INDvWI दुसरा एकदिवसीय सामना: गिलचं द्विशतक, रोहितच्या शतकाच्या जोरावर भारताचा दणदणीत विजय

INDvWI दुसरा एकदिवसीय सामना: गिलचं द्विशतक, रोहितच्या शतकाच्या जोरावर भारताचा दणदणीत विजय

By Mumbai Indians

एकाच देशात २०० षटकारांचा टप्पा गाठणाऱ्या पहिल्या फलंदाजाचा मान मिळवत आपलं ३५वं एकदिवसीय शतक झळकावणाऱ्या एकमेव हिटमॅन शर्मासाठी आदर, कौतुक आणि प्रेरणा! प्लेयर ऑफ द मॅच शुभमन गिलचं द्विशतक तर अक्षरशः अविश्वसनीय होतं. हुश्श! संपूर्ण सामन्यात तब्बल ८११ धावा, एकूण पाच शतकं (वेस्ट इंडिजकडून तीन आणि भारताकडून दोन) - एकाच एकदिवसीय सामन्यातील सर्वाधिक शतकं. गुवाहाटीच्या बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर भारताने आठ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला.

नमनचा भन्नाट झेल, भारताला मिळालं पहिलं यश

काय तो झेल! पॉइंटवर उभ्या असलेल्या आपल्या स्पायडरमॅन नमन धीरने जबरदस्त चपळाई दाखवली... पुढे झेपावत चेंडूच्या खाली अचूकपणे बोटं आणत त्याने सलामीवीर केसी कार्टीला माघारी धाडलं. ४.६ षटकांत वेस्ट इंडिजची अवस्था १ बाद ३७ अशी झाली.

कॅम्पबेलचं वेस्ट इंडिजसाठी दुसरं एकदिवसीय शतक

जॉन कॅम्पबेलने अगदी सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत आत्मविश्वासाने भारतीय गोलंदाजांचा सामना केला. त्याने अवघ्या ६५ चेंडूंमध्ये आपलं शतक पूर्ण केलं. अखेर नमन धीरने त्याचा सहज झेल घेत ६८ चेंडूंतील १०१ धावांच्या खेळीचा शेवट केला. या खेळीत नऊ चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता. त्याने शाई होपसोबत ११० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारीही रचली.

मैदानात डबल Tटॉन-डरस्टॉर्म, होप-जंगूचा ब्लॉकबस्टर शो

एकाच डावात दोन शतकांचा थरार! कर्णधार शाई होपने पुढाकार घेत अमीर जंगूसोबत मिळून सामन्याला जणू स्वतःचा रन-फेस्ट बनवलं. होपच्या ९४ चेंडूंतील १०४ आणि जंगूच्या ७७ चेंडूंतील ११४ धावांच्या सनसनाटी शतकांमुळे भारत बॅकफूटवर गेला. संयमी फलंदाजीला चौकार-षटकारांची जोड देत दोघांनी शानदार खेळ केला. धावफलक सातत्याने पुढे सरकत असताना दोघांनी मिळून ब्लॉकबस्टर शो सादर केला. त्यांच्यातील १८२ धावांच्या भागीदारीमुळे पाहुण्या संघाने सामन्यावर मजबूत पकड मिळवली.

अखेर वेस्ट इंडिजने ५० षटकांत ७ बाद ४०५ धावांचा डोंगर उभारला. कुलदीप यादवने ६५ धावांत दोन, रवींद्र जडेजाने ७५ धावांत दोन, तर गुरनूर ब्रारने ९६ धावांत दोन विकेट्स घेतल्या.

रो-हिटमॅन शर्माचा मास्टरक्लास, गिलच्या ब्लॉकबस्टर खेळीने भारताची धडाकेबाज सुरुवात

मैदानात अनुभव आणि उत्कृष्टतेचा मिलाफ झाला आणि क्रिकेटविश्वाने पुन्हा पुन्हा पाहावा असा शानदार फलंदाजीचा शो अनुभवला. रोहित शर्मा आणि शुभमन गिलने अगदी पहिल्या चेंडूपासून विंडीजच्या गोलंदाजांवर जबरदस्त दबाव टाकत सामन्याचं चित्रच पालटलं. हिटमॅनने ७५ चेंडूंमध्ये १० चौकार आणि सहा षटकारांसह फटकावलेल्या १०१ धावांनी चाहत्यांना जल्लोषाची पर्वणी दिली. टायमिंग, नजाकत आणि परफेक्शन — त्याच्या या शानदार शतकाचं वर्णन करण्यासाठी हेच शब्द पुरेसे आहेत. त्याने गिलसोबत सलामीच्या विकेटसाठी तब्बल २५५ धावांची भागीदारीही रचली. वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये कोणत्याही विकेटसाठीची ही सर्वोच्च भागीदारी ठरली. रोहितने दिमाखात आपलं ३५वं एकदिवसीय शतक पूर्ण करताना एकदिवसीय क्रिकेटमधील १२,००० धावांचा टप्पाही पार केला.

कप्तान गिलला सलाम! अवघ्या १३३ चेंडूंमध्ये २६ चौकार आणि आठ षटकारांसह नाबाद २२३ धावांचं थक्क करणारं द्विशतक... ज्यात क्लास, नियंत्रण आणि आक्रमकतेचा परिपूर्ण मिलाफ होता. स्टायलिश ड्राइव्ह्सपासून दमदार षटकारांपर्यंत गिलने आपली लय अचूक पकडली आणि धावफलक वेगाने पुढे नेत शानदार सुरुवातीचं रूपांतर द्विशतकात केलं. कर्णधाराला साजेशी खेळी आणि फलंदाजीचा असा मास्टरक्लास, ज्याचं उत्तर शोधताना वेस्ट इंडिजचे गोलंदाज हतबल झाले. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात कोणत्याही कर्णधाराने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या (२२३) ठरली. रोहित शर्मानंतर एकापेक्षा अधिक एकदिवसीय द्विशतकं झळकावणारा गिल दुसरा फलंदाजही ठरला. त्याने अवघ्या ११७ चेंडूंमध्ये द्विशतक पूर्ण करत सर्वात वेगवान एकदिवसीय द्विशतकही झळकावलं.

भारताने ४३.३ षटकांत २ बाद ४०६ धावा करत आठ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला.

संक्षिप्त धावफलक

वेस्ट इंडिज: ५० षटकांत ७ बाद ४०५ (अमीर जंगू ११४, शाई होप १०४, जॉन कॅम्पबेल १०१; कुलदीप यादव २/६५) पराभूत विरुद्ध भारत: ४३.३ षटकांत २ बाद ४०६ (शुभमन गिल २२३*, रोहित शर्मा १०१; शमार जोसेफ १/५२) आठ विकेट्सने.