News

INDvsNZ पहिली ओडीआयः गिलचे द्विशतक, पण न्यूझीलंडचा धक्का

By Mumbai Indians

पहिल्या इनिंगमध्ये शुभमन गिलने आपल्या खेळाने डोळ्यांचे पारणे फेडल्यानंतर सामना हातातून निसटू शकेल असे होऊ शकते का? हैदराबादमध्ये झालेल्या भारत विरूद्ध न्यूझीलंडच्या सामन्यात क्रिकेट चाहत्याला जे काही हवे असते ते सर्व होते. 

श्रीलंकेला व्हाइटवॉश दिल्यानंतर आत्मविश्वासाने सज्ज भारतीय क्रिकेट टीमने अक्षरशः नाट्यमय पद्धतीने १२ धावांनी विजय मिळवला. 

गिलचे देखणे द्विशतक, काही क्लासी शॉट्सनी सजलेले होते. त्यामुळे भारतीय संघाची धावसंख्या ३४९/८ अशी जोरदार झाली होती. प्रत्युत्तरासाठी उतरलेल्या पाहुण्या संघाचा विजय अगदी थोडक्यात चुकला. मायकेल ब्रेसवेल आणि मिशेल संटनेर यांनी स्वप्नातसुद्धा वाटणार नाही असा विजय मिळवून द्यायला मदत केली. 

निजामांच्या शहरात विक्रम मोडीत काढणारा दिवस काहीसा असा गेला! 

नुसता राडा! 

संपूर्ण जगाला सांगा, ओळख करून द्या भारतीय संघाच्या सर्वांत तरूण द्विशतकी फलंदाजाची. तो आहे शुभमन गिल! आपल्या या २३ वर्षीय योद्ध्याने मैदानात अक्षऱशः खळ्ळखट्याक केला. आक्रमकता, वेग आणि परिपक्वता या सगळ्या गोष्टींचे दर्शन त्याने १४९ चेंडूंमध्ये २०८ धावा कुटताना घडवले. गिलने अत्यंत स्थिर सुरूवात करून आपल्या विक्रमाच्या दिशेने प्रवास सुरू केला आणि तो एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १०० धावा पूर्ण करणारा सर्वांत वेगवान भारतीय ठरला. 

गिलने २०० धावा तर केल्याच पण त्याने सलग तीन वेळा षटकार मारून हॅटट्रिकसुद्धा केली. त्याने आज काहीही मागितले असते तरी त्याला ते मिळाले असते! त्याने आपल्या बॅटला सैल सोडून ४९ व्या ओव्हरमध्ये लॉकी फर्ग्युसनच्या तीन सलग चेंडूंवर तीन षटकार ठोकले आणि प्रेक्षकांनी तोंडाचा आ वासला! 

हिटमॅन आणि स्कायकडून जोरदार फलंदाजी 

कर्णधार रो पुन्हा एकदा हल्ला करण्यासाठीच मैदानात उतरला होता. त्याने आपल्या टीमसाठी एक चांगला पाया तयार करून देताना ३८ चेंडूंमध्ये ३४ धावा केल्या आणि गिलला स्थिरावायला मदतसुद्धा केली. 

सूर्यादादासुद्धा नावासारखाच तळपण्यासाठी मैदानात उतरला होता. तो फलंदाजीला उतरला तेव्हा त्याचा मूड फटकेबाजी करण्याचाच होता. अत्यंत दुर्दैवी पद्धतीने बाद होण्यापूर्वी त्याने २६ चेंडूंमध्ये ३१ धावा केल्या. 

लाथम बाळा... मस्ती नाही करायची…! 

गिल नावाचे चक्रीवादळ मैदानात धुमशान घालत असतानाच हार्दिक पंड्याला डॅरिल मिशेलच्या ४० व्या ओव्हरमध्ये बाद झाल्याचे घोषित केले गेले (बोल्ड). त्या काळ्या टोपीवाल्या विकेटकीपरने यष्टी आपल्या ग्लोव्ह्जने उडवल्याचे दिसत होते. त्यामुळे पाहुणा संघ हार्दिक पंड्याची महत्त्वाची विकेट खिशात घालतो की काय असेही वाटत होते. 

त्यानंतरही टॉम लॅथनने नंतरच्या ओव्हरमध्ये थोडी मस्ती करायचा प्रयत्न केला. त्याने पुन्हा एकदा यष्टी हाताने उडवल्या. अंपायरने थर्ड अंपायरकडे रिव्ह्यू केला. या रिव्ह्यूमुळे प्रत्येक भारतीयाच्या मनात जेठालाल जागा झाला. सगळेचजण लॅथम बाळा... मस्ती नाही करायची…’ असंच म्हणत होते. 

थांबा! खेल अभी खत्म नहीं हुआ  

क्रिकेटच्या खेळात हवा कधीही कुणाच्याही बाजूने बदलू शकते आणि हैदराबादमध्ये नेमके हेच पाहायला मिळाले. किवीज एका टप्प्यावर 131/6 वर होते आणि भारतीय संघाच्या हातात सामना आला होता. पण... पण... ब्रेसवेल आणि मिशेल संतनर यांनी धडाधड धावा करायला सुरूवात केली आणि भारतीयांच्या पायाखालची वाळू सरकली. ब्रेसवेलच्या अंगात जणून संचार झाला होता. त्याने गोलंदाजांना धूळ चाखवायला सुरूवात केली आणि दुसरे ओडीआय शतक पूर्ण केले. त्यामुळे न्यूझीलंड जवळपास विजयी होणारच असे चित्र दिसू लागले होते. संतनेर मात्र अचूक खेळ करत होता. त्याने प्रचंड तणावाखाली असतानाही अर्धशतक पूर्ण केले. 

शेवटी आपल्या गोलंदाजांनी अत्यंत संयमाने गोलंदाजी करून सामना खिशात टाकला. 

ब्रेसवेलच्या आतषबाजीने सर्वांचे डोळे दिपलेले असतानाही पहिल्या इनिंगमध्ये त्यांच्या आयुष्यात येऊन गेलेल्या शुभमन गिल नावाच्या वादळानंतर न्यूझीलंडसाठी जिंकणे खूपच कठीण होणार होते. 

मोहम्मद सिराजचाही हा फार खास दिवस होता. त्याला आपल्या घरच्या मैदानावर प्रेक्षकांवर प्रभाव टाकायची संधी मिळाली. त्याने स्टाइलमध्ये हे केले. चार विकेट्स घेतल्या. त्यातल्या दोन विकेट्स तर अगदी गरजेच्या वेळी म्हणजे ४६ व्या ओव्हरमध्ये घेतल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये २० धावांची गरज असताना शार्दुल ठाकूरने अगदी नेम धरून गोलंदाजी केली आणि ब्रेसवेलला दुसऱ्या चेंडूवर बाद केले. भारतीयांनी आतापर्यंत रोखून धरलेला श्वास सोडला. रोहित शर्माच्या चेहऱ्यावर तर सुटल्याचे भाव अगदी स्पष्ट दिसत होते. 

थोडक्यात धावसंख्या: भारत ३४९/८ ५० ओव्हर्समध्ये (शुभमन गिल २०८, डेरिल मिशेल २/३०) कडून न्यूझीलंडचा १२ धावांनी पराभव ३३७/१० ४९.२ ओव्हर्समध्ये (मिशेल ब्रेसवेल १४०, मोहम्मद सिराज ४/४६)