“MI ने नेहमीच रोमांचक शैलीचं क्रिकेट खेळलं आहे”: ल्यूक विल्यम्स

“MI ने नेहमीच रोमांचक शैलीचं क्रिकेट खेळलं आहे”: ल्यूक विल्यम्स

By Mumbai Indians

दोन वेळा WPL चॅम्पियन ठरलेल्या मुंबई इंडियन्सचा वारसा आधीपासूनच भक्कम आहे आणि आता संघ आणखी एका रोमांचक हंगामासाठी सज्ज होत आहे. मुख्य प्रशिक्षक ल्यूक विल्यम्स नव्या कल्पना, स्वतःची खास ऊर्जा आणि स्पष्ट ध्येय घेऊन MI परिवारात दाखल झाले आहेत — आतापर्यंत मिळवलेल्या यशावर पुढची वाटचाल करत या संघासोबत आणखी काही खास घडवण्याचं ध्येय.

विश्वास, एकजूट आणि विजयी संस्कृतीच्या पायावर उभ्या असलेल्या या फ्रँचायझीत प्रवेश करताना ल्यूक यांनी आगामी हंगामासाठीची आपली दृष्टी आणि योजना उलगडून सांगितली. ही केवळ एक मुलाखत नव्हती, तर क्रिकेटबद्दलच्या सखोल विचारांसोबतच आपुलकीची जोड असलेला खास संवाद होता.

सर्वप्रथम, MI महिला संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी मिळणार असल्याचं समजल्यानंतरची प्रतिक्रिया सांगताना ल्यूक म्हणाले, “इतक्या प्रतिष्ठित फ्रँचायझीकडून मला ही जबाबदारी देण्यात येणार असल्याचं समजलं, तेव्हा मी खूपच आनंदी झालो. या संघाने याआधीच दोन WPL विजेतेपदं पटकावली आहेत. आता कामाला सुरुवात करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे... खेळाडूंना, सपोर्ट स्टाफला भेटून त्यांच्यासोबत काम सुरू करण्याची उत्सुकता आहे.”

योग्य वेळी सर्वोत्तम कामगिरी करणं किती महत्त्वाचं आहे, यावर भर देताना त्यांनी मुंबई इंडियन्ससाठीची आपली दृष्टीही स्पष्ट केली. ते म्हणाले, “प्रत्येक हंगाम वेगळा असतो. संघात एक मजबूत सांघिक भावना निर्माण करणं सर्वात महत्त्वाचं असतं. मैदानावर आणि मैदानाबाहेरही खेळाडूंमध्ये एकजूट निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न असेल. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील प्रत्येकाला आपापल्या भूमिकेबद्दल स्पष्टता असणं गरजेचं आहे. स्पर्धा पुढे सरकत असताना आत्मविश्वास वाढवत नेणं आणि योग्य वेळी सर्वोत्तम फॉर्म गाठणं महत्त्वाचं असतं. अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी आवश्यक सामने जिंकायचे आणि अखेर जेव्हा सर्वाधिक गरज असेल, तेव्हा आपलं सर्वोत्तम क्रिकेट खेळायचं.”

या नव्या भूमिकेतील सर्वात उत्सुकता वाढवणाऱ्या गोष्टींपैकी एक म्हणजे कर्णधार हरमनप्रीत कौरसोबत काम करण्याची संधी. याबद्दल ल्यूक म्हणाले, “ही जबाबदारी स्वीकारताना मला सर्वाधिक उत्साहित करणाऱ्या गोष्टींपैकी ही एक आहे. जगभरातील अनेक स्पर्धांमध्ये मी हरमनप्रीतच्या विरोधी संघात राहिलो आहे. ती किती दमदार खेळाडू आणि किती उत्तम नेतृत्व करणारी कर्णधार आहे, हे मी जवळून पाहिलं आहे. त्यामुळे तिच्यासोबत काम करण्यासाठी आणि या हंगामात संघाकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.”

प्रतिभावान खेळाडू हेरण्याची आणि युवा खेळाडूंना घडवण्याची उत्तम नजर असलेल्या ल्यूक यांनी त्यांच्या प्रशिक्षण पद्धतीत खेळाडूंच्या विकासाला कसं महत्त्व दिलं जाईल, याबद्दलही सांगितलं. “हरमनप्रीत कौरसह आमच्या संघात अनुभवी आणि महत्त्वाच्या खेळाडूंचा मजबूत गट आहे. त्याचबरोबर काही उत्साहवर्धक युवा प्रतिभाही आपल्याकडे आहेत. त्यामुळे या सगळ्यांच्या एकत्रित ताकदीतून एक मजबूत संघ तयार होतो. हा संघ नक्कीच रोमांचक शैलीचं क्रिकेट खेळेल, असा मला विश्वास आहे. या संघाने याआधी यशाची चव चाखली आहे आणि विशेषतः मागील हंगामानंतर यंदा दमदार पुनरागमन करून चांगली कामगिरी करण्याची भूक या संघात नक्कीच असेल. यंदा या स्पर्धेचा भाग होण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.”

आधुनिक टी२० क्रिकेटमध्ये आकडेवारी आणि मॅच-अप्सचं महत्त्व सातत्याने वाढत असलं, तरी खेळाडूंची स्वतःची सहजप्रवृत्तीही तितकीच महत्त्वाची असते. या दोन्हींमध्ये समतोल कसा साधणार, असं विचारलं असता ल्यूक म्हणाले, “प्रत्येक खेळाडूसाठी याचं उत्तर वेगळं असतं. मला आकडेवारी, डेटा आणि अ‍ॅनालिटिक्सचा वापर करायला आवडतो. त्यामुळे ही सर्व माहिती समजून घेऊन ती कुठे आणि कशी सर्वाधिक उपयुक्त ठरेल, हे ठरवणं ही मोठी जबाबदारी असते. शेवटी प्रत्येक खेळाडूला नेमकं कशाची गरज आहे, हे समजून त्यावर पुढे काम करणं महत्त्वाचं असतं.”

मुंबई इंडियन्सने नेहमीच प्रस्थापित खेळाडूंसोबत युवा प्रतिभेलाही संधी दिली आहे. हा समतोल किती महत्त्वाचा ठरणार, याबद्दल प्रशिक्षक म्हणाले, “MI ने नेहमीच रोमांचक शैलीचं क्रिकेट खेळलं आहे. मजबूत चाहतावर्गाची साथ असलेला हा संघ प्रतिस्पर्ध्यांसाठी नेहमीच मोठं आव्हान ठरतो. आमच्याकडे असे खेळाडू आहेत, जे अगदी कमी वेळात सामना प्रतिस्पर्ध्यांच्या हातातून काढून घेऊ शकतात. इतर संघांवर सातत्याने दबाव टाकणं आणि कोणत्याही परिस्थितीत हार न मानणं — अशाच प्रकारचं क्रिकेट आम्हाला खेळायचं आहे.”

अखेर आपल्या पलटनसाठी खास संदेश देत ल्यूक म्हणाले, “पलटन, तुम्हाला सामन्यांमध्ये भेटण्यासाठी मी आतुर आहे. तुम्ही खऱ्या अर्थाने या फ्रँचायझीचं हृदय आणि आत्मा आहात. आगामी हंगामात आणि भविष्यातही संघाच्या यशामध्ये तुमच्या पाठिंब्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल.”