NZvIND चौथा वनडे सामना: विल यंगचं दमदार शतक, मॅट हेन्रीच्या सहा विकेट्सच्या जोरावर न्यूझीलंडचा भारतावर २४४ धावांनी विजय!

NZvIND चौथा वनडे सामना: विल यंगचं दमदार शतक, मॅट हेन्रीच्या सहा विकेट्सच्या जोरावर न्यूझीलंडचा भारतावर २४४ धावांनी विजय!

By Mumbai Indians

विल यंगची १२५ धावांची शानदार खेळी आणि सामनावीर मॅट हेन्रीच्या २७ धावांत सहा विकेट्सच्या जोरावर न्यूझीलंडने माउंट माउंगानुई येथील बे ओव्हल मैदानावर चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा २४४ धावांनी पराभव केला. न्यूझीलंडच्या संघाने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर दमदार कामगिरी करत विजय मिळवला.

विल यंग आणि टिम सायफर्टच्या दमदार सलामीने न्यूझीलंडला मिळाली वेगवान सुरुवात

विल यंग आणि टिम सायफर्ट यांनी पहिल्या विकेटसाठी ८५ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचत न्यूझीलंडला उत्तम सुरुवात करून दिली. पहिल्याच षटकापासून दोघांनीही भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवलं. मैदानातील मोकळ्या जागा हेरत त्यांनी सहज चौकार वसूल केले आणि मोठमोठे फटकेही लगावले. एका बाजूला विल यंगची संयमी आणि आत्मविश्वासपूर्ण फलंदाजी, तर दुसरीकडे सायफर्टचे त्याच्या खास शैलीतील आकर्षक फटके यामुळे भारतीय गोलंदाजांवर दबाव वाढला. या भागीदारीने न्यूझीलंडला सुरुवातीलाच सामन्यावर पकड मिळवून दिली आणि पुढील डावाचा पाया रचला. दहा षटकांअखेर यजमान संघाने बिनबाद ७२ धावा केल्या होत्या. त्यानंतर ४८ चेंडूंत ५८ धावा करणाऱ्या टिम सायफर्टला ईशान किशनने झेलबाद केलं.

हिटमॅन बनला सुपरमॅन, रोहितने टिपला अविश्वसनीय झेल!

फिन ॲलन भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवू लागला आहे, असं वाटत असतानाच अक्षर पटेलने टप्प्यावर टाकलेल्या चेंडूवर त्याला चकवलं. कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या आपल्या रो-हिटमॅन शर्माने सुपरमॅनसारखी झेप घेत अप्रतिम झेल टिपला. उजव्या बाजूला सूर मारत दोन्ही हातांनी पकडलेल्या या शानदार झेलमुळे भारतीय खेळाडूंच्या चेहऱ्यावर आनंद खुलला. ॲलनला ३० चेंडूंत ४१ धावा करून माघारी परतावं लागलं.

विल यंगचं शानदार शतक, न्यूझीलंडच्या डावाला मिळाली भक्कम साथ!

विल यंगने या सामन्यात आपल्या फलंदाजीची वेगळीच छाप पाडली. त्याने शानदार शतक झळकावत एकदिवसीय क्रिकेटमधील आपलं पाचवं, तर भारताविरुद्धचं पहिलं शतक पूर्ण केलं. सुरुवातीला संयमाने डाव उभारल्यानंतर योग्य वेळी आक्रमक पवित्रा घेत त्याने आपलं कौशल्य आणि सामन्यावरील नियंत्रण दाखवून दिलं. आपल्या भात्यातील जवळपास प्रत्येक फटक्याचा वापर करत त्याने भारतीय गोलंदाजांचा समाचार घेतला. त्याची ही खेळी दीर्घकाळ लक्षात राहणारी ठरली. अखेर नमन धीरने विल यंगची महत्त्वपूर्ण विकेट घेतली. यंगने १४ चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने १२५ धावांची शानदार खेळी साकारली.

वेगवान धाव, जबरदस्त झेप आणि नमन धीरचा 'धीर-फिक' झेल!

आधुनिक क्रिकेटमधील उत्कृष्ट क्षेत्ररक्षकांपैकी एक असलेल्या नमन धीरने मैदानावर आपल्या चपळ क्षेत्ररक्षणाची पुन्हा एकदा झलक दाखवली. सीमारेषेजवळून वेगाने पुढे धावत येत त्याने चेंडूवर शेवटच्या क्षणापर्यंत नजर ठेवली आणि पुढे सूर मारत दोन्ही हातांनी अप्रतिम झेल टिपला. या शानदार क्षेत्ररक्षणामुळे मायकेल ब्रेसवेलला निराश होऊन तंबूत परतावं लागलं. त्यावेळी न्यूझीलंडची धावसंख्या ३७.५ षटकांत ६ बाद २५८ अशी होती.

त्यानंतर मिचेल सँटनर, क्लार्क आणि जेमिसन यांनी तळाच्या फळीत महत्त्वपूर्ण योगदान देत न्यूझीलंडची धावसंख्या ५० षटकांत ३३३ पर्यंत पोहोचवली. भारताकडून अक्षर पटेलने ३९ धावांत दोन, औकिब नबीने ५९ धावांत दोन, तर गुरनूर ब्रारने ६९ धावांत दोन विकेट्स घेतल्या.

न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा सुरुवातीलाच धडाका, मॅट हेन्रीच्या सहा विकेट्समुळे भारताची दाणादाण!

मॅट हेन्रीसाठी सामन्यातील पहिलंच षटक स्वप्नवत ठरलं. त्याने रोहित शर्मा, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर या तिन्ही प्रमुख फलंदाजांना बाद करत भारताला सुरुवातीलाच मोठे धक्के दिले. त्यानंतर काइल जेमिसनने ऋतुराज गायकवाडला माघारी धाडलं. त्यामुळे अवघ्या ५.३ षटकांत भारताची अवस्था ४ बाद ९ अशी बिकट झाली.

दुर्दैवाने, त्यानंतरही भारताच्या इतर फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. ठरावीक अंतराने विकेट्स पडत राहिल्यामुळे भारतीय संघावरील दबाव वाढत गेला. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी शेवटपर्यंत आक्रमक मारा करत भारताला सामन्यात पुनरागमन करण्याची कोणतीही संधी दिली नाही. अखेर भारताचा संपूर्ण डाव २६.४ षटकांत अवघ्या ८९ धावांत आटोपला. मॅट हेन्रीने २७ धावांत सहा विकेट्स घेत न्यूझीलंडच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.

संक्षिप्त धावफलक

न्यूझीलंड: ५० षटकांत सर्वबाद ३३३ (विल यंग १२५, टिम सायफर्ट ५८; अक्षर पटेल २/३९) विरुद्ध भारत: २६.४ षटकांत सर्वबाद ८९ (ईशान किशन २७; मॅट हेन्री ६/२७). न्यूझीलंडचा २४४ धावांनी विजय.