News

भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिकाः पाचवा टी२०आय पूर्वावलोकनः आयोजकांना मालिका विजयाची आस

By Mumbai Indians

राजकोटमध्ये तडाखेबाज विजय मिळवून मालिकेत बरोबरी केल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ रविवार दिनांक १९ जून रोजी बंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आयोजित पाचव्या आणि शेवटच्या टी२०आय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सामना करणार आहे.

नवी दिल्ली आणि कटक येथील सामन्यात हार पत्करावी लागल्यानंतर ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ अनुक्रमे विशाखापट्टणम आणि राजकोट येथील सामन्यांमध्ये ४८ आणि ८२ धावांनी विजयी झाला.

यजमान संघ आता आत्मविश्वासाने सळसळता असून त्यांनी मागच्या दोन सामन्यांमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. त्यामुळे शेवटच्या टी२०आय सामन्यासाठी त्यांची पूर्ण तयारी आहे.

परंतु टी२०आय स्वरूपात मेन इन ब्लूचे रेकॉर्ड खूप वाईट होते. त्यांनी दोन विजय आणि पाच पराभव पत्करले आहेत.

भारताने बंगळुरूमध्ये २०१९ मध्ये खेळलेल्या मागील टी२०आय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताला नऊ विकेट्सनी हरवले होते.

भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या पाचव्या आणि शेवटच्या टी२०आय सामन्यातील काही महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेतः

दिनेश कार्तिक आणि हार्दिक पंड्याचा उत्तम फॉर्म

भारताच्या मधल्या फळीतील फलंदाज दिनेश कार्तिक आणि हार्दिक पंड्या यांचा फॉर्म मालिकेत यजमानांसाठी आतापर्यंत खूप सकारात्मक ठरला आहे. कार्तिकने राजकोट येथे सामनावीर हा पुरस्कार मिळवला असून त्याने या सामन्यात फक्त २७ चेंडूंमध्ये ५५ धावा फटकावल्या आहेत. त्यामुळे भारताला विजय मिळवता आला. त्याचवेळी मुंबई इंडियन्सचा माजी अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या हा टी२०आय मालिकेतील एक उत्तम फलंदाजांपैकी एक ठरला आहे. या धडाकेबाज अष्टपैलू खेळाडूने ५८.५० च्या सरासरीने चार सामन्यांत ११७ धावा कुटल्या. यजमान संघाला बंगळुरूमध्ये मालिका जिंकायची असेल तर कार्तिक आणि हार्दिक यांना पुन्हा एकदा  आपल्या बॅटची जादू दाखवावी लागेल.

मागच्या दोन टी२०आयमध्ये भारतीय गोलंदाजांचा हल्ला तीव्र झाला आहे

पाच सामन्यांच्या मालिकेत ०-२ ने पिछाडीवर गेल्यानंतर या तरूण भारतीय खेळाडूंनी पुन्हा एकदा उत्तम खेळ करायला सुरूवात केली. त्यांच्या गोलंदाजीने दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना घाम फोडला. भारताने विशाखापट्टण आणि राजकोट येथे अनुक्रमे १३१ आणि ८७ धावाच करू दिल्या. हर्षल पटेल हा भारतासाठी बॉम्बगोळा ठरला आहे. त्याने चार सामन्यांमध्ये सात विकेट्स घेतल्या तर भुवनेश्वर कुमार आणि युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी सहा विकेट्स घेतल्या. भारतीय गोलंदाज चिन्नास्वामीमध्ये प्रोटीआजविरूद्ध आणखी एक सामना जिंकवू शकणारे प्रदर्शन करतील अशी आशा आहे.

दुखापतींनी ग्रस्त प्रोटीआज शेवटच्या टी२०आयमध्ये सहभागी

मालिकेतील शेवटच्या टी२०आय सामन्यात जात असताना दक्षिण आफ्रिकेचा संघ दुखापतग्रस्त झाला आहे. कर्णधार टेम्बा बावुमा राजकोटमध्ये डाव्या कोपराला दुखापत झाल्यामुळे बाहेर पडला. प्रोटीआजचे स्टार गोलंदाज कागिसो रबाडा आणि वायने पार्नेल हे देखील दुखापतींनी ग्रस्त आहेत. याशिवाय त्यांचा सलामीचा फलंदाज क्विंटन डे कॉक हा देखील या अंतिम सामन्यात जाताना काळजीचा विषय ठरणार आहे.

सध्याचा फॉर्म विचारात घेता भारत बंगळुरूमध्ये विजय निश्चित करणाऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला शिंगावर घेण्यासाठी सज्ज आहे.