अर्शदीप सिंग: विकेट्सचा हुकमी एक्का, सामन्याचं चित्र पालटणारा गोलंदाज!

अर्शदीप सिंग: विकेट्सचा हुकमी एक्का, सामन्याचं चित्र पालटणारा गोलंदाज!

By Mumbai Indians

काही गोलंदाज नव्या चेंडूने आपली छाप पाडतात, तर काही डेथ ओव्हर्समध्ये सामन्याचं चित्र पालटतात. पण आपला अर्शदीप सिंग असा गोलंदाज आहे, जो प्रत्येक स्पेलमध्ये काहीतरी खास करून दाखवण्याची क्षमता ठेवतो. नव्या चेंडूला सुरुवातीलाच स्विंग मिळवून देणं, आपल्या कौशल्याचा अचूक वापर करणं आणि चेंडूलाच बोलू देणं... न्यूझीलंडविरुद्ध त्याची ही गोलंदाजी पाहणं म्हणजे क्रिकेटप्रेमींसाठी एक पर्वणीच होती.

पाच सामने, आठ विकेट्स, सर्वोत्तम गोलंदाजी ४/७० आणि ४.६२ चा इकॉनॉमी रेट... न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील अर्शदीपची ही आकडेवारी त्याच्या कामगिरीची साक्ष देते. मात्र, या आकड्यांमागे असा गोलंदाज आहे, ज्याला फलंदाजांवर दबाव कसा निर्माण करायचा, योग्य वेळी महत्त्वपूर्ण विकेट कशी मिळवायची आणि सामन्याचं पारडं आपल्या संघाच्या बाजूने कसं झुकवायचं, हे उत्तम प्रकारे ठाऊक आहे. अर्शदीपच्या खेळात आक्रमकता, संयम, अष्टपैलू गोलंदाजीचं कौशल्य आणि निडर वृत्ती यांचा सुरेख मिलाफ पाहायला मिळतो. परदेशातील परिस्थिती, वेगवेगळ्या खेळपट्ट्या आणि नवनवी आव्हानं... या सगळ्यांना सामोरं जाताना आपल्या या स्टार गोलंदाजाने आपल्या भात्यातील विविध अस्त्रांचा प्रभावी वापर केला. त्याने केवळ परिस्थितीशी जुळवून घेतलं नाही, तर तिचा पुरेपूर फायदा उठवत प्रत्येक वेळी भारतासाठी मोलाची कामगिरी करून दाखवली.

उत्तम गोलंदाजाची खरी ओळख केवळ त्याने किती विकेट्स घेतल्या यावरून ठरत नाही, तर त्या विकेट्स नेमक्या कोणत्या क्षणी घेतल्या, यावरून ठरते. अर्शदीप मोठ्या क्षणी संघासाठी धावून येणारा गोलंदाज आहे. आपल्या गोलंदाजीतील विविधतेने फलंदाजांना सतत संभ्रमात ठेवणं असो किंवा दबाव वाढत असताना शांत डोक्याने गोलंदाजी करणं असो, अर्शदीप प्रत्येक आव्हानासाठी सज्ज असतो.

ऑकलंडमध्ये दहा षटकांत ७० धावा देत चार विकेट्स घेण्याच्या दमदार कामगिरीपासून ते माउंट माउंगानुई येथील बे ओव्हल मैदानावर पाचव्या वनडे सामन्यात ३० धावांत तीन विकेट्स घेत भारताला विजय मिळवून देण्यापर्यंत... अर्शदीपने संपूर्ण मालिकेत आपली छाप पाडली. ऑकलंडमधील सामन्यात त्याने विल यंग, हेन्री निकोल्स, ग्लेन फिलिप्स आणि काइल जेमिसन यांच्या महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. पाचव्या वनडेत त्याने गोलंदाजीसोबत फलंदाजीतही मोलाचं योगदान दिलं. अवघ्या चार चेंडूंत दोन उत्तुंग षटकारांसह १४ धावा फटकावत त्याने भारताच्या धावसंख्येत भर घातली. या अष्टपैलू कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. अखेर भारताने वनडे मालिका ३-१ अशी आपल्या नावावर केली.

अर्शदीपची कामगिरी त्याच्या गुणवत्तेबद्दल बरंच काही सांगून जाते. त्याच्या सकारात्मक वृत्तीने सर्वांची मनं जिंकली आहेत, तर कोणत्याही परिस्थितीत हार न मानण्याची जिद्द त्याला इतरांपेक्षा वेगळं ठरवते. आता त्याला प्रोत्साहन देण्यासाठी पलटनच्या रूपाने एक नवं कुटुंब मिळालं आहे. अभिमानाने छातीवर मिरवण्यासाठी नवं बोधचिन्ह आणि निळ्या-सोनेरी जर्सीत मैदानावर उतरल्यानंतर घडवण्यासाठी असंख्य नव्या आठवणी त्याची वाट पाहत आहेत. अर्श, तुझ्या स्विंग होणाऱ्या चेंडूंनी फलंदाजांना चकवताना, यष्ट्यांचा वेध घेताना आणि विकेट्सनंतरचे तुझे अविस्मरणीय जल्लोष पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत!