“आम्ही टीम म्हणून शेवटपर्यंत लढा देऊ”: महेला जयवर्धने

“आम्ही टीम म्हणून शेवटपर्यंत लढा देऊ”: महेला जयवर्धने

By Mumbai Indians

पलटनसाठी हा आणखी एक कठीण दिवस होता. पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्सविरूद्ध झालेल्या सामन्यात आम्हाला पराभव पत्करावा लागला. त्यांनी आम्हाला मागे टाकून आठ विकेट्सनी विजय मिळवला. आमचा वेग सुरूवातीच्या टप्प्यातच ढासळला आणि नंतर आम्ही परतू शकलो नाही. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलताना मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी त्रुटी मान्य केल्या आणि चुकलेल्या संधी काय होत्या ते सांगितले. परंतु सीझनच्या शेवटपर्यंत मुंबई इंडियन्स लढत राहील असेही आश्वासन दिले. 💙

सीएसकेविरूद्ध खेळताना मेन इन ब्लूचे नक्की काय चुकले हे सांगताना महेला म्हणाले- “पहिल्या दहा ओव्हर्समध्ये आमची स्थिती चांगली होती. विकेट संथ होती आणि चेंडू थोडा नरम झाल्याने धावा करणे कठीण होऊ लागले. आम्ही पटापट विकेट्स गमवायला सुरूवात केल्यानंतर आमचा खेळ संथ झाला. आम्ही पुरेशी धावसंख्या उभारू शकलो नाही. दुसरीकडे सुरूवातीच्या टप्प्यात विकेट्स घ्यायला हव्या होत्या. तसे केले असते तर कदाचित पराभव झाला नसता.”

आजच्या सामन्यात तिलक वर्मा चांगल्या धावा करू शकला नाही याबाबत बोलताना ते म्हणाले की, “त्याने अहमदाबादमध्ये चांगली कामगिरी केली. त्याने शतकही केले. आता सातत्यपूर्ण राहण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. तो जितके जास्त खेळेल तितके तो त्याच्या चुकांमधून शिकत जाईल.”

आपला महत्त्वाचा गोलंदाज असलेल्या जसप्रीत बुमराहला पाठिंबा देताना ते म्हणाले की, “संपूर्ण गोलंदाजी टीमकडून एकत्रित प्रयत्न होणे खूप महत्त्वाचे आहे. कधीकधी खेळाडूंचा खेळ संथ गतीने सुरू होतो. क्लास तर परमनंट राहतोच. प्रत्येक क्रिकेटपटू पूर्ण प्रयत्न करतो. बूम सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे हेही तेवढेच खरे आहे.”

“आता आणखी पाच सामने शिल्लक आहेत. आम्हाला सकारात्मकतेने स्पर्धेला सामोरे जायचे आहे. आम्ही तसे तर अद्याप स्पर्धेतून बाहेर नाही आहोत. आम्ही शेवटपर्यंत टम म्हणून खेळत राहू.” ✊