“खेळावरच्या प्रेमासाठी पुन्हा एकदा मैदानात उतरण्यास मी सज्ज आहे”: हरमनप्रीत कौर

“खेळावरच्या प्रेमासाठी पुन्हा एकदा मैदानात उतरण्यास मी सज्ज आहे”: हरमनप्रीत कौर

By Mumbai Indians

काही खास खेळाडू विक्रम घडवतात, काही विजेतेपदं जिंकतात, तर काही खेळाची दिशाच बदलून टाकतात. आपल्या हरमनप्रीत कौरने या तिन्ही गोष्टी केल्या आहेत, असं आपण अभिमानाने म्हणू शकतो. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाची कर्णधार म्हणून तिचा अध्याय आता संपला असला, तरी तिने लिहिलेली कहाणी कायम स्मरणात राहील. इतिहासाने आपल्याला एक गोष्ट शिकवली आहे—हरमन जेव्हा जेव्हा आयुष्यातलं एक पान उलटते, तेव्हा पुढच्या पानावर एखादा मोठा क्षण तिची वाट पाहत असतो. लिजंड, तुला सलाम! भारतीय महिला क्रिकेट जग जिंकू शकतं, हा विश्वास तू एका संपूर्ण पिढीच्या मनात निर्माण केलास. आणि हरमनला ओळखणाऱ्यांना माहीत आहे की, ब्लू जर्सीमध्ये अजूनही बरंच काही साध्य करण्याची तिची भूक कायम आहे.

अब्जावधी भारतीयांच्या अपेक्षांचं ओझं खांद्यावर घेण्यापासून कर्णधार म्हणून सर्वात मोठ्या मंचावर इतिहास घडवण्यापर्यंत... तिचा प्रवास अविस्मरणीय राहिला. सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात ती म्हणाली, “हा निर्णय सोपा नव्हता. या निर्णयासोबत अनेक वर्षांच्या आठवणी, भावना, त्याग आणि असे असंख्य क्षण जोडले गेले आहेत, जे आयुष्यभर माझ्यासोबत राहतील.”

कर्णधार ते इतिहास घडवणारी खेळाडू—हरमनने सगळंच केलं आहे. २०१६ मध्ये तिने भारतीय टी२० आंतरराष्ट्रीय संघाची धुरा स्वीकारली. २०२२ मध्ये ती एकदिवसीय संघाची कर्णधार बनली आणि त्यानंतर तिने तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचं नेतृत्व केलं. कालांतराने हरमनप्रीत हे नाव भारतीय महिला क्रिकेटची ओळख बनलं. संघाच्या हडलमधला बुलंद आवाज, कठीण निर्णय घेण्यासाठी नेहमी पुढे असलेली खेळाडू आणि विजयाचे क्षण असोत किंवा निराशेचे—प्रत्येक वेळी संघासाठी खंबीरपणे उभी राहणारी कर्णधार. तिने पाच कसोटी, ५१ एकदिवसीय आणि १५५ टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचं नेतृत्व केलं. टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५० हून अधिक सामन्यांत आपल्या संघाचं नेतृत्व करणारी ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिली खेळाडू ठरली.

तिच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा क्षण २०२५ मध्ये आला, जेव्हा भारताने एकदिवसीय विश्वचषक उंचावत यशाचं सर्वोच्च शिखर गाठलं. हरमनच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने पहिल्यांदाच हा विश्वचषक जिंकला. हा विजय अनेक वर्षांच्या प्रगतीचं फलित होता आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे, जागतिक मंचावर सर्वोत्तम संघांना टक्कर देऊ शकणाऱ्या खेळाडूंची एक नवी पिढी त्यातून घडली. हरमनच्या नेतृत्वाखाली भारताने २०२२ आणि २०२६ मध्ये सलग दोन आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदकंही पटकावली.

याआधी २०१२ महिला टी२० आशिया कपच्या अंतिम सामन्यात हंगामी कर्णधार म्हणून हरमनप्रीतने पहिल्यांदा भारतीय महिला संघाचं नेतृत्व केलं होतं आणि भारताने तो सामना जिंकत विजेतेपदही पटकावलं. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. तिच्या नेतृत्वातील आणखी काही खास क्षण म्हणजे २०१६, २०२२ आणि २०२६ मध्ये भारताने जिंकलेली आशिया कप विजेतेपदं.

तिच्या नावावर आणखी एक मोठा विक्रमही जमा झाला, जेव्हा तिने ऑस्ट्रेलियाच्या मेग लॅनिंगला मागे टाकत महिला टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय मिळवणारी कर्णधार होण्याचा मान मिळवला. जागतिक क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठित मैदानांपैकी एक असलेल्या लॉर्ड्सवर भारताला ऐतिहासिक कसोटी विजय मिळवून देणं हेदेखील तिच्यासाठी कायम खास राहील. २०१७ महिला विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिने केलेली नाबाद १७१ धावांची अविस्मरणीय खेळी आजही विश्वचषकाच्या इतिहासातील भारतीय महिला खेळाडूची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.

संघ आज अत्यंत चांगल्या स्थितीत असल्याचा विश्वास असल्याने हरमनला आता स्वतःच्या खेळावर, प्रगतीवर आणि वैयक्तिक कामगिरीवर पूर्ण लक्ष केंद्रित करायचं आहे. त्याचवेळी आजवरच्या प्रवासाबद्दल तिच्या मनात प्रचंड कृतज्ञताही आहे. ती म्हणाली, “आज मी कर्णधारपद सोडत आहे. मनात अनेक भावना आहेत, पण त्यासोबत एक समाधानही आहे. माझा संघ आज खूप चांगल्या स्थितीत आहे, यावर माझा मनापासून विश्वास आहे. या संघाकडे प्रतिभा आहे, जिद्द आहे, विश्वास आहे आणि उज्ज्वल भविष्यही आहे. हा प्रवास पुढे जाताना पाहण्यासाठी आणि त्याचा एक भाग राहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. मला वाटतं, मी माझं कर्तव्य पार पाडलं आहे. या संघासाठी माझ्याकडे जे काही होतं, ते सर्व मी दिलं. ही जबाबदारी मी अभिमानाने पार पाडली आणि भारतीय महिला क्रिकेटचं नेतृत्व करण्याचा सन्मान मिळाल्याबद्दल मी कायम कृतज्ञ राहीन.”

रक्त, घाम, त्याग आणि अभिमानाने भरलेल्या या प्रवासाबद्दल हरमनप्रीतने शेवटी म्हटलं, “मी माझं सर्वस्व दिलं. आता पुन्हा एकदा केवळ खेळावरच्या प्रेमासाठी मैदानात उतरण्यास मी सज्ज आहे. कर्णधारपदाचा अध्याय संपला. प्रवास मात्र सुरूच राहील.” हरमन, तुझ्या या प्रवासाचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे आणि ब्लू जर्सीमधील तुझ्या पुढच्या अध्यायासाठी तुला मनापासून शुभेच्छा. अशीच चमकत राहा, प्रेरणा देत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे—ज्या खेळावर तुझं प्रेम आहे, तो खेळत राहा.