News

भारत विरूद्ध इंग्लंड, पाचवी कसोटीः ३ खेळाडूंच्या युद्धाची उत्सुकता

By Mumbai Indians

भारतीय क्रिकेट संघ येत्या शुक्रवार १ जुलै रोजी बर्मिंगहम येथील एजबस्टन क्रिकेट ग्राऊंडवर इंग्लंडविरूद्ध पाचवा आणि अंतिम कसोटी सामना खेळणार आहे.

ही वेळापत्रक बदललेली मालिका भारताच्या मागील वर्षीच्या इंग्लंड दौऱ्याचा भाग आहे. ती भारतीय संघात कोविड १९ च्या रूग्णांची संख्या वाढल्यामुळे रद्द करण्यात आली होती. पाचव्या सामन्यात पाहुणा संघ २-१ ने आघाडीवर होता. हा सामना मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानावर होणार होता.

भारत आता २००७ सालापासून इंग्लंडविरूद्ध आपल्या पहिल्या विजयाचे ध्येय समोर ठेवून खेळणार आहे.

कर्णधार रोहित शर्मा कोविड-१९ मधून बरा न झाल्यामुळे त्याला पाचव्या कसोटी सामन्यातून बाजूला करण्यात आले आहे. त्यामुळे भारताला एक मोठा धक्का बसला आहे. रोहित शनिवारी भारताच्या लँकेशायरविरूद्धच्या चाचणी सामन्यादरम्यान कोविड पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले होते. रोहितच्या अनुपस्थितीत उपकर्णधार जसप्रीत बुमरा भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.

त्याचवेळी अलीकडेच झालेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) विजेत्या न्यूझीलंडला पूर्णपणे भुईसपाट केल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढला आहे.

इंग्लंडचा कसोटी क्रिकेटमध्ये भारताविरूद्ध चांगला रेकॉर्ड आहे. त्यांनी आतापर्यंत खेळलेल्या १३० सामन्यांपैकी ४९ सामने जिंकले आहेत. भारताने ३१ सामने जिंकले असून ५० सामने बरोबरीत सुटले आहेत.

बहुप्रतीक्षित पाचव्या कसोटी सामन्यापूर्वी काही खेळाडूंमधले युद्ध सामन्याचा निकाल ठरवू शकतेः

विराट कोहली विरूद्ध जेम्स अँडरसन

भारतीय स्टार फलंदाज विराट कोहली इंग्लंडच्या आघाडीचा जलदगती गोलंदाज असलेल्या जेम्स अँडरसनचा सामना करणार आहे. त्यांच्यामधील जुन्या दुश्मनीमुळे एजबॅस्टन कसोटीमध्ये या खेळाडूंमधील युद्ध पाहण्यासारखे असेल. अँडरसनने कोहलीला भारताच्या २०१४ मधील इंग्लंड टूरदरम्यान त्रास दिला होता. त्याने फक्त १४ धावांमध्ये कोहलीला चार वेळा बाद केले होते. परंतु कोहलीने चार वर्षांनी जोरदार पुनरागमन करून एकदाही बाद न होता अंडरसनच्या गोलंदाजीवर ११४ धावा काढल्या होत्या. एकंदरीत अँडरसनने कोहलीला कसोटी क्रिकेटमध्ये सात वेळा बाद केले आहे आणि भारताच्या या माजी कर्णधाराने ४२.४० च्या सरासरीने २९७ धावा केल्या आहेत. कोहलीने वॉर्म अप सामन्यात लँकेशायरविरूद्ध ६७ धावांची उत्तम खेळी केली असून पाचव्या कसोटीमध्ये चांगला स्कोअर उभा करेल अशी आशा आहे.

जसप्रीत बुमरा विरूद्ध जो रूट

भारताचा पर्यायी कर्णधार असलेल्या जसप्रीत बुमराचा कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडच्या जो रूटविरूद्ध उत्तम रेकॉर्ड आहे. बुमराने खेळाच्या या सर्वांत दीर्घ स्वरूपात रूटची महत्त्वाची विकेट सहा वेळा घेतली आहे. या इंग्लंडच्या माजी कर्णधाराने बुमराविरूद्ध ४१८ चेंडूंवर १९४ धावा केल्या आहेत. या वर्षी रूट उत्तम फॉर्ममध्ये आहे. त्याने आठ सामन्यांमध्ये ५३.८५ च्या सरासरीने ७५४ धावा केल्या असून त्यात चार शतकी आणि एक अर्धशतकी खेळी आहे. त्याचवेळी बुमरा हा आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२१-२३ कालावधीत आघाडीचा विकेट घेणारा गोलंदाज असून त्याने २.५४ च्या सरासरीने ४० विकेट्स घेतल्या आहेत. भारताला या सामन्यात वर्चस्व हवे असेल तर त्यांना रूटला लगेच बाद करावे लागेल.

चेतेश्वर पुजारा विरूद्ध जॅक लीच

नियमित सलामी फलंदाज रोहित शर्माच्या अनुपस्थितीत चेतेश्वर पुजारा टीम इंडियासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. पुजाराने चालू मालिकेत दोन अर्धशतकांसह ३६.९७ च्या सरासरीने इंग्लंडविरूद्ध २२७ धावा काढल्या आहेत. गंमतीचा भाग म्हणजे इंग्लंडचा डावखुरा स्पिनर जॅक लीचने यापूर्वी पुजाराला त्रास दिलेला आहे. त्याने १५.२५ च्या सरासरीने फक्त ६१ धावा देऊन चार वेळा पुजाराची विकेट घेतली आहे. न्यूझीलंडविरूद्ध दोन कसोटी सामन्यांत १३ विकेट्स घेतल्यानंतर लीच हाच फॉर्म कायम राखण्यास उत्सुक असेल. पुजारा आणि लीच यांच्यामधील लढाई बर्मिंगहममधील पाचव्या कसोटीचा निकाल निश्चित करेल.

इंग्लंड आणि भारत या दोन्ही संघांदरम्यान एजबस्टन येथे खूप अटीतटीचा सामना होईल अशी अपेक्षा आहे. हा सामना दुपारी ३.०० वाजता (आयएसटी) सुरू होईल.