INDvSL पहिला एकदिवसीय सामनाः कोहली, रोहितचा चमकदार खेळ, भारत विजयी

INDvSL पहिला एकदिवसीय सामनाः कोहली, रोहितचा चमकदार खेळ, भारत विजयी

By Mumbai Indians

या वर्षीच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय विश्वचषक स्पर्धेसाठी टीम इंडियाने कंबर कसून तयारी सुरू केली आहे. विराट कोहलीचे दिमाखदार शतक, रो-हिटमॅन शर्माचे दणदणीत पुनरागमन आणि उमरान मलिकची तूफानी गोलंदाजी यांच्यामुळे भारताने श्रीलंकेवर ६७ धावांनी सणसणीत विजय मिळवून तीन सामन्यांच्या ओडीआय मालिकेत १-० ने आघाडी घेतली.

श्रीलंकन संघासाठी त्यांची बाजू सावरून धरणारा एकच खेळाडू होता. तो म्हणजे त्यांचा कर्णधार दासून शनाका. त्याने लढाऊ बाणा दाखवून शेवटपर्यंत चिवट झुंज दिली आणि अगदी ५० व्या ओव्हरजवळ येऊन आपले शतक पूर्ण केले.

हिटमॅन, गिल यांचा धुमाकूळ

श्रीलंकेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी करायला आमंत्रित केले. पिच सपाट होते आणि मैदान तुलनेने छोटे असल्यामुळे भारतीय सलामी फलंदाज रोहित आणि गिल यांना लवकर सूर गवसला आणि त्यांनी मिळालेल्या परिस्थितीचे सोने केले.

शुभमन गिलने आपल्या ऑफसाइड फलंदाजीची नवनवीन अस्त्रे बाहेर काढली तर हिटमॅनने गोलंदाजांच्या काळजात धडकी भरवणारे फटके मारले. मधुशंकाला आता रात्री स्वप्नातसुद्धा गिलचे कट्स दिसणार आहेत. रजिताला जळीस्थळीकाष्ठीपाषाणी रोहितच दिसेल. या भागीदारीने अत्यंत वेगाने धावसंख्या वाढवली. भारताने १५ व्या ओव्हरमध्येच १०० धावा पूर्ण केल्या. रोहितने आणखी एक दोन क्लासी फटके मारल्यानंतर तो ८३ वर बाद झाला. च्च च्च! आम्ही सगळे त्याच्या शतकाची प्रतीक्षा करत होतो, नाही का?

कोहलीचे वर्चस्व, पुन्हा पुन्हा!

क्रिकेटच्या अनभिषिक्त सम्राटाकडून आणखी एक ‘विराट’ कामगिरी. कोहली तुझे अभिनंदन! त्याने श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांच्यासोबत महत्त्वाची भागीदारी करून भारतीय टीमला हिटमॅनने मिळवून दिलेला वेग कायम ठेवायला मदत केली. तिसाव्या ओव्हरमध्ये स्पिनर्सनी वर्चस्व गाजवले. परंतु आपल्या सम्राटाने थोडा संयम दाखवून आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने दुसऱ्या पॉवर प्लेच्या शेवटी आपल्या बॅटला मोकळे सोडले. डेथ ओव्हर्समध्ये अनेक फलंदाजांना खेळणे कठीण वाटते. परंतु कोहलीने आपल्या शैलीला साजेसा आक्रमक खेळ केला आणि धावांचा डोंगर रचण्याचे काम सुरू ठेवले. गोहत्तीमध्ये कोहलीने लाँग ऑफवर एक धाव काढली, त्यानंतर एकामागून एक ओडीआय शतके झळकवली. जबरदस्त इनिंग होती ती, काय खेळलाय तो! त्याने शेवटच्या चार ओव्हर्समध्येही गोलंदाजांना जराही सुट्टी दिली नाही.

भारताने ३७३/७ ची धावसंख्या उभारली.

आणखी एक जोरदार धावसंख्या.

जलदगती गोलंदाजांनी श्रीलंकन खेळाडूंना लवकर बाद केले.

खेळाडूंची घोषणा झाल्यानंतर प्रत्येक भारतीय चाहत्याचे तीन खेळाडूंवर लक्ष होते. मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक. भरपूर धावसंख्या उभारलेल्या मैदानावर बचाव करण्यासाठी खूप पटापट विकेट्स गरज असताना त्यांनी आपल्यावर सोपवलेली जबाबदारी नीट पार पाडली. शामीचा स्विंग आणि सिराजच्या अप्रतिम खेळामुळे धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या श्रीलंकेच्या संघाची सुरूवात अगदीच निसरडी झाली. सिराजने आपल्याला पहिली विकेट मिळवून दिली. त्याने अविष्का फर्नांडो आणि कुसल मेंडीस यांच्या विकेट्स एकामागून एक ओव्हर्समध्ये घेतल्या. 

या सामन्यात दंवामुळे अडथळे निर्माण होतील असे वाटले होते. परंतु आपल्या गोलंदाजांनीच श्रीलंकन फलंदाजांना सुरूवातीला चांगलेच दमवले.

मलिकचा मॅजिक शो

उमरान मलिकला पहिल्या पॉवर प्लेनंतर गोलंदाजीसाठी उतरवण्यात आले. त्याने आपल्या वेगाने सर्वांवर प्रभाव टाकला. चरिथ असालांकाला विकेट कीपरकडे पाठवण्यासाठी त्याला फार वेळ लागला नाही. जम्मू एक्स्प्रेसने रात्रीच्या उजेडात गोहत्तीमध्ये वेग काय असतो हे दाखवून दिले. मलिकने मलिकने आपल्या दुसऱ्या फेरीत सेट झालेल्या पथुम निसांकाला बाद केले. त्यानंतर त्याने दुनिथ वेलालागेला शून्यावर बाद केले.   

वादळी हल्ला: उमरानने आज ताशी १५६ किमी वेगाने गोलंदाजी केली. भारतीय गोलंदाजाचा आजपर्यंतचा, पहिलाच सर्वाधिक वेगवान बॉल!

तूफान यालाच म्हणतात!

दरम्यान दासून शनाकाने भारताविरूद्ध उत्तम फलंदाजी करत आपला वेग कायम ठेवला. त्याने ८८ चेंडूंवर नाबाद १०८ धावा केल्या. त्यादरम्यान त्याने १२ चौकार आणि तीन षटकारही ठोकले. आपल्या देखण्या फलंदाजीने त्याने जलदगती गोलंदाज आणि स्पिनर्स या दोघांनाही सारखेच क्रूरपणे टोलवले. इतर फलंदाजांनी त्याला मदत केली असती तर हा सामना आपल्या हातातून निसटलाच असता. त्याने आपल्या प्रतिमेला शोभणारा खेळ केला!

पण तरीही त्याचा हा अप्रतिम खेळ पुरेसा ठरला नाही कारण या वेळी जलदगती गोलंदाजांनी भारताला मालिकेच्या पहिल्याच सामन्यात विजय मिळवून दिला.

थोडक्यात धावसंख्या: भारत ५० ओव्हर्समध्ये ३७३/७ (विराट कोहली ११३, कासून रजिता ३/८८), श्रीलंका ५० ओव्हर्समध्ये ३०६/८ (दासून शनाका१०८*, उमरान मलिक ३/५७) भारताचा श्रीलंकेवर ६७ धावांनी विजय.