा अचूक अंदाज घेतला, पुरेसा वेळ घेतला... क्रीझवर स्थिरावला आणि मग आपल्या शैलीत फटके खेळायला सुरुवात केली. प्रत्येक धाव त्याने मेहनतीने कमावली आणि त्याने रचलेली प्रत्येक भागीदारी महत्त्वाची ठरली. दबावातही शांत आणि संयमी राहत त्याने गोलंदाजांना आपल्या रणनीतीचा फेरविचार करण्यास भाग पाडले. अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर त्याच्या बॅटमधून चौकारही येऊ लागले आणि त्याने काही अप्रतिम फटके खेळले. TV च्या या दमदार खेळीला ड्रेसिंग रूममधून उभं राहून दाद मिळाली.

त्याची निर्णयक्षमता विशेष लक्षवेधी ठरली. एकामागून एक सत्र क्रीझवर टिकून राहण्याच्या त्याच्या जिद्दीचेही भरभरून कौतुक झाले. दुसऱ्या बाजूला असलेल्या आपल्या साथीदारांचा आत्मविश्वास तो सातत्याने वाढवत राहिला आणि श्रेयस गोपालसोबत महत्त्वपूर्ण १७५ धावांची भागीदारी रचली. गुरनूर ब्रारच्या चेंडूवर लेग साइडला शानदार फ्लिक करत चौकार ठोकून त्याने दिमाखात आपले शतक पूर्ण केले.

तिलकने बॅटने आघाडीवरून नेतृत्व करत शानदार खेळी साकारली आणि आपले आठवे प्रथम श्रेणी शतक पूर्ण केले. दिवसअखेर तो २२५ चेंडूंमध्ये सात चौकारांसह नाबाद १०६ धावांवर खेळत होता. तिलकची ही खेळी केवळ आकर्षक आकड्यांबद्दल नव्हती; सामन्याला जेव्हा त्याची सर्वाधिक गरज होती, तेव्हा दबावातही संयम राखून सर्वोत्तम कामगिरी करण्याच्या त्याच्या स्वभावाची ती खरी झलक होती.